वेब न्यूज – रुदाली डॉट कॉम

>> स्पायडरमॅन

प्रसिद्ध बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांच्या लघुकथेवर आधारित असलेला, कल्पना लाजमी यांनी दिग्दर्शित केलेला ‘रुदाली’ हा चित्रपट कोण विसरू शकेल? अतिशय सुंदर असा आशय आणि त्याला जोड देणारी सुमधुर गाणी यांच्यामुळे हा चित्रपट आजही लोकांच्या स्मरणात राहिलेला आहे. या चित्रपटाची आठवण येण्याचे कारण म्हणजे जोधपूरमध्ये नुकताच सुरू झालेला एक अनोखा स्टार्टअप, ज्याचे नाव आहे अंतिम सत्य.

सध्या हिंदुस्थानात नोकरीऐवजी अनेक युवक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्राधान्य देत आहेत. अनेक भन्नाट कल्पनांना मूर्तरूप देत हे स्टार्टअप सध्या नावारूपाला येत आहे. जोधपूरमध्येदेखील एक असाच भन्नाट स्टार्टअप सुरू झाला आहे, जो त्याच्याशी जोडल्या जाणाऱया लोकांना रडण्याचे पैसे देत आहे. हो, तुम्ही वाचताय ते खरे आहे. तुम्ही जर धाय मोकलून रडण्यात वाकबगार असाल तर तुम्हाला भरपूर पैसे मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. जगात अंतिम सत्य काय असते, तर तो असतो मृत्यू. जगात आलेला माणूस हा एक ना एक दिवस जाणार असतो हे नक्की. मात्र आजकालच्या या धावपळीच्या जगात माणसाला माणूस मिळणेदेखील मुश्कील झाले आहे. सततची दगदग, धावपळ, दुरावलेले नातेवाईक हे चित्र आजकाल सगळीकडे दिसते आहे. अशा वेळी एखाद्या मृत नातेवाईकासाठी शोक करायलादेखील लोकांना वेळ नाही अशी परिस्थिती आहे. मात्र ‘अंतिम सत्य’ या स्टार्टअपने ‘रुदाली’पासून प्रेरणा घेत आता शोक व्यक्त करण्यासाठी भाडय़ाने माणसे पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. रडण्यासाठी किती माणसे हवीत, किती काळासाठी हवीत यावर त्यांनी विविध पॅकेजेसदेखील उपलब्ध करून दिली आहेत. या अनोख्या उद्योगाला प्रतिसाददेखील चांगला मिळत आहे. कोणताही व्यवसाय हा वाईट नसतो. जुन्या परंपरांना आधुनिक रूप देण्याची ही युक्ती किती सफल ठरते हे येणारा काळ ठरवेल.