
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अवघ्या 3 ते 4 तासांत हिंदुस्थानसह जगभरातील शेअर बाजार अक्षरशः झोपला. मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स तब्बल 2702 अंकांनी कोसळला. यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 13.44 लाख कोटी रुपये बुडाले. कच्च्या तेलांच्या किंमती 104 डॉलर प्रतिबॅरलवर गेल्या आहेत. सूर्यफुलाचाही भडका उडाला आहे. या युद्धामुळे महागाईचा ‘बॉम्ब’ फुटला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कच्चे तेल प्रतिबॅरल 100 डॉलर्सच्या जवळ गेले होते. मात्र युद्धामुळे काही तासांत तब्बल 7.92 टक्क्यांनी वाढ झाली. 2014 नंतर पहिल्यांदाच कच्चे तेल 100 डॉलर्सवर गेल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा भडका अटळ आहे. देशात लवकरच इंधन दरवाढ होईल. पर्यायाने मालवाहतूक महागल्यामुळे अनेक वस्तूंचे दर भडकणार आहेत.
महाराष्ट्रीय लोकांची काळजी घ्या
महाराष्ट्रातील जे नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांना मायदेशी परत सुखरूप घेऊन येण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. महाराष्ट्रातून शिक्षण, उद्योग-व्यवसायानिमित्त तिथे गेलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
हिंदुस्थानने मध्यस्थी करावी
युद्ध थांबविण्यासाठी हिंदुस्थानने मध्यस्थी करावी, अशी विनंती युक्रेनचे राजदूत इगोर पोलिखा यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपती पुतीन आणि युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत संपर्क साधावा, अशी विनंती करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, मोदी यांनी रात्री उशिरा पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.


























































