
कोरोना संकटाशी सर्व जग मुकाबला करत असताना कोरोना लस विकसीत करण्यात रशियाने आघाडी घेतली आहे. रशियाने सर्वात आधी स्फुटनिक व्ही नावाची कोरोनावरील पहिली लस आणली होती. त्यानंतर आता लवकरच रशिया दुसरी लस आणणार आहे. या लसीच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असून या चाचण्यांमध्ये लस प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. 15 ऑक्टोबरला रशिया ही लस लॉन्च करण्याची शक्यता आहे. एपीवॅककोरोना असे या लसीचे नाव आहे.
स्फुटनिक व्ही नावाची कोरोनावरील पहिलीच लस रशियाने आणली आहे. तसेच रशिया आता लवकरच तिसऱ्या टप्प्यातील लसीच्या चाचणीचे निष्कर्ष जारी करणार आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष जारी करणारा रशिया हा पहिलाच देश ठरणार आहे. इतर देशात कोरोनाच्या चाचण्या सुरू आहेत. तर रशिया तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष जारी करण्याच्या तयारीत आहे. लवकरच हे निष्कर्ष जारी करण्यात येतील, असे स्फुटनिक व्ही लस विकसीत करणाऱ्या गॅमेलिया इन्स्टिट्यूटचे प्रमुख अलेक्झांडर गिंट्सबर्ग यांनी सांगितले.
चाचण्यांच्या निष्कर्षाबाबत जगभरात उत्सुकता आहे. या निष्कर्षांची सगळेजण वाट बघत आहेत. यातून लस नेमकी किती प्रभावी आणि सुरक्षित आहे, हे स्पष्ट होणार आहे. आधीच्या चाचण्यांमध्ये लसीचा चांगला प्रभाव दिसून आला आहे. तसेच लस सुरक्षित असल्याचेही दिसून आले आहे. मात्र, तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष महत्त्वाचे आहेत. ही लस दिलेल्या 40 हजार व्यक्तींना 180 दिवस देखरेखीखाली ठेवण्यात आले. आता त्यांची तपासणी करून तिसऱ्या टप्प्यातील निष्कर्ष काढण्यात येतील आणि प्रकाशित करण्यात येतील, असे गिंट्सबर्ग यांनी सांगितले. रशियात स्फुटनिक व्ही लस जनतेला देण्यास सुरुवात झाली आहे. तसेच रशियाची कोरोनावरील दुसरी लसही 15 ऑक्टोबरला लॉन्च होणार आहे. त्यामुळे रशियाने लस आणण्यात आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे.

























































