
>> रुचिर थत्ते
जगामध्ये आपल्या हिंदुस्थानात सर्वात जास्त क्रिप्टो करन्सी इन्व्हेस्टर्स आहेत. आश्चर्य वाटले ना? पण आज हिंदुस्थानात जवळपास 10 कोटीपेक्षा जास्त म्हणजे आपल्या संपूर्ण लोकसंख्येच्या 7.5 टक्के हे क्रिप्टो करन्सी इन्व्हेस्टर्स आहेत. ‘इकॉनॉमिक टाइम्स’नुसार हिंदुस्थानातील लोकांचे 41,175 कोटी रुपये हे क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये गुंतवले गेले आहेत. यानिमित्ताने क्रिप्टो करन्सीचे कोणकोणते प्रकार आहेत? त्यात किती वेगवेगळे कॉईन्स आहेत? आणि हे सर्व कॉईन्स कधी निर्माण झाले? हे सर्व कॉईन्स कोणत्या कार्यप्रणालीवर आधारित आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधनारा लेख…
क्रिप्टो करन्सी म्हटले की, आपल्याला पहिला आठवतो तो म्हणजे बिटकॉईन. आपण गेल्या 5-7 वर्षांपासून बिटकॉईनविषयी ऐकत आहोत. सध्या गेल्या 2 वर्षांत हिंदुस्थानमध्ये क्रिप्टो करन्सीची खूप हवा झाली आहे आणि त्यामध्ये हिंदुस्थानातील लोकांची गुंतवणूकही खूपच वाढली आहे. रोज नवनवीन कॉईन्स येतायत. आपले सरकार क्रिप्टो करन्सीसाठी नवनवीन नियम आणत आहे. एकूणच काय, हिंदुस्थानातील जनतेमध्ये क्रिप्टो करन्सीची प्रसिद्धी खूपच वाढली आहे.
जगामध्ये आपल्या हिंदुस्थानात सर्वात जास्त क्रिप्टो करन्सी इन्व्हेस्टर्स आहेत. आश्चर्य वाटले ना? पण आज हिंदुस्थानात जवळपास 10 कोटीपेक्षा जास्त म्हणजे आपल्या संपूर्ण लोकसंख्येच्या 7.5 टक्के हे क्रिप्टो करन्सी इन्व्हेस्टर्स आहेत. ‘इकॉनॉमिक टाइम्स’नुसार हिंदुस्थानातील लोकांचे 41,175 कोटी रुपये हे क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये गुंतवले गेले आहेत.
आपल्याला प्रश्न पडले असतील की, क्रिप्टो करन्सी म्हणजे फक्त बिटकॉईनच का? क्रिप्टो करन्सीचे कोणकोणते प्रकार आहेत? त्यात किती वेगवेगळे कॉईन्स आहेत? आणि हे सर्व कॉईन्स कधी निर्माण झाले? हे सर्व कॉईन्स कोणत्या कार्यप्रणालीवर आधारित आहेत? आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ.
बिटकॉईनची निर्मिती – क्रिप्टो करन्सीची सुरुवात 2009 ला बिटकॉईन या पहिल्या कॉईनच्या निर्माणापासून झाली. सातोशी नाकामोटो या जपानमध्ये राहणाऱया युवकाने 2007 साली बिटकॉईन या पहिल्या ब्लॉकचेन या कार्यप्रणालीवर आधारित जगातल्या पहिल्या आभासी चलनाची निर्मिती केली. बिटकॉईन जेव्हा उदयास आला त्यावेळी त्याची किंमत फक्त 6 रुपये होती. हळूहळू यामध्ये लोक गुंतवणूक करायला लागले आणि त्याची किंमत वाढत गेली. गेल्या 5 वर्षांत बिटकॉइनची प्रसिद्धी खूपच वाढली. आज एका बिटकॉईनची किंमत 22,40,000 रुपये एवढी आहे. म्हणजे 2010 साली 6 रुपयांचा हा कॉईन 12 वर्षांमध्ये जवळपास 3,73,000 पट वाढला आहे. म्हणजेच 2010 मध्ये गुंतवलेल्या 100 रुपयांचे आज 3 कोटी 73 लाख रुपये झाले.
बिटकॉईनबरोबरच या समूहाने बिटकॉईन कॅश, बिटकॉईन गोल्ड आणि बिटकॉईन एसव्ही हेसुद्धा कॉईन्स काढले.
इथेरियम या कॉईनची सुरुवात – बिटकॉईननंतर सर्वात लोकप्रिय आणि इन्व्हेस्टर्सची दुसरी आवड असणारा कॉईन म्हणजे इथेरियम. हा कॉईन 2013 साली कॅनडामध्ये जन्माला आला. हा कॉईनसुद्धा ब्लॉकचेन कार्यप्रणालीवर आधारित कॉईन आहे. 2013 साली या चलनाची निर्मिती झाली तेव्हा त्याची किंमत 20 रुपये होती आणि आज हे चलन आज 1,37000 रुपयांना आहे. म्हणजेच 2013 साली इथेरियममध्ये गुंतवलेल्या 100 रुपयांचे आज जवळपास 7 लाख रुपये झाले आहेत.
2015 साली इथेरियम क्लासिक आणि 2017 साली इथेरियम नेम सर्विस हे कॉईन्स आले. या सर्व कॉईन्सनीसुद्धा गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून दिला आहे.
