चार लग्न, 10 मुलं अन् अब्जावधींची संपत्ती; 91 वर्षांचे ‘मीडिया किंग’ चौथ्या पत्नीलाही घटस्फोट देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकन उद्योजक रुपर्ट मर्डोक (Rupert Murdoch) वयाच्या 91 व्या वर्षी चौथ्या पत्नीला घटस्फोट देणार आहेत. रुपर्ट हे पत्नी जेरी हॉल (Jerry Hall) हिच्यापासून फारकत घेणार आहे. दोघांना वेगवेगळ्या जोडीदारापासून झालेली 10 मुलंही आहेत. जेरी हॉल ही रुपर्ट मर्डोक यांच्यापेक्षा वयाने 30 वर्षांनी लहान असून सहा वर्षांपूर्वीच त्यांनी लग्न केले होते. मात्र आता दोघांनीही संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून आतापर्यंत हा सर्वात महागडा घटस्फोट ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रुपर्ट मर्डोक यांनी 2016 मध्ये जेरी हॉल हिच्याशी लग्न केले होते. रुपर्ट यांचे हे चौथे लग्न होते. मात्र आता लग्नाला सहा वर्ष झाल्यानंतर दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. रुपर्ट मर्डोक यांचा समावेश जगातील सर्वाधिक श्रीमंतांमध्ये होतो. त्यांच्याकडे 14 बिलियन डॉलरची (1.3 लाख कोटी रुपये) संपत्ती आहे. ते घटस्फोट घेणार असल्याची बातमी ‘द न्यूयॉर्ट टाइम्स’ने दिली आहे.

रुपर्ट मर्डोक यांची चार लग्ने झालेली आहेत. मात्र कोणतेही लग्न फार काळ टिकले नाही. त्यांनी पहिले लग्न 1956 मध्ये केले. पॅट्रिसिया बुकर असे त्यांचे पहिल्या पत्नीचे नाव असून 11 वर्षांनी अर्थात 1967 ला त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्याच वर्षी त्याने अन्ना मारिया टोर्व हिच्याशी लग्न केले. हे लग्न 32 वर्ष टिकले. यानंतर त्यांनी तिलाही घटस्फोट दिला.

1999 ला तिसरे लग्न केले आणि पुन्हा 2013 ला घटस्पोट घेतला. 2016 मध्ये त्यांनी ‘बॅटमॅन’ आणि ‘द ग्रॅज्यूएट’ चित्रपटामध्ये काम केलेल्या जेरी हॉल हिच्याशी विवाह केला. परंतु आता हे लग्नही मोडण्याच्या स्थितीत आहे.

रुपर्ट मर्डोक यांचा जन्म 11 मार्च 1931 ला झालेला आहे. माध्यम क्षेत्रातील ते बिग बूल असून ‘फॉक्स न्यूज चॅनल’ची मुळ कंपनी ‘फॉक्स कॉर्प’ आणि ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या ‘न्यूज कॉर्प’चे ते मालक आहेत. 2020 पर्यंत मर्डोक यांच्याकडे 50 देशांमध्ये 800 हून अधिक कंपन्या होत्या. हिंदुस्थानच्या माध्यमांवरही त्यांचा प्रभाव असून ‘स्टार इंडिया’सह ‘स्क्रीन आणि प्रोपरायटर डॉट कॉम’मध्येही त्यांची भागिदारी आहे.