सामना अग्रलेख – भाजपचे ‘मंगळसूत्र’ चोर!

मोदी व त्यांचे लोक हे सत्तेवर बसलेले आयतोबा आहेत. म्हणून त्यांनी पवित्र मंगळसूत्राची उठाठेव करण्याचा प्रयत्न केला. भारतमातेच्या गळ्यातही क्रांतिकारकांच्या बलिदानाचे, त्यागाचे मंगळसूत्र आहे. त्या मंगळसूत्रातील एकही मणी मोदीकृत भाजपचा नाही. मोदी यांनी त्यांच्या स्वार्थासाठी पवित्र मंगळसूत्रावर चिखलफेक करून हिंदू संस्कृती व हिंदू धर्माचा अपमान केला. त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी, पण निवडणूक आयोगाचा न्यायच उफराटा. मंगळसूत्रास हात घातला मोदींनी व कारवाईचा बडगा उगारला नड्डांवर. भाजपचा ‘नाडा’ सुटल्याचे हे द्योतक आहे.

भाजप आणि काँग्रेसला निवडणूक आयोगाने नोटिसा बजावल्या आहेत. नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांच्या नावे आयोगाने नोटीस बजावली. आचारसंहितेच्या उल्लंघनाचे हे प्रकरण आहे. भांडणात एकमेकांविरुद्ध तक्रार म्हणजे ‘क्रॉस कम्प्लेन्ट’चा हा प्रकार असला तरी पंतप्रधान मोदी यांच्याबाबत नोटीस म्हणजे धूळफेक आहे. धूळफेक म्हणायची ती यासाठी की, पंतप्रधान मोदी यांनी ‘मुसलमान समाजा’विषयी एक धादांत खोटे वक्तव्य केले. काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करून मोदी यांनी बांग दिली की, काँग्रेस सत्तेवर आली तर हिंदूंची संपत्ती ते जास्त मुले असलेल्यांना वाटतील. म्हणजे हिंदूंच्या संपत्तीचे वाटप मुसलमानांत केले जाईल. तुमची मंगळसूत्रेही खेचली जातील. अशा पद्धतीचे वक्तव्य करून मोदी यांनी प्रचारात हिंदू-मुसलमान हा मुद्दा आणलाच. मोदींना प्रचारात मुसलमानांना खेचावे लागले याचा अर्थ निवडणूक त्यांना जड जात आहे. पहिल्या-दुसऱया टप्प्यात मतदारांनी भाजपकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे जो मुद्दा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नाही तो मुद्दा घेऊन मोदी यांनी थापेबाजी केली या मुद्द्यावर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने मोदी यांना नोटीस न बजावता भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना नोटीस बजावली. निवडणूक आयोगाची ही पद्धत योग्य नाही. एकतर निवडणुका जाहीर होताच मोदी हे पंतप्रधान राहिलेले नाहीत. ते काळजीवाहू पंतप्रधान आहेत. त्यामुळे त्यांना विशेष अधिकार, प्रोटोकॉल नाही. तरीही सर्व सरकारी ताफा, विमाने घेऊन ते प्रचारासाठी फिरत आहेत. हे आचारसंहितेच्या कोणत्या नियमात बसते? पंतप्रधानपदावरील व्यक्ती जातीय व धार्मिक

