
युक्रेनवरील हल्ले थांबवण्यासाठी अमेरिकेने दिलेल्या अल्टिमेटमचा रशियाने चोथा केला. अमेरिकेच्या आर्थिक निर्बंधांच्या धमक्यांना भीक न घालता रशियाने युक्रेनवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा केला. त्यात 9 जणांचा मृत्यू झाला असून 124 लोक जखमी झाले आहेत.
रशियाने युक्रेनवरील हल्ले थांबवण्यासाठी अमेरिका जंगजंग पछाडत आहेत. युक्रेनला शस्त्रपुरवठा करतानाच रशियाची आर्थिक कोंडी करण्याचाही अमेरिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी रशियाशी व्यापार करणाऱ्या देशांवरही दबाव टाकला जात आहे. त्यांच्यावर जास्तीत जास्त टॅरिफ लावण्याची भूमिका ट्रम्प यांनी घेतली आहे. रशियाशी व्यापार केल्याबद्दल ट्रम्प यांनी नुकताच हिंदुस्थानला 25 टक्के टॅरिफसह दंड ठोठावला. तसेच रशियाला 12 दिवसांत युद्ध थांबवण्याचा अल्टिमेटम दिला.
27 ठिकाणांना केले लक्ष्य
रशियाने हा अल्टिमेटम धुडकावून लावला असून युक्रेनवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. रशियाने बुधवारी रात्री कीव प्रांतातील 27 ठिकाणांना लक्ष्य करत ड्रोन व क्षेपणास्त्रे डागली. त्यामुळे युक्रेनमध्ये प्रचंड नुकसान झाले. अनेक इमारती कोसळल्या. त्यात अनेकांचा मृत्यू झाला असून काही लोक बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.