
ऑगस्ट महिन्यात पावसाने दीर्घ ओढ दिली. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे या एरवी ऑगस्टपर्यंत पावसाची सरासरी गाठणाऱ्य़ा जिल्ह्यांसह 16 जिल्ह्यांना फटका बसला. पावसाची सरासरी कमी राहिल्याने धरणांमधील पाणीसाठा, जो गेल्या वर्षी सुमारे 74 टक्के होता तो या वर्षी 60 टक्क्यांच्या आसपासच राहिला. मागील दोन दिवसांत पावसाच्या पुनरागमनाचा दिलासा मिळाला असला तरी तेवढे पुरेसे नाही हेदेखील खरे. पावसाळ्याचे तीन महिने संपले आहेत. अद्यापि पावसाने सरासरीचा टप्पा गाठलेला नाही. विघ्नहर्त्या श्री गणरायांचे आगमन आता काही दिवसांवर आले आहे. त्यांच्या कृपेने पावसाची बाकी पूर्ण होवो, हीच प्रार्थना!
मागील 24 तासांत राज्याच्या बहुतांश भागात पावसाने पुनरागमन केले आहे. ते दिलासादायक म्हणावे लागेल. काही ठिकाणी मात्र महापूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे, दरडी कोसळल्या आहेत, पाझर तलाव फुटले आहेत, नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत, शेतीचे नुकसान झाले आहे, इतर प्रकारचीही हानी झाली आहे. मात्र ऑगस्टचा जवळजवळ संपूर्ण महिना पावसाने दिलेली ओढ पाहता हा पाऊस राज्यासाठी अत्यंत गरजेचा होता. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि महाराष्ट्राच्या बऱ्य़ाच भागांत पावसाने पुन्हा बॅटिंग सुरू केली. निमित्त काहीही असले तरी रुसलेला मान्सून पुन्हा बरसू लागला हे महत्त्वाचे आहे. जुलै महिन्यात कोकणासह अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि महापुराने थैमान घातले होते. दरड कोसळण्याच्या दुर्घटना ठिकठिकाणी घडल्या होत्या. या अस्मानी संकटाने एक वेगळेच आव्हान उभे केले होते. त्यातून मार्ग काढण्याचे प्रशासन आणि सरकारचे प्रयत्न सुरू असतानाच जुलैमध्ये कोसळलेला पाऊस ऑगस्टमध्ये गायबच झाला. तब्बल तीन-चार आठवडे पावसाने दडी मारली. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, खान्देश, मराठवाडा भागातील
खरीप पीक धोक्यात
येते की काय, अशी भीती निर्माण झाली होती. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट घोंघावू लागले होते. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगावसह मराठवाड्याच्या काही भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाने निम्मीदेखील सरासरी गाठलेली नाही. मात्र आता वरुणराजाची पुन्हा कृपा‘वृष्टी’ झाली. सोमवार-मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. पाण्याची कमी भरून निघण्यासाठीही मदत होणार आहे. नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागल्याने भूजल पातळीत जशी वाढ होऊ शकेल तशी छोटी-मोठी धरणे, बंधारे यांच्या पाणीपातळीतही वाढ होईल. अर्थात, त्याचवेळी काही भागांना जो अतिवृष्टी, महापुराचा तडाखा बसला आहे त्याचा सरकारला तातडीने विचार करावा लागेल. विशेषतः गेल्या दोन दिवसांत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुका, पालघरमधील डहाणू, नगर जिल्ह्यांतील शेवगाव, तिसगाव, पाथर्डी, मराठवाड्यातील कन्नड, संभाजीनगर, जालना, नांदेड, निलंगा, बीड अशा अनेक भागांना
मुसळधार पावसाने तडाखा
दिला आहे. चाळीसगाव, शेवगाव, डहाणू परिसरांमध्ये महापुरासारखी स्थिती उद्भवली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. चाळीसगावमध्ये एनडीआरएफची टीम बोलवावी लागली आहे. अनेक जनावरे, घरे वाहून गेली आहेत. तर कन्नड येथील घाटात दरड कोसळल्याने परिस्थिती गंभीर आहे. मराठवाड्यात 67 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पीक आणि पाणी या दोन्हीची परिस्थिती सुधारू शकेल. ऑगस्ट महिन्यात पावसाने दीर्घ ओढ दिली. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे या एरवी ऑगस्टपर्यंत पावसाची सरासरी गाठणाऱ्य़ा जिल्ह्यांसह 16 जिल्ह्यांना फटका बसला. पावसाची सरासरी कमी राहिल्याने धरणांमधील पाणीसाठा, जो गेल्या वर्षी सुमारे 74 टक्के होता तो या वर्षी 60 टक्क्यांच्या आसपासच राहिला. मागील दोन दिवसांत पावसाच्या पुनरागमनाचा दिलासा मिळाला असला तरी तेवढे पुरेसे नाही हेदेखील खरे. पावसाळ्याचे तीन महिने संपले आहेत. अद्यापि पावसाने सरासरीचा टप्पा गाठलेला नाही. विघ्नहर्त्या श्री गणरायांचे आगमन आता काही दिवसांवर आले आहे. त्यांच्या कृपेने पावसाची बाकी पूर्ण होवो, हीच प्रार्थना!






























































