न डोळे उघडता येईना, ना हसता येईना; शस्त्रक्रियेनंतर हॉट मॉडेल चेटकिणीसारखी दिसायला लागली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशियातील विवाहीत, सुंदर महिलांपैकी एक म्हणून युलिया तारासेविच (43 वर्षे) हिचं नाव घेतलं जातं. हीच युलिया आता चेटकिणीसारखी दिसायला लागली आहे. चेहऱ्यावरील शस्त्रक्रिया तिला महागात पडली असून तिचा चेहरा पूर्णपणे बिघडला आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या मिसेस रशिया स्पर्धेत युलियाने दुसरा क्रमांक मिळवला होता. देवाने सौंदर्याची मुक्त हस्ताने उधळण केली असतानाही युलियाने चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करून आणखी सुंदर आणि तरुण दिसण्याचा प्रयत्न करायचं ठरवलं होतं.

युलियाने 3 हजार पाऊंड (जवळपास 3 लाख रुपये) खर्च करून चेहऱ्यावरील सुरकुत्या गायब करण्यासाठी शस्त्रक्रिया करायचं ठरवलं होतं. आंद्रे कोमारोव्ह आणि ओमार खालेद या दोन डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली होती. मात्र शस्त्रक्रियेनंतर तिचा चेहरा विद्रुप झाला. युलियाने म्हटलंय की शस्त्रक्रियेनंतर तिला डोळे उघडणं आणि हसणंही कठीण होऊन बसलं होतं. तिच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना युलियाने धडा शिकवायचं ठरवलं आहे. आंद्रे आणि ओमार यांनी मात्र यात आपली चूक नसल्याचं म्हटलंय. युलियामध्ये अनुवांशिक दोष होता त्यामुळे तिचा चेहरा खराब झाल्याचं या दोघांचं म्हणणं आहे. स्कलेरोडर्मा नावाच्या दुर्मिळ विकारामुळे तिच्यावर ही वेळ आल्याचं या डॉक्टरांनी म्हटलं आहे. तिचा चेहरा खराब होण्यास आपण जबाबदार नाही असंही त्यांचं म्हणणं आहे.

शस्त्रक्रियेनंतर युलियाला चेहऱ्याच्या स्नायूंच्या हालचाली करताना त्रास व्हायला लागला होता. तिने जेव्हा चेहरा पाहिला तेव्हा तिला धक्काच बसला होता. चेहरा जितका जमेल तितका पूर्ववत करण्यासाठी युलियाला पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागली ज्यासाठी 20 लाखांपेक्षा अधिकचा खर्च तिला सोसावा लागला.