
रशिया-युक्रेनमध्ये युद्धाची धग कायम असतानाच ब्रिटनच्या ‘एमआय-6’ या गुप्तचर यंत्रणेने खळबळजनक दावा केला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू झाला असून त्यांच्यासारखा दिसणारा बहुरूपी सध्या सत्तेवर आहे. तो बहुरूपीच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पुतीन यांची जागा घेत आहे. पुतीन हयात असल्याचा दिखावा बहुरूपीमार्फत केला जात आहे, असे गुप्तचर यंत्रणेने म्हटले आहे. या दाव्यामुळे संपूर्ण जगभर खळबळ उडाली आहे.
ब्रिटनमधील ‘मिरर’ संकेतस्थळाने ‘डेलीस्टार’च्या हवाल्याने यासंदर्भात वृत्त दिले आहे. पुतीन यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या साथीदारांना जगापासून काही आठवडे किंवा काही महिने गुप्त ठेवावी लागेल. पुतीन यांचा गंभीर आजारामुळे मृत्यू झाला असू शकतो, असे ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱयांचे म्हणणे आहे. पुतीन यांची सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रमातील हजेरी ही आधीच रेकॉर्ड केलेली असू शकते. सध्या सत्तेवर त्यांच्या जागी हुबेहूब त्यांच्यासारखा दिसणारा बहुरूपी बसला आहे, असा दावा गुप्तचर यंत्रणेकडून करण्यात आला आहे.
सत्तापालटच्या भीतीने बातमी गुप्त ठेवलीय!
पुतीन यांच्या मृत्यूची बातमी उजेडात येताच रशियात सत्तापालट होऊ शकते. तसेच रशियन जर्नल युक्रेनमधून सैन्य मागे घेईल, अशी सर्वात मोठी भीती पुतीन यांच्या जवळच्या मित्रांना सतावत आहे. पुतीन यांच्या मृत्यूमुळे ते आणखी कमकुवत आणि सत्तेतून बेदखल होतील. सध्यातरी पुतीन हे हयात असल्याचे सांगणे हेच त्यांच्या दृष्टीने हिताचे आहे. त्यामुळे त्यांनी पुतीन यांच्या मृत्यूची बातमी गुप्त ठेवली आहे, असे ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेने नमूद केले आहे.
दोन आठवडय़ांपूर्वी रशियातील एका अब्जाधीश व्यावसायिकाने पुतीन यांच्या प्रकृतीबाबत भाष्य केले होते. पुतीन हे रक्ताच्या कर्करोगाने त्रस्त आहेत. ते अत्यंत आजारी आहेत. युक्रेन हल्ल्यापूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे, असा दावा त्या व्यावसायिकाने केला होता.




























































