
नैसर्गिक आपत्तीनंतर शेजारील देशांमध्येही अशांतता दिसून येत आहे. कधी कधी प्रशासन जनतेला लक्षात ठेवून धोरणे आखत नाही आणि त्यामुळे त्यांच्यात असंतोष असतो, परंतु अशा प्रकारे ते व्यक्त करणे योग्य नाही. लोकशाही मार्गानेच बदल शक्य आहे, हिंसक आंदोलने ही एक चिंतेची बाब असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त रेशीमबाग मैदानावर विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकांमधील अशांतता आणि शेजारील देशांमधील घडामोडींकडे लक्ष वेधले. श्रीलंका, बांगलादेश आणि अलीकडेच नेपाळमध्ये जनतेच्या संतापाच्या हिंसक उद्रेकांमुळे सत्तांतर झाले. अशा क्रांतीमुळे उद्दिष्ट साध्य होणार नाहीत. उलट, अराजकतेच्या स्थितीत, बाह्य शक्तींना खेळ खेळण्याची संधी मिळते, असे ते म्हणाले. या उत्सवात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह काही विदेशी पाहुणेदेखील सहभागी झाले होते.
हिंदुस्थानने आंतरिक सुरक्षेबाबत सतर्क राहावे
पहलगामच्या हल्ल्याच्या घटनेने आम्हाला मित्र आणि शत्रू यांच्यात फरक करायला शिकवले. आपल्या मनात सर्वांबद्दल मैत्रीपूर्ण भावना असल्या तरी, आपल्याला स्वतःच्या सुरक्षेसाठी अधिक सतर्क आणि सक्षम राहावे लागेल, असे भागवत म्हणाले.
हिंदू समाजाने बलसंपन्न होणे, शिलसंपन्न होणे आणि संघटित होणे, या देशाची एकता, सुरक्षा आणि विकासाची गॅरंटी आहे. कारण हिंदू समाज सनातन काळापासून येथे विद्यमान आहे. तो या देशाचा उत्तरदायी समाज आहे.