सामना अग्रलेख – कुलूप आणि शेपूट!

राजकीय विरोधक आणि टीकाकार यांच्यावर एवढे बारकाईने लक्ष ठेवणाऱ्या मोदी सरकारने सीमांवरील चिनी कारवायांकडे मात्र काणाडोळाच केला. त्यामुळे जम्मू-कश्मीरपासून अरुणाचल प्रदेश-मणिपूरपर्यंतची भारताची सीमा मोदी राजवटीत कधी नव्हती एवढी असुरक्षित, अशांत आणि अस्वस्थ झाली आहे. चीन लडाखमध्ये मैलोन्मैल घुसखोरी करीत आहे. अरुणाचल प्रदेशमधील गावांची नावे परस्पर बदलत आहे. आपले पंतप्रधान मोदी मात्र हाताची घडी तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. चिनी ड्रगनपुढे शेपूट हलवीत बसले आहेत. जनतेलाच आता हे कुलूप आणि शेपूट उखडून फेकावे लागणार आहे.

पंतप्रधान मोदी यांना पुन्हा सत्ता मिळाली तर ते भारताचा चेहरामोहराच बदलून टाकतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या अंधभक्तांना वाटतो. मोदी यांच्यामुळे देशाचा चेहरामोहरा बदललाय का? ते सांगणे कठीण आहे, पण भारताचा नकाशा मात्र मोदींच्या काळात कुरतडला जातोय. चीनने पुन्हा भारताची कळ काढली आहे. भारताचा अविभाज्य भाग असलेल्या अरुणाचल प्रदेशमधील 30 गावांची नावे चीनने बदलली. अरुणाचलावर भारताचा दावा चुकीचा असून तो दक्षिण तिबेटचा भाग असल्याचे चीनने जाहीर केले. चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने अरुणाचलमधील 11 गावे, 12 पर्वत, 4 नद्या, 1 तलाव आणि एका मार्गाचे नामकरण केले. ही नावे चिनी, तिबेटी आणि रोमन भाषेत प्रसिद्ध करण्यात आली आहेत. चीनने मागच्या पाच वर्षांत हे तिसऱ्यांदा केले व अरुणाचलवर भारताचा दावा बेकायदेशीर असल्याचे सांगितले. मोदींच्या काळातच चीनचा हा खोडसाळपणा वाढला आहे. चिनी व भारतीय सैनिकांत हिंसक झटापटी अनेकदा झाल्या आहेत. चीन लडाखमध्ये भारतीय हद्दीत हजारो किलोमीटर घुसल्याचा स्फोट सोनम वांगचुक यांनी केला. चीन अशा धडका भारतीय सीमेवर मारत असताना पंतप्रधान मोदी हे निवडणूक प्रचारात गुंतून पडले आहेत. विदेश मंत्री जयशंकर म्हणतात, ‘‘चीनने फक्त नावे बदलली. त्याने काय होणार? मी तुमच्या घराचे नाव बदलले तर ते आमचे होईल काय?’’ भारतीय मंत्र्यांचा हा तर्क म्हणजे चीनची घुसखोरी गांभीर्याने न घेण्याचाच प्रकार आहे. पंतप्रधान मोदी हे राष्ट्रीय सुरक्षा व देशाची जमीन याबाबत किती गंभीर आहेत ते यावरून दिसते. मोदी हे देशातील विरोधकांना नामोहरम करण्यासाठी

