सामना अग्रलेख – शहा आता ‘पीओके’ आणणार!

पाकव्याप्त कश्मीरात ज्याप्रमाणे सध्या ‘आझादी’च्या घोषणा सुरू आहेत, त्याचप्रमाणे भारतालाही हुकूमशाही व झुंडशाहीपासून आझादी हवी व तशा घोषणा दिल्या जात आहेत. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी पाकव्याप्त कश्मीरचे ‘सफरचंद’ लोकांना दाखवण्याच्या फंदात पडू नये. निर्वासित छावण्यांत गुजराण करणाऱया हजारो कश्मिरी पंडितांना त्यांच्या घरी पाठवले तरी मोदी-शहांनी काही काम केले असे म्हणता येईल. ‘पीओके’ तर फार लांबची गोष्ट आहे!

गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणुकांच्या दरम्यान पुन्हा पाकव्याप्त कश्मीरचा राग आळवला आहे. श्रीमान शहा असे म्हणतात की, पाकव्याप्त कश्मीर भारताचे आहे आणि ते आम्ही परत घेऊ. गृहमंत्र्यांचे हे विधान टाळय़ा वाजवायला आणि मते मागायला ठीक आहे. ‘दिल बहलाने को गालिब ये खयाल अच्छा है!’ तसाच शहा महाशयांचा हा खयाली राग आहे. गेल्या दहा वर्षांपासून देशात मोदी-शहांचे संपूर्ण बहुमताचे राज्य आहे व पंतप्रधानांची छाती छप्पन इंचांची आहे. पाकव्याप्त कश्मीर मिळवण्यासाठी 56 इंचांची छाती लागते व अशी लांब-रुंद छाती काँग्रेसची नाही, असे मोदी 2014 सालापासून सांगत आहेत. म्हणजे मोदी हेच 56 इंची छाती असलेले नेते आहेत. मग गेल्या दहा वर्षांत पाकव्याप्त कश्मीरची ‘56 इंच’ जमीनही ते भारतात का आणू शकले नाहीत? पंतप्रधान मोदी यांना कोणी अडवले होते? याचा खुलासा गृहमंत्री शहा यांनी करायला हवा. शेजारी राष्ट्रांचा आदर करा, शेजारच्या राष्ट्रांकडे अणुबॉम्ब आहेत असे काँग्रेसने सांगताच भाजपवाल्यांना प्रचाराचा मुद्दा मिळाला व पाकिस्तानला घाबरा असे काँग्रेस सांगत आहे, असे बोंबलणे सुरू आहे. शहा म्हणतात, ‘‘पाकिस्तानच्या अणुबॉम्बला घाबरायचे असेल तर घाबरा. आम्ही घाबरत नाही.’’ श्रीमान शहा यांनी जे सांगितले ते निरर्थक आहे. देशाचे एक सुपुत्र कुलभूषण जाधव हे गेल्या आठ वर्षांपासून

पाकिस्तानच्या तुरुंगात

सडत आहेत. भारतासाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप ठेवून जाधव यांचे पाक गुप्तचरांनी अफगाणिस्तानमधून अपहरण केले व पाकिस्तानात नेऊन डांबले. त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. कुलभूषण जाधव यांना पाकडय़ांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी या लोकांनी काय केले? मोदी यांची ताकद पाकिस्तानच्या अणुबॉम्बपेक्षा जास्त असती तर एव्हाना कुलभूषण जाधव मायदेशी परत आले असते. पाकिस्तानच्या तुरुंगात हजारांवर भारतीय मच्छीमार खितपत पडले आहेत व गेल्या महिनाभरात 17 मच्छीमारांचे तेथील तुरुंगात मृत्यू झाल्याची वार्ता धक्कादायक आहे. पाकव्याप्त कश्मीर भारतात आणायचे तेव्हा आणा, आधी कुलभूषण जाधव व आमच्या मच्छीमारांची पाकच्या तावडीतून सुटका करा. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे व हा अणुबॉम्ब धर्मांध माथेफिरूंच्या हातात असल्याने भारताला संरक्षणाबाबत सावध भूमिका घ्यायलाच हवी. आम्ही पाकिस्तानच्या अणुबॉम्बला घाबरत नाही, असे विधान करणारे शहा पुलवामा बॉम्बस्फोटात पोहोचलेले 400 किलो आरडीएक्स नक्की कोठून आले? त्याचा तपास करू शकले नाहीत. चाळीस जवानांचे हत्याकांड पुलवामात नक्की कोणी घडवले ते या लोकांना धड शोधता आले नाही, पण निवडणुका जिंकण्यासाठी पाकव्याप्त कश्मीर घेऊच घेऊ, अशा गर्जना ते करत आहेत. खरे तर शहा यांनी आधी मणिपूरवर ताबा मिळवायला हवा. आजही तेथे हिंसाचार व अत्याचार सुरू आहेत. शहा यांनी लडाखमध्ये घुसलेल्या

चिनी सैन्याला

बाहेर काढून चीनने गिळलेली भारताची जमीन परत मिळवायला हवी. चीनने लडाखची 4067 वर्ग किलोमीटर जमीन हडप केली आहे व गृहमंत्री पाकव्याप्त कश्मीर घेण्याचा राग आळवत आहेत. पाकव्याप्त कश्मीर घ्यायचे असेल तर घ्या. तुम्हाला कोणी अडवले आहे? सध्या पाकव्याप्त कश्मीरात म्हणे भारतात विलीनीकरण करण्याबाबत पोस्टर्स झळकली आहेत. पाकव्याप्त कश्मीरात जनता अशांत व अस्वस्थ आहे. नागरिक व पोलिसांत चकमकी सुरू आहेत. वीज टंचाई, महागाई, उच्च कर आकारणी, हुकूमशाही यामुळे तेथील लोकांत उद्रेक आहे हे खरेच, पण हेच प्रश्न व हाच उद्रेक भारतीय जनतेतसुद्धा आहे व त्याच उद्रेकातून भारतात सत्तापरिवर्तन होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. पाकव्याप्त कश्मीरात ज्याप्रमाणे सध्या ‘आझादी’च्या घोषणा सुरू आहेत, त्याचप्रमाणे भारतालाही हुकूमशाही व झुंडशाहीपासून आझादी हवी व तशा घोषणा दिल्या जात आहेत. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी पाकव्याप्त कश्मीरचे ‘सफरचंद’ लोकांना दाखवण्याच्या फंदात पडू नये. 2014 ते 2024 या दहा वर्षांत मोदी-शहांनी पाकव्याप्त कश्मीरचा ऊस इतका पिळून काढला आहे की, लोकांचा त्या विषयातील रस संपला आहे. निर्वासित छावण्यांत गुजराण करणाऱया हजारो कश्मिरी पंडितांना त्यांच्या घरी पाठवले तरी मोदी-शहांनी काही काम केले असे म्हणता येईल. ‘पीओके’ तर फार लांबची गोष्ट आहे!