सामना अग्रलेख – अफवेचे बळी

धार्मिक स्थळांवर चेंगराचेंगरीच्या दुर्घटना घडण्याचे प्रमाण अलीकडे अधिकच वाढले आहेत. ‘दुर्घटना से देर भलीहा साधा मूलमंत्र लोक विसरतात आणि अफवा बेशिस्तीमुळे असे हकनाक बळी जातात. मनसा देवी मंदिरातही तसेच झाले. केवळ एका अफवेमुळे सहा निरपराध भाविकांचा हकनाक बळी गेला. धार्मिक सर्वच गर्दीच्या ठिकाणांवर गर्दीला निमंत्रित करणारी, गर्दीचे योग्य व्यवस्थापन करणारी यंत्रणा तैनात करून वा कठोर नियमावली करून हे दुर्दैवी बळी रोखता येणार नाहीत काय?

धार्मिक स्थळे व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन श्रद्धाळू भाविकांचे हकनाक बळी जाण्याच्या घटना अलीकडच्या काळात वारंवार घडत आहेत. मात्र एकानंतर एक दुर्घटनांची मालिका घडत असतानाही गर्दीची ठिकाणे असलेल्या प्रसिद्ध धार्मिक ठिकाणांवर खबरदारीची उयापयोजना का केली जात नसेल हा प्रश्नच आहे. ताजी दुर्घटना हरिद्वारच्या मनसा मंदिरातील आहे. रविवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास मनसा देवी मंदिराच्या पायऱ्यांवर अचानक गर्दीचा रेटा वाढला आणि चेंगराचेंगरी झाली. भाविक अनामिक भीतीने आपले प्राण वाचवण्यासाठी दिसेल त्याला पायदळी तुडवत सुटले. गर्दीत काय होतेय, कुणालाच कळत नव्हते. काही लोक या भयंकर चेंगराचेंगरीतही समोरच्यांना ढकलून मंदिराकडे दर्शनासाठी धाव घेत होते, तर काही भाविक जीव वाचवण्यासाठी गर्दीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत हाते. काही मिनिटांच्या चेंगराचेंगरीत 6 भाविकांचा चिरडले जाऊन मृत्यू झाला, तर अन्य 35 जण गंभीररीत्या जखमी झाले. गर्दीत तुडवले जाऊन व श्वास घेण्यास त्रास होऊन तडफडत भाविक बेशुद्ध पडले. मनसा देवी हे मंदिर उत्तराखंडच्या हरिद्वाराच्या ‘हर की पौडी’ या प्रसिद्ध ठिकाणापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी एकंदर तीन मार्ग आहेत. दीड किलोमीटर कठीण रस्त्याने चालत किंवा रोप-वेने देखील जाता येते.

तिसरा मार्ग

डोंगरातील 800 पायऱ्यांवरून मंदिराकडे येतो. ताज्या पावसामुळे हा मार्ग आणि त्यावरील पायऱ्या निसरड्या झाल्या होत्या. ही दुर्घटना याच पायऱ्यांवर घडली. 800 पैकी 775 पायऱ्या भाविकांनी चढून पार केल्या होत्या. केवळ 25 पायऱ्या चढण्याच्या शिल्लक असताना गर्दीतील कुणीतरी पायऱ्यांलगतची एक तार आधारासाठी पकडली. या तारेत विद्युत प्रवाह उतरल्याचे व करंटमुळे धक्का बसल्याचे कुणीतरी ओरडून सांगितले आणि या अफवेची कसलीही खातरजमा न करता एकच पळापळ सुरू झाली. तथापि, या तारेत कुठलाही वीजप्रवाह नव्हता व त्यामुळे कुणालाही शॉक बसण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. मात्र हे सत्य समजेपर्यंत भयंकर चेंगराचेंगरी होऊन भाविक किड्या-मुंग्यासारखे चिरडले गेले. पायऱ्यांवर हा सगळागोंधळ सुरू असताना व भाविक महिला, मुले जिवाच्या आकांताने मदतीसाठी धावा करत असताना मंदिर व्यवस्थापन अथवा पोलीस प्रशासन यांच्याकडून तत्काळ कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. मंदिराच्या लाऊड स्पिकरवरून पोलीस व प्रशासनाने तत्काळ अफवेचे खंडन केले असते तरी चेंगराचेंगरीची ही दुर्घटना टाळता येणे सहज शक्य होते. अलीकडेच अयोध्येतील कुंभमेळ्यात गर्दीच्या व्यवस्थापनेतील दोषामुळेच चेंगराचेंगरी होऊन असंख्य लोक मृत्युमुखी पडले.

सरकार प्रशासनाचे अपयश

पवण्यासाठी तेथील मृतांचा नेमका आकडा उत्तर प्रदेश सरकारने जनतेसमोर येऊ दिला नाही. त्याआधी आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे वैकुंठ प्रवेशद्वारावर चेंगराचेंगरी होऊन 6 भाविकांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील निर्वाण महोत्सवात व अलीकडे पुरी येथे जगन्नाथाच्या रथयात्रे दरम्यानही अशीच चेंगराचेंगरी होऊन अनुक्रमे 7 व 3 जण मृत्युमुखी पडले. केवळ मंदिर वा धार्मिक स्थळांवरच चेंगराचेंगरीच्या दुर्घटना घडतात असे नव्हे, तर रेल्वे स्थानके, विजयी मिरवणुका वा गर्दीच्या इतर ठिकाणीही यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत. मात्र धार्मिक स्थळांवर चेंगराचेंगरीच्या दुर्घटना घडण्याचे प्रमाण अलीकडे अधिकच वाढले आहे. घाईने पुढे जाण्याच्या, लवकरात लवकर दर्शन घेण्याच्या खटाटोपातून आपण कुणाला तरी धक्का देतोय, ढकलतोय याचेही भान कित्येकदा गर्दीतील अनेकांना राहत नाही. त्यातून कुणीतरी खाली पडते आणि अफवा पसरून एकमेकांना चिरडत गर्दी आणखी बेकाबू होते. ‘दुर्घटना से देर भली’ हा साधा मूलमंत्र लोक विसरतात आणि अफवा व बेशिस्तीमुळे असे हकनाक बळी जातात. मनसा देवी मंदिरातही तसेच झाले. केवळ एका अफवेमुळे सहा निरपराध भाविकांचा हकनाक बळी गेला. धार्मिक व सर्वच गर्दीच्या ठिकाणांवर गर्दीला निमंत्रित करणारी, गर्दीचे योग्य व्यवस्थापन करणारी यंत्रणा तैनात करून वा कठोर नियमावली करून हे दुर्दैवी बळी रोखता येणार नाहीत काय?