ईडी आणि सीबीआयची दहशत

निर्माण करतात. लोकांनी बहुमताने निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकतात. राजकीय विरोधकांवर खोटेपणाचे वार करतात, पण ईशान्येकडील सीमेवरून चीन आत घुसला आहे त्यावर ते बोलायला तयार नाहीत. मोदी-शहांच्या भाजपची देशभक्ती हे ढोंग आहे. सत्तरेक वर्षांपूर्वी वाटाघाटीत श्रीलंकेला समुद्रातील एक बेट देण्यात आले. त्याचे खापर मोदी आज फोडत आहेत ते काँग्रेसवर, पण पाच वर्षांपूर्वी चीनने लडाखमध्ये घुसून हजारो मैल जमीन गिळली त्यावर त्यांचे मौन आहे. मणिपूरच्या हिंसाचारातही चीनचाच हात असल्याचे पुरावे समोर आले, पण मणिपूर भारताचा अविभाज्य भाग असूनही मोदी गेल्या दोन वर्षांत तेथे फिरकले नाहीत. मणिपुरात युद्धासारखीच परिस्थिती निर्माण झाली, पण मोदी यांचे मणिपूरकडे लक्ष नाही. अरुणाचलकडे ढुंकून पाहायला ते तयार नाहीत. कश्मीरातील पंडितांचा आक्रोश आणि घरवापसीचा वादा ते विसरून गेले. मोदी काळ हा अमृतकाळ असल्याचे म्हटले जाते, पण या तथाकथित अमृतकाळात सीमेवरील राज्यांना विष प्राशन करावे लागत आहे. 2014 साली मोदी यांची भाषा तर पाकव्याप्त कश्मीर पुन्हा मिळवून अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण करण्याची होती. आज आहे त्या हिंदुस्थानलाही कुरतडण्याचे प्रकार सुरू आहेत. नरेंद्र मोदी यांना देशाच्या सीमा, आंतरराष्ट्रीय धोरणे, विदेश नीती यावर पूर्ण ज्ञान नाही. अंधभक्तांनी त्यांना ‘विश्वगुरू’ची उपाधी भले बहाल केली, पण हे गुरू भारतासाठी योग्य नाहीत. देशात किसान व जवान रोज मरत आहेत. देशाचा भूभाग शत्रू कुरतडत आहे व हे विश्वगुरू निवडणुकांच्या प्रचारात दंग आहेत. मोदी हे देशाचा चेहरामोहरा बदलतील असे फडणवीस सांगतात. सत्य असे की, देशाचा

सुंदर चेहरा

मोदी यांनी बिघडवून टाकला. गंगा, जमुना, सरस्वतीचा प्रवाह गढूळ केला. राजकीय स्वार्थासाठी मोदी व त्यांच्या लोकांनी देशात भ्रष्टाचाराची गटारगंगाच निर्माण केली व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण दुर्लक्ष केले. पाकिस्तानला दम देणारे मोदी चीनच्या घुसखोरीवर गप्प बसतात. पुलवामातील 40 जवानांचे बलिदान संशयाच्या भोवऱ्यात सापडले. इतका कडक बंदोबस्त असताना 350 किलो आरडीएक्स पुलवामात पोहोचलेच कसे? याचा तपास मोदींचे सरकार लावू शकले नाहीत. उलट या 40 जवानांच्या हौतात्म्याचा राजकीय लाभ घेण्याचा अमानुष प्रकार मोदी आणि त्यांच्या पक्षाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केला. पुन्हा या प्रकरणातील मोदी सरकारच्या संशयास्पद त्रुटींवर नेमके बोट ठेवणारे जम्मू-कश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनाही त्यांच्या या निर्भीडपणाची किंमत मोजावी लागली. मोदी सरकारच्या तपास यंत्रणांचा ससेमिरा मलिक यांच्याही मागे लावला गेला. राजकीय विरोधक आणि टीकाकार यांच्यावर एवढे बारकाईने लक्ष ठेवणाऱ्या मोदी सरकारने सीमांवरील चिनी कारवायांकडे मात्र काणाडोळाच केला. त्यामुळे जम्मू-कश्मीरपासून अरुणाचल प्रदेश-मणिपूरपर्यंतची भारताची सीमा मोदी राजवटीत कधी नव्हती एवढी असुरक्षित, अशांत आणि अस्वस्थ झाली आहे. चीन लडाखमध्ये मैलोन्मैल घुसखोरी करीत आहे. अरुणाचल प्रदेशमधील गावांची नावे परस्पर बदलत आहे. आपले पंतप्रधान मोदी मात्र हाताची घडी तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. चिनी ड्रगनपुढे शेपूट हलवीत बसले आहेत. जनतेलाच आता हे कुलूप आणि शेपूट उखडून फेकावे लागणार आहे.