सामना अग्रलेख – बाबांचा ‘मोक्ष’ उद्योग!

बाबा रामदेव यांनी काशीमध्ये बोलतानामोक्षकोणाला कसा मिळेल यावर प्रवचन दिले. जेसनातनला शिव्या देत आहेत त्यांना 2024 मध्येमोक्षमिळेल, असे ते म्हणाले. बाबांनी मोक्षप्राप्तीचा नवा पतंजली उद्योग सुरू केलाय. मुळात मोक्ष मिळविण्यासाठी पाच गोष्टींचे पालन करावे लागते. सगळय़ात पहिले चोरी करणे, खोटे बोलणे, व्यभिचार करणे, हिंसा करणे आणि मोहमायेपासून दूर राहणे. हे ज्याने केले त्यालाच मोक्षाचे दार उघडते. या मोक्ष उद्योगाचेपेटंटपंतप्रधान मोदी यांनी उद्योगपती बाबा रामदेव यांना दिले असेल तर 2024 साली हामोक्षउद्योग साफ कोसळून पडणार आहे! अर्थात आज सत्तेवर असलेल्या नकली हिंदुत्ववाद्यांना मोक्षप्राप्ती होणे कठीणच आहे!

प्रख्यात उद्योगपती, योगाचार्य बाबा रामदेव यांनी सांगितले की, जे सनातनला शिव्या देत आहेत, त्यांना 2024 साली मोक्ष मिळेल. उद्योगपती रामदेव यांनी हे मोक्षपुराण काशी येथे सांगितले. काशी हे महातीर्थ आहे. विद्या आणि मोक्षाची नगरी आहे. काशी ही सत्यनगरीसुद्धा आहे. त्यामुळे बाबा सत्य बोलले असतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. अशा नगरीत येऊन उद्योगपती रामदेव यांनी ‘मोक्ष’ देण्याच्या नव्या उद्योगाची घोषणा केली. त्यामुळे त्यांच्या पतंजली उद्योगसमूहास मोठीच बरकत येईल. रामदेव यांनी ही ‘मोक्ष’ उद्योगाची घोषणा ‘इंडिया’ आघाडीस उद्देशून केली. इंडिया आघाडीतील ‘द्रमुक’ पक्षाचे पुढारी सनातन धर्माविषयी विचित्र टीकाटिपण्या करतात. ते धर्म मानीत नाहीत, धर्म नावाची कोणतीही व्यवस्था ते मानत नाहीत. ही त्यांची भावना. त्यांच्या विचारांशी इतर कोणी सहमत असण्याची शक्यता नाही. आमचा सवाल इतकाच आहे की, तामीळनाडूतले दक्षिणी किंवा द्रविडी मंडळी सनातन विचार मांडत नाहीत म्हणून सनातन धर्माचे काही नुकसान झाले आहे काय? अजिबात नाही. त्याच वेळी स्वयंघोषित ‘सनातन’वादी भाजपचाही विस्तार तामीळनाडूत होऊ शकला नाही हेदेखील सनातन सत्य आहेच. तामीळनाडूच्या भूमीवर अनेक शतके हिंदू-सनातन धर्म उभा आहे. जगातील सर्वोत्तम व मोक्षाचा मार्ग दाखविणारी हिंदू मंदिरे याच भूमीवर आहेत. आध्यात्मिक अनुभवासाठी प्रतिवर्षी लाखो श्रद्धाळू येथे येत असतात. इसवी सन सातव्या आणि दहाव्या शतकादरम्यान उभारल्या गेलेल्या येथील असंख्य मंदिरांकडे श्रद्धेने पाहिल्यावर वाटते की, ‘सनातन धर्मा’च्या विरोधानंतरही ही सर्व मंदिरे अगणित श्रद्धाळूंना प्रेरणा व ऊर्जा देत आहेत. तामीळनाडूत आज सनातन विरोधकांचे राज्य आहे व गेल्या काही दिवसांपासून ही मंडळी सनातन धर्मावर टीकाटिपणी करीत आहेत. जो धर्म तलवारीच्या धाकाने संपविता आला नाही तो धर्म शाब्दिक टीकेने अजिबात हतबल होणार नाही. पुन्हा त्याच तामीळ भूमीवर आज