लाइटकॉईन – हा बिटकॉईननंतर आलेला दुसरा कॉईन आहे. हा कॉईन 2011 मध्ये बिटकॉईनला पर्याय म्हणून अस्तित्वात आला. लाइटकॉईनसुद्धा बिटकॉईनप्रमाणेच ब्लॉकचेन या कार्यप्रणालीवर आधारित आहे. लाइटकॉईनची सध्याची किंमत ही 4834 रुपये आहे. n टीथर ः हा कॉईन क्रिप्टो बाजारातला सर्वात स्थिर कॉईन मानला जातो. हा कॉईन तयार अशा प्रकारे केला आहे की, याची किंमत कायम 1 डॉलरच्या आसपास असेल आणि डॉलरच्या वाढ आणि घट यानुसार या कॉईनची किंमत बदलेल. या कॉईनमध्ये ट्रेड करण्यासाठी फार हालचाल नसते, पण हा कॉईन एक चलन म्हणून सर्व व्यवहारांसाठी वापरला जातो. जसे 2 देशांमधले व्यवहार डॉलरने होतात तसे दोन करन्सीमधले व्यवहार हे टीथरने होतात. ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर्स एका कॉईनमधून दुसऱया कॉईनमध्ये गुंतवणूक करताना टीथर या कॉईनचा वापर करतात. हा कॉईन इथेरियम आणि बिटकॉइनच्या ब्लॉकचेन कार्यप्रणालीवर आधारित आहे.
बायनान्स कॉईन – हा जगातील लोकप्रिय क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगचा प्लॅटफॉर्म आहे. बायनान्समध्ये जवळपास सगळ्या नामवंत कॉईन्समध्ये ट्रेडिंग होते. बायनान्स या प्लॅटफॉर्मने 2017 साली बायनान्सच्या स्वतःच्या ब्लॉकचेन कार्यप्रणालीवर आधारित हा कॉईन काढला. हा कॉईनसुद्धा लोकप्रिय आहे. 2017 साली 300 रुपयांना असलेला हा कॉईन आज 23,500 रुपयांना आहे. या कॉईननेसुद्धा गुंतवणूकदारांना खूप नफा दिला आहे. n रिपल ः एक्सआरपी म्हणजेच रिपल हा कॉईन 2012 साली तयार झाला. हा कॉईन विविध देशांच्या चलनांमध्ये पैशांच्या देवाणघेवाणीमध्ये महत्त्वाचे काम करतो. हा कॉईन दोन देशांमधल्या व्यवहारांमध्ये उपयोगी ठरू शकतो आणि देशांतर्गत पेमेंट सुलभ करण्यासाठी रिपल यंत्रणा काम करते. या कॉईनची आज 33 रुपये किंमत आहे.
बायनान्स डॉलर – जगातल्या लोकप्रिय क्रिप्टो एक्सचेंजने बायनान्स डॉलर हा डॉलरवर आधारित असा एक कॉईन काढला आहे. हासुद्धा टीथरसारखा एक स्थिर कॉईन आहे. बायनान्समधल्या विविध करन्सीमधल्या व्यवहारांसाठी हा कॉईन वापरला जातो. या कॉईनची किंमत पण 1 डॉलर म्हणजे 75-77 रुपयांच्या आसपास स्थिर असते आणि डॉलरच्या बरोबर कमी जास्त होते.
कार्डानो – हा इथेरियममधीलच एका संस्थापकाने निर्माण केला आहे. कार्डानो हा कॉईन 2017 साली आला आणि हासुद्धा एक लोकप्रिय कॉईन आहे. n सोलाना – 2020 मध्ये 2 वर्षांपूर्वीच निर्माण झालेला पण क्रिप्टो ट्रेडर्समध्ये लोकप्रिय झालेला हा कॉईन वेगवेगळे व्यवहार त्याच्या वेब-स्केल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी निर्माण झाला. हा कॉईन 48 कोटी नाण्यांपर्यंत मर्यादित आहे. म्हणजेच या संख्येपर्यंतच नाणी बाजारात ट्रेड होऊ शकतात. n पोल्काडॉट – हा कॉईन 2 वर्षांपूर्वी तयार झाला. हा सुद्धा ब्लॉकचेन कार्यप्रणालीवर आधारित आहे. हा ब्लॉकचेन कार्यप्रणालीवर आधारित सर्व कॉईन्सना एकत्र जोडतो. या क्रिप्टो करन्सीच्या बाजारात 10 हजारांपेक्षा जास्त कॉईन्स आहेत आणि ही संख्या वाढतच चालली आहे. यातील वरील 10 कॉईन्स हे सर्वात लोकप्रिय कॉईन्स म्हणून मानले जातात आणि हे सर्व कॉईन्स बिटकॉईनवरून प्रेरणा घेऊन बिटकॉईनसारख्याच ब्लॉकचेन तंत्रज्ञानांवर आधारित निर्माण झाले आहेत. या सर्व कॉईन्समध्ये व्यवहार कारण्यासाठी सध्या वझीर एक्स, झेब पे, कॉईन डीसीएक्स असे प्लॅटफॉर्म्स वापरले जातात.
हिंदुस्थानमध्ये बनलेले हे सर्व प्लॅटफॉर्म्स क्रिप्टो इन्वेस्टमेन्ट्ससाठी हिंदुस्थानी लोक खूप जास्त प्रमाणात वापरतात. त्याबरोबरच बायनान्स, हूओबी, डेल्टा एक्सचेंज हेसुद्धा जागतिक लोकप्रिय प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत.
(लेखक अर्थ घडामोडींचे अभ्यासक आहेत.)






























































