
सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘हिंदूंनो एकजूट व्हा’ असे आवाहन करत पुन्हा एकदा ‘एक है तो सेफ है’चा राग आळवला आहे. हिंदूंनी देशाला लष्करी आणि आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली बनवले असे म्हटले आहे. हिंदुस्थानची एकता ही हिंदूंच्या सुरक्षेची हमी आहे, हिंदू समाज एकजूट राहिला तर कितीही शक्ती एकत्र आल्या तरीही आपल्यावर विजय मिळवू शकत नाही, असे सरसंघचालकांनी म्हटले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘ऑर्गनायझर विकली’ या मुखपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हिंदूंवरील अत्याचाराच्या घटनांबद्दल भाष्य केले असून मानवाधिकार संघटनांच्या मौनाबद्दलही सवाल उपस्थित केला आहे. हिंदू समाज सशक्त हिंदुस्थानही मजबूत होईल आणि देशाला सन्मानही मिळेल असे सांगतानाच हिंदू समाज जर सशक्त झाला नाही तर कोणीही त्यांची काळजी करणार नाही, कोणीही त्यांची दखल घेणार नाही, असेही सरसंघचालकांनी म्हटले आहे.
हिंदुस्थानकडे शक्तिशाली बनण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. कारण आपण सर्व सीमांवर शत्रूची दुष्टता पाहतो आहोत. तुम्हालाच स्वतःचा बचाव करावा लागेल, त्यासाठी दुसऱ्या कुणाची वाट पाहत बसू नका, असे आवाहनही भागवत यांनी केले.