
आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेशाला मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेशाच्या ऑनलाइन सोडतीत निवड झालेल्या मुलांना कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्यासाठी 15 मेपर्यंत मुदत दिली आहे. यंदा राज्यातील 8 हजार 823 शाळांमध्ये एक लाख एक हजार 846 जागा उपलब्ध आहेत. या जागांवर प्रवेशासाठी तीन लाख 64 हजार 413 पालकांनी अर्ज दाखल केले होते.
यापैकी 94 हजार 700 मुलांची पहिल्या यादीत निवड करण्यात आली. प्रवेश निश्चितीसाठी 8 मेपर्यंतचा वेळ देण्यात आला होता, मात्र या वेळेत आतापर्यंत 49 हजार 368 मुलांचे प्रवेश निश्चित झाले असून अद्याप 45 हजार 332 मुलांचे प्रवेश बाकी आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने प्रवेश निश्चितीसाठी मुदत वाढवून दिली आहे.





























































