SA Vs AUS – मालिका गमावली पण शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा फडशा पाडलाच, साजरा केला वर्षातला सर्वात मोठा विजय

ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा तिसऱ्या वनडे सामन्यात तब्बल 276 धावांनी फडशा पाडला आहे. ऑस्ट्रेलियाचा हा मोठा विजय दक्षिण आफ्रिकेच्या मालिका विजयातला गोडवा कमी करणारा ठरला असून ऑस्ट्रेलियाने 2025 या वर्षातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली आहे. त्याचबरोबर धावांच्या फरकाने हा ऑस्ट्रेलियाचा दुसरा सर्वात मोठा विजय ठरला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांनी शतके ठोकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यामुळे दडपणाखाली असलेल्या ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात आपला रुद्रावतार दाखवला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचे फलंदाज दक्षिण आफ्रिकेवर अक्षरश: तुटून पडले होते. सलामीला आलेला ट्रेव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांनी विस्फोटक अंदाजात फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी 250 धावांची भागी केली. ट्रेव्हिस हेडने 17 चौकार आणि 5 षटकारांच्या जोरावर 142 धावांची वादळी खेळी केली. मिचेल मार्शने सुद्धा आपले हात धुवून घेत 6 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 100 धावा चोपून काढल्या. सलामीची जोडीला पाहून चौताळलेल्या कॅमरून ग्रीनने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत गोलंदाजांची दाणादाण उडवली. त्याने फक्त 55 चेंडूंमध्ये 8 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 118 धावांची नाबाद खेळी केली. त्याला अॅलेक्स कॅरीची चांगली साथ मिळाली त्याने सुद्धा 37 चेंडूंमध्ये नाबाद 50 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 2 गड्यांच्या मोबदल्यात 431 धावांचा डोंगर दक्षिण आफ्रिकेसमोर उभा केला.

आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला कुपर कॉनॉलीने जबर धक्का दिला. त्याने 5 विकेट घेत आफ्रिकेचं कंबरड मोडलं आणि सामना सुद्धा ऑस्ट्रेलियाच्या बाजून फिरवला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ फक्त 155 धावांवर बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाने या वर्षातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. त्यामुळे मालिका गमावूनही ऑस्ट्रेलियाने आपला नावाची दखल घ्यायला क्रीडा विश्वाला भाग पाडलं.

Cheteshwar Pujara Retirement – निवृत्तीनंतरही रुतबा कायम राहणार! पुजाराचे तीन विक्रम मोडताना यंग ब्रिगेडला घाम फुटणार

वनडे क्रिकेटमध्ये 2025 या वर्षात सर्वात मोठ्या फरकाने विजय मिळवणाऱ्या संघाच्या यादीत ऑस्ट्रेलियाने आता पहिला क्रमांक पटकावला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा समावेश असून त्यांनी 238 धावांनी वेस्ट इंडिजचा पराभव केला होता. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर वेस्ट इंडिज आहे. तर पाचव्या क्रमांकावर श्रीलंकेचा समावेश आहे.