
सामना प्रतिनिधी । नागपूर
‘माझा श्री रामावर पूर्ण विश्वास आहे. अयोध्येत राम मंदिर व्हावे ही रामाची इच्छा आहे. त्यामुळे अयोध्येत राम मंदिर होईलच’, अशी निसंदिग्ध ग्वाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिली. सेवासदन शिक्षण संस्थेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
राम मंदिरासाठी सरकार अध्यादेश काढणार नाही – मोदी
Video : राम मंदिरासाठी तातडीने कायदा करावा, आरएसएस मागणीवर ठाम
मोदींच्या उत्तराने विहिंप संतापली, राम मंदिरासाठी विेधेयकाची आग्रही मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिलेल्या महामुलाखतीत, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामासाठी वटहुकूम काढण्याविषयी विचार केला जाईल असे म्हटले होते. या विषयी विचारले असता, मोदींनी राम मंदिर होणार नाही असे कुठेही म्हटलेले नाही. फक्त न्यायालयीन प्रकियेनंतर विचार करू असे म्हटले. त्यामुळे मंदिर होईलच, असे सरसंघचालकांनी ठासून सांगितले. राम मंदिराला वेळ होतोय असे वाटत नाही का, असे विचारले असता, राम मंदिराचा मुद्दा 69 वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे तसाही वेळ झालेलाच आहे. पण आता अधिक वेळ होणार नाही. कारण वेळ कधीही बदलू शकते, असे सूचक वक्तव्य सरसंघचालकांनी केले.
सरसंघचालक म्हणून माझी भूमिका महत्त्वाची
मंगळवारी माध्यमांशी बोलताना सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी राम मंदिरावर संघ ठाम असल्याचे सांगितले होते. तर सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी ट्विट करून भाजपाने 2014 च्या जाहीरनाम्यात राम मंदिराचे आश्वासन दिले होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना अयोध्येत राम मंदिर बांधावे लागेल, असे वक्तव्य केले होते. त्याविषयी विचारले असता, होसबळे हे सहसरकार्यवाह आहेत, भैयाजी जोशी हे सरकार्यवाह आहेत आणि मी सरसंघचालक आहे. त्यामुळे भैयाजींनी मांडलेली भूमिका योग्य असून तिच माझीही भूमिका आहे, असे सरसंघचालकांनी स्पष्ट केले.




























