द्वेष पसरविणारी भाषणे

करून मते मागत असेल तर तिच्यावरही निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करायलाच हवी. पंतप्रधान जाहीर सभांतून महिलांची मंगळसूत्रे खेचण्याची भाषा करून आग लावत आहेत. हिंदू संस्कृतीत मंगळसूत्र पवित्र मानले जाते. त्या मंगळसूत्रालाच राजकारणात खेचण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले. हिंदुत्वास आणि हिंदू संस्कृतीस हे मान्य नाही. हिंदू महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रांचा असा अपमान करण्याचा अधिकार मोदी यांना कोणी दिला? मोदी यांनी मंगळसूत्राची प्रतिष्ठा स्वतःच्याच घरात ठेवली नाही असे बोलले जाते. मोदी यांच्या काळातच मंगळसूत्रांवर सगळ्यात मोठे गंडांतर आले. नोटाबंदीच्या काळात असंख्य हिंदू महिलांना मंगळसूत्र विकून घर चालवावे लागले. लॉक डाऊनच्या काळातही महिलांना मंगळसूत्रे सावकारांकडे गहाण ठेवावी लागली. बेरोजगारीच्या संघर्षात अनेक माता, बहिणी, पत्नींना मंगळसूत्राचाच सौदा करावा लागला. महागाईचा सामना करताना मेटाकुटीस आलेल्या अनेक महिलांची मंगळसूत्रे रोजच पेढ्यांवर विकली जात आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी मंगळसूत्रे खर्ची पडत आहेत. आई-बापांच्या, मुलांच्या इलाजासाठी रोज हजारो मंगळसूत्रे खर्ची पडत आहेत. मणिपुरात महिलांची नग्न धिंड काढून त्यांची मंगळसूत्रे खेचण्यात आली, तेव्हा मोदी काय करत होते? मोदी यांच्या काळातच कश्मीरात पुलवामा आणि इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये जवानांच्या असंख्य वीरपत्नींनी आपल्या मंगळसूत्रांचे बलिदान केले, हे मोदींना माहीत नसावे? कश्मिरी पंडितांची घर वापसी झालेली नाही व त्यातील अनेक महिलांनी मोदी काळातच मंगळसूत्रे गमावली आहेत. देशासाठी मंगळसूत्रांचा त्याग करण्याची महान परंपरा या देशात आहे व अशा मंगळसूत्रांचा

राजकीय कारणांसाठी वापर

करणाऱ्या नेत्यांवर कारवाई व्हायलाच हवी. देशासाठी कोणताही संघर्ष व त्याग न करणाऱ्यांच्या हाती आज देशाची सूत्रे आहेत. महाराष्ट्रात भाजपने काही ‘मंगळसूत्र चोर’ गँगच्या म्होरक्यांना प्रतिष्ठा देऊन आमदार वगैरे केले. या गँगने सांगली, कोल्हापुरात अनेक हिंदू महिलांची मंगळसूत्रे दिवसाढवळ्या उडवल्याची नोंद आहे. उत्तर प्रदेशात गेल्या पाच वर्षांत सगळ्यात जास्त मंगळसूत्र चोरीच्या घटना घडल्या आहेत व तेथे ‘योगीराज’ सुरू आहे. ‘‘काँग्रेसची मानसिकता शहरी नक्षलवाद्यांची असून माता-भगिनींनो, ते तुमची मंगळसूत्रेही सोडणार नाहीत,’’ असे मोदी यांनी सांगितले ते ऐन निवडणुकीत शांतता भंग करण्यासाठीच. मतदारांची दिशाभूल करून मते मागण्याची वेळ नरेंद्र मोदी व त्यांच्या लोकांवर आली हेच त्यांच्या पराभूत मानसिकतेचे लक्षण आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक क्रांतिकारकांच्या पत्नींनी मंगळसूत्रांचे बलिदान केले नसते तर मोदी आज पंतप्रधान झालेच नसते व हे बहुसंख्य क्रांतिकारक व स्वातंत्र्य सैनिक काँग्रेस विचारांचे होते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक महिलांनी मंगळसूत्रांचे दान केले आहे व त्या महायज्ञात मोदीकृत भाजपची कोणतीच समिधा पडलेली नाही. मोदी व त्यांचे लोक हे सत्तेवर बसलेले आयतोबा आहेत. म्हणून त्यांनी पवित्र मंगळसूत्राची उठाठेव करण्याचा प्रयत्न केला. भारतमातेच्या गळ्यातही क्रांतिकारकांच्या बलिदानाचे, त्यागाचे मंगळसूत्र आहे. त्या मंगळसूत्रातील एकही मणी मोदीकृत भाजपचा नाही. मोदी यांनी त्यांच्या स्वार्थासाठी पवित्र मंगळसूत्रावर चिखलफेक करून हिंदू संस्कृती व हिंदू धर्माचा अपमान केला. त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी, पण निवडणूक आयोगाचा न्यायच उफराटा. मंगळसूत्रास हात घातला मोदींनी व कारवाईचा बडगा उगारला नड्डांवर. भाजपचा ‘नाडा’ सुटल्याचे हे द्योतक आहे.