
एकीकडे मैत्रीचा हात आणि दुसरीकडे घात, ही पाकिस्तानी नीती आता चिन्यांनीही अवलंबली आहे. अरुणाचलमधील घुसखोरी आणि अर्जेंटिनात मोदी–जिनपिंग यांच्यात होणारी बैठक ही त्याचेच द्योतक आहे. शांततेचा जप करत तणाव वाढविण्याचे चीनचे इरादे ओळखून हिंदुस्थाननेही सीमा मजबूत करतानाच नवी रणनीती आखायला हवी!
चीन आणि पाकिस्तानसारखे घातक देश शेजारी म्हणून लाभले हे हिंदुस्थानचे मोठेच भौगोलिक दुर्दैव आहे. कपटनीती हा या दोन्ही देशांचा समान धागा. एकीकडे मैत्रीसाठी हात पुढे करायचा आणि दुसरीकडे विश्वासघात करून पाठीत खंजीर खुपसायचा, हेच या दोन्ही देशांचे खलनायकी परराष्ट्रीय धोरण आहे. आताही तेच घडले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुढील महिन्यात अर्जेंटिना येथे बैठक होणार आहे. चीनचे हिंदुस्थानातील राजदूत लुओ च्यहुई राजधानी दिल्लीत प्रसारमाध्यमांना नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मोदी-जिनपिंग भेटीची माहिती देत असतानाच चिनी सैनिकांनी अरुणाचल प्रदेशात पुन्हा घुसखोरी केल्याची माहिती समोर आली आहे. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असाच हा प्रकार आहे. अरुणाचल सेक्टरमध्ये हिंदुस्थानी हद्दीत प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून चिनी सैनिकांनी घुसखोरी केली. सीमेवर गस्त घालणाऱ्या हिंदुस्थानी सैनिकांनी या सैनिकांना रोखले, हिंदुस्थानी हद्दीत येण्याचा जाब विचारला आणि चिनी सैनिकांचे पार्सल त्यांच्या हद्दीत परत पाठवले. केवळ सैनिकच नव्हे, तर चिनी सैन्याची हेलिकॉप्टर्सही हिंदुस्थानी हद्दीत घुसखोरी करून अनेकदा घिरटय़ा घालत असतात. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक हिंदुस्थानला डिवचण्यासाठी मुद्दाम घुसखोरी करतात आणि हिंदुस्थानी सैनिकांनी
विरोध केल्यानंतर
माघारी फिरतात. जम्मू-कश्मीरला लागून असलेली पाकिस्तानची सीमा पाकडय़ांनी जशी कायम अशांत ठेवली, त्याच पद्धतीने चिन्यांनीही हिंदुस्थानी सैन्याला सीमेवर कायम ‘व्यस्त’ ठेवण्याचे धोरण स्वीकारलेले दिसते. गेल्या चारेक वर्षांमध्ये तर लडाख आणि अरुणाचल या दोन्ही बाजूंनी चिनी सैनिकांनी असंख्य वेळा घुसखोरी केली. डोकलामचा वाद झाल्यापासून चिनी सैनिकांची घुसखोरी नित्याचीच झाली आहे. 2016 मध्ये चीनने हिंदुस्थानात 271 वेळा घुसखोरी केली आणि 2017 मध्ये हे प्रमाण वाढून 365 दिवसांत तब्बल 415 वेळा चिन्यांनी नियंत्रण रेषा ओलांडली. दोन वर्षांतील घुसखोरीच्या घटनांमुळे तब्बल 362 वेळा दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने उभे ठाकले होते. हिंदुस्थानी हद्दीत घुसायचे, हिंदुस्थानी सैनिकांशी दांडगाई करत हुज्जत घालायची, झटापट करायची असे सत्रच चिनी सैनिकांनी सातत्याने सुरू केले आहे. वारंवार चिथावणीखोर कारवाया करून हिंदुस्थानी सैनिकांना भडकावण्याचे उद्योग चिनी सैनिक पुनः पुन्हा करत आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांत किमान 25 वेळेला गंभीर वादाचे प्रसंग उद्भवले. हिमाचल प्रदेशातील कौरीक, उत्तराखंडमधील बाराहोती, अरुणाचल प्रदेशातील नमका चू ते दिबांग घाटचा प्रदेश आणि लडाखच्या अनेक भागांत रोज कुठे ना कुठे घुसखोरी आणि धुसफूस सुरूच असते. आता तर
नेहमी होणाऱ्या घुसखोरीच्या
ठिकाणांशिवाय नवनवीन भागांतून चिनी सैनिक अचानकपणे हिंदुस्थानी हद्दीत शिरतात आणि तळ ठोकून बसतात. सीमेवर कायम कुरघोडी करण्याच्या चीनच्या कारवाया हाणून पाडण्यासाठी सगळ्य़ात मोठी अडचण ठरते ती दुर्गम पर्वतीय भागाची. हिंदुस्थानातून चिनी हद्दीकडे जाणारे रस्ते बांधल्याशिवाय चीनच्या या दांडगाईला लगाम घालणे अशक्य आहे. अनेक वर्षांपासून रखडलेला रस्ता सीमेपर्यंत बांधून पूर्ण केला तर आपल्या सैनिकांना चोवीस तास गस्त घालणे सोपे होईल. तिकडे चीनने मात्र आपल्या हद्दीपर्यंत विमानतळ, रेल्वे मार्ग आणि रस्तेही आणून ठेवले आहेत. उद्या युद्धाचा प्रसंग उभा राहिलाच तर शत्रूने आपल्या दारापर्यंत त्यांची संरक्षण सिद्धता आणून ठेवली आहे. हिंदी महासागरातही चीनची अशीच दादागिरी सुरू आहे. 73 दिवस चाललेल्या डोकलामच्या वादानंतर चीनने संरक्षण दलांवरील खर्चात हिंदुस्थानच्या तुलनेत चारपटीने वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर हिंदुस्थानला अडचणीत आणण्याची एकही संधी चीन सोडत नाही. एकीकडे मैत्रीचा हात आणि दुसरीकडे घात, ही पाकिस्तानी नीती आता चिन्यांनीही अवलंबली आहे. अरुणाचलमधील घुसखोरी आणि अर्जेंटिनात मोदी आणि जिनपिंग यांच्यात होणारी बैठक हे त्याचेच द्योतक आहे. शांततेचा जप करत तणाव वाढविण्याचे चीनचे इरादे ओळखून हिंदुस्थाननेही सीमा मजबूत करायला हव्यात आणि नवी रणनीती आखायला हवी!





























































