आयएएस, आयपीएसचे मूळ पेपर हिंदीमध्ये काढा! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची केंद्र सरकारकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
exam
प्रातिनिधिक फोटो

आयएएस, आयपीएस निवडीसाठी पात्रता परीक्षा म्हणून ‘सीसॅट’ परीक्षा घेतली जाते. या ‘सीसॅट’ परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिका हिंदी भाषेत बनवण्यात याव्यात आणि नंतर त्यांचे इंग्रजी व अन्य प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करावे, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (यूपीएससी) केली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा असलेल्या शिक्षा संस्कृती उत्थान न्यासाने ही मागणी केली आहे. मूळ प्रश्नपत्रिका इंग्रजी भाषेत काढली आणि नंतर इतर भाषेत भाषांतर केले तर भाषांतरानंतर त्यातील प्रश्नांमधील मर्मच निघून जाते. त्यामुळे हिंदी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची अडचण होते, असे न्यासाच्या स्पर्धा परीक्षा सुधारणा समितीचे प्रमुख देवेंद्र सिंग यांचे म्हणणे आहे.

‘पॉप्युलेशन’ची हिंदीत झाली ‘समष्टी’, ‘डाटा’चा ‘डट’
इंग्रजी प्रश्नपत्रिकेच्या भाषांतरानंतर त्यातील 50 टक्के शब्दांचे अर्थच बदलून जातात किंवा मग उमेदवारांच्या समजण्यापलीकडचे असतात असा अनुभव आहे, असे सांगतानाच सिंग यांनी पुढीलप्रमाणे उदाहरणेही दिली. इंग्रजीतील ‘पॉप्युलेशन’ या शब्दाला हिंदीत ‘जनसंख्या’ हा शब्द आहे. पण एका प्रश्नपत्रिकेत ‘समष्टी’ असा अवघड शब्द वापरला गेला होता. ‘डाटा’ हा शब्द हिंदीतही ‘डाटा’ असा ठेवला पाहिजे. पण तो ‘डट’ असा केला गेला होता.

गुगल ट्रान्सलेटरचा परिणाम
‘सीसॅट’ परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. 2011मध्ये यूपीएससीने परीक्षांचा नवा पॅटर्न आणला. पण इंग्रजी प्रश्नपत्रिकांचे प्रादेशिक भाषांत भाषांतर करताना गुगल ट्रान्सलेटर वापरले गेले. परिणामी भाषांतरीत प्रश्न हे समजण्यापलीकडे होते. त्यात ‘स्टील प्लॅण्ट’चे भाषांतर ‘लोहे का पौधा’, लॅण्ड रिफॉर्मचे ‘अर्थव्यवस्था सुधार’, मल्टी-ब्रॅण्ड रिटेलचे ‘बहुमकरा खुद्रा व्यापार’ आणि ‘पॅनाशिया’चे ‘सर्वोपचार’ असे भाषांतर झाले.