
सामना ऑनलाईन, पाटणा
चारा घोटाळ्याप्रकरणी जेलमध्ये असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या मुलांमध्ये भांडणाला सुरुवात झाल्याचं वृत्त काही इंग्रजी दैनिकांनी दिले आहे. राष्ट्रीय जनता दलात वर्चस्व कोणाचं यासाठी हा सत्तासंघर्ष सुरू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. लालूप्रसादांची मुलगी मीसा भारती यांनी मात्र या वृत्ताचं खंडण करत म्हटलंय की प्रसारमाध्यमे या बातम्या वस्तुस्थितीला धरून प्रसिद्ध करीत नाहीयेत. प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही कुरबुरी असतात , हाताची पाच बोटं सारखी नसतात याचा अर्थ तेजस्वी आणि तेजप्रताप यादव या दोघांमध्ये संबंध तुटण्यापर्यंत भांडण झालंय असा होत नाही असं मीसा भारती यांचं म्हणणं आहे.
लालूपुत्रांमध्ये भांडणाची सुरुवात झाल्याच्या वृत्ताने नितीशकुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाला आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या आहेत. त्यांचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी म्हटलंय की ज्या कुटुंबामध्ये सगळेच जण राजकारण करण्यात गुंतलेले असतात, तिथे या गोष्टी घडणं अपरिहार्य आहे. लालूप्रसाद यादव जेलमध्ये गेल्यापासून राजदचे विरोधी पक्ष लालूंच्या कुटुंबात आलबेल नसल्याचा आरोप करत आहेत. राजदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिनावंद तिवारी यांच्या म्हणण्यानुसार ‘लालूंच्या कुटुंबात सगळं काही ठीक नसल्याच्या बातम्या देण्यात राष्ट्रीय माध्यमांना भलताच रस असतो त्यामुळे लालूंच्या कुटुंबात काही भांडणं सुरू आहेत का हे शोधणं या माध्यमांचं आवडीचं काम आहे’
























































