सामना ऑनलाईन । मुंबई
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून लवकरच दाम्पत्यांना कुटंब नियोजनाचे धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी संघाकडून येत्या रविवारी एक एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यात दाम्पत्यांना कुटुंब नियोजन कसे करावे, बाळावर संस्कार कसे करावे याबाबत माहिती दिली जाणार आहे.
संघाकडून येत्या रविवारी 4 ऑगस्टला कळवा येथे कुटुंब प्रबोधन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमात लग्नाला तीन वर्ष किंवा त्याहून कमी वेळ झालेली 20 जोडपी सहभागी होणार आहेत. त्या जोडप्यांना आयुर्वेदिक डॉक्टरांकडून ‘सुप्रजा’ म्हणजेच चांगली संतती होण्यासाठी काय करावे, त्यांचे पालन पोषण चांगल्या प्रकारे कसे करावे याचे धडे दिले जाणार आहे.
‘आतापर्यंत आपल्या देशात एकत्र कुटुंब पद्धती योग्य प्रकारे चालत होती. मात्र आता ग्लोबलायझेशन व आधुनिकीकरणामुळे छोट्या कुटुंबाटचा ट्रेंड सुरू झाला आहे. मात्र या नव्या ट्रेंडमुळे काही नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. दाम्पत्यांमध्ये दुरावा निर्माण होतो आहे, वृद्धांमधील एकटेपणा, मुलांमधील एकलकोंडेपणा वाढत चालला आहे. या अशा समस्यांवर तोडगा काढण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. असे या कार्यक्रमाच्या अधिकृत आमंत्रण पत्रिकेत नमूद केले आहे.
‘सध्याच्या काळात दाम्पत्य कुटुंब नियोजनाला प्राधान्य देतात. मात्र त्याला फार वेळ लांबवले तर नंतर महिलांना मूल होण्यास त्रास होतो. त्याचा परिणाम मुलांच्या व आईच्या तब्येतीवर देखील होतो. त्यामुळे मूल होऊ देण्याला फार उशीर केल्याने काय त्रास होऊ शकतो हे देखील आम्ही या दाम्पत्यांना समजावणार आहोत’, असे या कार्यक्रमाचे आयोजक मनोज मसूरकर यांनी सांगितले आहे.


























































