रशियात यादवी, पुतीनविरोधात खासगी लष्कराचे बंड, फौजा मॉस्कोच्या दिशेने; भयंकर रक्तपाताची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशियावर एकहाती हुकूमत गाजवणारे राष्ट्रपती ब्लादिमिर पुतीन यांच्याविरुद्ध ‘वॅगनर ग्रुप’ या खासगी लष्कराने बंड पुकारले आहे. पुतीन यांनीच पोसलेले हे खासगी लष्कर रशियात सत्तापालट करण्यासाठी रस्त्यावर उतरले असून मॉस्कोचा ताबा घेण्यासाठी आगेकूच सुरू आहे. ‘वॅगनर ग्रुप’ने रशियन सैन्याचे मुख्यालय असलेल्या रोस्तवेवर ताबा मिळवला आहे. तीन हेलिकॉप्टरही पाडले. दरम्यान, युक्रेनबरोबरचे युद्ध सुरू असतानाच या घडामोडींमुळे रशियात यादवी माजली असून भयंकर रक्तपात होण्याची शक्यता आहे. रशियात सत्तापालट होणार का? याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे.

‘वॅगनर ग्रुप’चे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन हे राष्ट्रपती पुतीन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. पुतीन यांनीच ‘वॅगनर ग्रुप’ या खासगी लष्कराला ताकद दिली. 2014 मध्ये या ग्रुपची स्थापना झाली. शत्रूराष्ट्र आणि देशातील राजकीय विरोधकांना संपविण्यासाठी पुतीन यांनी अनेकदा ‘वॅगनर ग्रुप’चा वापर केला, मात्र आता या खासगी लष्कराने पुतीन यांच्याविरोधातच बंड पुकारल्याने खळबळ उडाली.

कशामुळे झाले बंड?

पुतीन यांनी युक्रेन युद्धात लढण्यासाठी ‘वॅगनर ग्रुप’ला आघाडीवर पाठवले. यात ‘वॅगनर’चे मोठे नुकसान झाले. शस्त्र न मिळाल्याने ‘वॅगनर’चे अनेक सैनिक मारले गेले. यातूनच ‘वॅगनर ग्रुप’चे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन आणि राष्ट्रपती पुतीन यांच्यात वाद झाले. खासगी लष्कराला संपविण्याचा इशारा पुतीन यांनी दिला. तसेच देशाच्या सैन्यात सामील व्हावे यासाठीही दबाव टाकला. काही दिवसांपूर्वी ‘वॅनगर ट्रेनिंग कॅम्प’वर रशियन सैन्याने क्षेपणास्त्र हल्ला केला. या घडामोडीमुळे ‘वॅगनर ग्रुप’ने बंड पुकारल्याचे सांगितले जाते.

रस्त्यावर रणगाडे, शस्त्रसज्ज गाडय़ा

‘अल-जजीरा’ने दिलेल्या वृत्तानुसार खासगी लष्कर ‘वॅगनर ग्रुप’ची राजधानी मॉस्कोकडे वेगाने आगेकूच सुरू आहे. मॉस्कोचा ताबा घेऊन पुतीन यांची सत्ता उलथवून टाकण्याचा डाव आहे. ‘वॅगनर ग्रुप’च्या सशस्त्र लष्कराला रोखण्यासाठी रशियन सैन्याचे रणगाडे, शस्त्रसज्ज गाडय़ा मॉस्कोच्या रस्त्यांवर फिरत आहेत. मॉस्कोत हायअलर्ट असून सर्व महामार्ग बंद करण्यात आले आहेत.

राष्ट्रपती पुतीन यांचे निवासस्थान असलेल्या क्रेमलिन आणि डय़ुमाच्या सुरक्षेत प्रचंड वाढ केली आहे.

‘वॅगनर ग्रुप’ने रशियन सैन्याचे मुख्यालय असलेल्या रोस्तवेवर ताबा मिळविल्याचा दावा ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी केला. तसेच दोन शहरांवर ताबा मिळवला. तीन हेलिकॉप्टर पाडल्याचेही प्रिगोझिन यांनी सांगितले.

पुतीन यांची सत्ता उलथून टाकू – प्रिगोझिन

पुतीन यांची सत्ता उलथवून टाकल्याशिवाय शांत बसणार नाही. रशियाला नवा राष्ट्राध्यक्ष मिळेल, अशी शपथच ‘वॅगनर ग्रुप’चे प्रमुख प्रिगोझिन यांनी घेतली आहे. पुतीन यांनी चुकीचा मार्ग अवलंबिल्यामुळे देशात अराजक आहे. आमच्याकडे सशस्त्र फौज आहे. सत्तापालट करणारच, असे त्यांनी सांगितले.

पाठीत खंजीर खुपसला; देशद्रोह केला – पुतीन

‘वॅगनर ग्रुप’चे प्रमुख प्रिगोझिन यांनी व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेसाठी देशद्रोह केला आहे. रशियात जे घडत आहे ती गद्दारी आहे, असा संताप राष्ट्रपती पुतीन यांनी व्यक्त केला. ‘वॅनगर ग्रुप’ने जाणीवपूर्वक दहशतवादी मार्गाने सशस्त्र बंड केले. त्यांना धडा शिकवू, असा इशाराही पुतीन यांनी दिला आहे.