सनातन धर्माची पताका

फडकत आहे. तेव्हा राजकीय विचार व धर्म यांची गल्लत करू नये. तामीळनाडूतील सनातन धर्माची महती काय वर्णावी? तामीळनाडूतील चिदंबरम मंदिर हे भगवान शिवाच्या सात पवित्र हिंदू मंदिरांपैकी एक आहे. ते सप्तपुरी म्हणून ओळखले जाते. केदारनाथ, काशी विश्वनाथ, सोमनाथ, द्वारका, रामेश्वरम आणि अमरनाथ ही इतर सहा मंदिरे आहेत. सर्वात लक्षणीय मंदिरांपैकी एक असलेले नटराज मंदिर याच राज्यात आहे. भगवान शिवाचे दिव्य नृत्य साजरे करणारे हे एक अद्भुत मंदिर आहे. मंदिरात शिवाची कास्य मूर्ती आहे, जी ऋषी आदिशंकराने पवित्र केली होती. नटराजाचे हिंदू धर्मातील महत्त्व मोठे आहे. शिवाय राजा चोल याने 1003 मध्ये बांधलेले बृहडीश्वर मंदिर येथेच आहे. रामेश्वरम मंदिर हे शिवाला समर्पित आहे व ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. मदुराईतील मीनाक्षी मंदिर लोकप्रिय आहे. हे मंदिर जगभरात वास्तुशिल्प आणि शिल्पकलेसाठी प्रख्यात आहे. तामीळनाडूतील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक कुंभकोणम ब्रह्मा मंदिर आहे. वेल्लोरचे श्री लक्ष्मीनारायण सुवर्णमंदिर, सिखापुरीचे बाला मुरुगन मंदिर, देवीपट्टीनमचे नवपाषाणम मंदिर अशी मंदिरेच मंदिरे तामीळनाडूत हिंदू धर्माची ध्वजा फडकवीत आहेत. तामीळनाडूत 40 हजारांहून अधिक हिंदू मंदिरे आहेत. म्हणजे ही मंदिरांची भूमी आहे. या देवभूमीवरून जे सनातन धर्म संपवू शकले नाहीत ते या पृथ्वीवरील धर्म कसा संपवतील? याच तामीळनाडूतील तंजावर प्रांतावर शहाजीराजांचे शूर पुत्र व छत्रपती शिवाजीराजांचे भाऊ व्यंकोजीराजे भोसले यांचे राज्य होते व त्यांनीही येथे हिंदू धर्म टिकवला. तंजावरचा गणपती व दसरा उत्सव आजही जोरात होतो. गुजरात, महाराष्ट्र वगैरे राज्यांतील हिंदू मंदिरांवर मोगलांची आक्रमणे झाली. सोमनाथ वगैरे मंदिरे उद्ध्वस्त झाली. अयोध्येवरही आक्रमण झाले, पण तामीळनाडूच्या भूमीवरील सर्व मंदिरे या आक्रमणापासून बचावली हे त्या सनातन धर्माचे यश. त्यामुळे उद्योगपती रामदेव बाबा व

भाजपच्या लोकांना

सनातन धर्माविषयी जी चिंता वाटते आहे ती पोकळ तर आहेच, परंतु भंपकदेखील आहे. कारण त्यात राजकीय स्वार्थ व पेटवापेटवीशिवाय दुसरे काही नाही. ‘द्रविडी’ पक्ष सनातन धर्म मानत नाहीत हा त्यांचा राजकीय विचार आहे, पण तामीळ जनांत हिंदू संस्कृती खोलवर रुजली आहे. हे राज्य म्हणजे हिंदुत्वाचा खजिना आहे. स्वर्गात जर 33 कोटी देव असतील तर त्या सर्व देवांची मंदिरे तामीळनाडूत आहेत. तिरुनेलवेली येथे पापनासम मंदिर आहे. एखाद्याची पापे धुऊन काढायची तर येथे जायचे अशी प्रथा आहे. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीनंतर सध्याच्या राज्यकर्त्यांना याच पापनासम मंदिरात जावे लागेल व त्या विधीचे पौरोहित्य उद्योगपती बाबा रामदेव यांना करावे लागेल. बाबा रामदेव यांनी काशीमध्ये बोलताना ‘मोक्ष’ कोणाला व कसा मिळेल यावर प्रवचन दिले. जे ‘सनातन’ला शिव्या देत आहेत त्यांना 2024 मध्ये ‘मोक्ष’ मिळेल, असे ते म्हणाले. बाबांनी मोक्षप्राप्तीचा नवा पतंजली उद्योग सुरू केलाय. याच उद्योगात त्यांनी कोरोना निवारणाचे औषध बाजारात आणले होते, पण काशीच्या मोक्षप्राप्ती नगरीत गंगेत प्रेतांचे खच वाहतानादेखील लोकांना दिसले होते. हृदयविकारावर रामबाण औषध त्यांनी शोधले, पण बाबांच्याच पतंजलीचे संचालक आचार्य बाळकृष्ण यांना हृदयविकाराचा झटका येताच प्राण वाचविण्यासाठी त्यांना दिल्लीतील इस्पितळात दाखल करावे लागले. आता रामदेव बाबांनी ‘मोक्ष’प्राप्तीकडे मोर्चा वळवला. मुळात मोक्ष मिळविण्यासाठी पाच गोष्टींचे पालन करावे लागते. सगळय़ात पहिले चोरी न करणे, खोटे न बोलणे, व्यभिचार न करणे, हिंसा न करणे आणि मोहमायेपासून दूर राहणे. हे ज्याने केले त्यालाच मोक्षाचे दार उघडते. या मोक्ष उद्योगाचे ‘पेटंट’ पंतप्रधान मोदी यांनी उद्योगपती बाबा रामदेव यांना दिले असेल तर 2024 साली हा ‘मोक्ष’ उद्योग साफ कोसळून पडणार आहे! अर्थात आज सत्तेवर असलेल्या नकली हिंदुत्ववाद्यांना मोक्षप्राप्ती होणे कठीणच आहे!