सामना अग्रलेख – पाठीशी श्रीराम आहेतच!

6004

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अयोध्या नगरीच्या मनामनांत आहेत याचा अनुभव आम्ही अनेकदा घेतला आहे. स्वतः उद्धव ठाकरे हे अयोध्येत जात आहेत ते त्याच एका श्रद्धेने. हातात सत्ता नव्हती तेव्हाही ते रामचरणी गेले. आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावरही ते अयोध्येत जात आहेत ते त्याच नम्र भावाने. महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, महिला, आबालवृद्ध हे सुखाने नांदावेत, राज्यात एकात्मता आणि बंधुभाव नांदावा अशी प्रार्थना ठाकरे सरकाररामचरणी करतील. हे राज्य श्रींचे आहे. म्हणजे छत्रपती शिवरायांचे आहे. ते छत्रपतींच्या न्यायबुद्धीने, तितकेच श्रीरामांच्या सत्य मार्गाने चालेल. जनतेला दिलेल्या वचनांना जागणारी कर्तव्यबुद्धी सरकारच्या विचारात असणे हेच रामराज्य ठरते. हेच राज्य महात्मा गांधींना हवे होते. महाराष्ट्रात त्याच विचारांचे राज्य चालले आहे. ते तसेच चालत राहील. पाठीशी श्रीराम आहेतच!

महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने रामराज्य सुरू झाले त्यास शंभर दिवस झाले. हे सरकार शंभर तासही चालणार नाही असे दावे जे ‘ऐंशी तास’वाले करीत होते, त्यांना तसेच बोंबलत ठेवून सरकारने शंभर दिवसांत बरेच काही करून आणि घडवून दाखवले. जनतेच्या मनात जी अविश्वासाची किरणे होती त्यांचे रूपांतर विश्वासाच्या किरणांत करण्याची किमया ‘ठाकरे सरकार’ने शंभर दिवसांत केली. त्यामुळे शंभर दिवसांचे संचित घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत जात असतील व श्रीरामाच्या चरणी कार्याची फुले अर्पण करणार असतील तर त्यांचे स्वागत करायला हवे. काही सरकारे फक्त दिवस ढकलतात किंवा मोजत बसतात. पंधरा दिवसांचा टप्पा पार केला तरी जाहिरातरूपाने उत्सव साजरा करतात. अशा जाहिरातबाज राजकारण्यांचे मुखवटे गेल्या शंभर दिवसांत महाराष्ट्रात फाटलेच आहेत. त्या मुखवटेबाजांची होळी करून मुख्यमंत्री ठाकरे अयोध्येस निघाले आहेत. उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा कोणत्याही मतलबाशिवाय आहे. महाराष्ट्रात तीन वेगवेगळ्या अशा भिन्न विचारधारेचे लोक एकत्र आले व त्यांनी सरकार स्थापन केले. हे सरकार देशाच्या घटनेनुसारच चालले आहे. अशा सरकारचे नेतृत्व ठाकरे करीत असल्यामुळे ते आता अयोध्येस कसे जाणार? श्रीरामाचे दर्शन कसे घेणार? असे पाणचट प्रश्न राज्यातील विरोधकांनी विचारले. आता उद्धव ठाकरे हे अयोध्येस पोहोचत आहेत. त्यामुळे विरोधकांची साफ पंचाईत झाली. सरकार कोणाच्याही पाठिंब्याने चालत असले तरी श्री. उद्धव ठाकरे व शिवसेना आतून-बाहेरून जशी होती तशीच आहे. विचार आणि भूमिकेत कोणतेही बदल झाले नाहीत. प्रभू श्रीराम किंवा हिंदुत्व ही काही

एकाच पक्षाची जहागिरी

नाही. अयोध्येचा राजा हा सगळ्यांचाच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी म्हणतात ते खरेच आहे. ‘हिंदुत्व’ ही एकाच पक्षाची मक्तेदारी नाही. त्यामुळे अयोध्या सगळ्यांची आहे. अयोध्येतील राजकीय आणि संस्कृतीचा संघर्ष आता संपला आहे. त्याबद्दल देशाच्या सर्वोच्च न्यायमंदिराचे आभार मानावे तेवढे थोडेच. न्यायमंदिराने देशातील सगळ्यात मोठय़ा प्रश्नावर तोडगा दिला. अयोध्येत राममंदिर होईल व मशिदीसाठी पाच एकर वेगळी जागा दिली जाईल या निर्णयाचे स्वागत सर्वच राजकीय पक्षांनी केले. काही जण सदैव विरोधाचा कापूस पिंजत बसतात. त्या पिंजण्यातून ना धागा बनतो, ना वस्त्र्ा. अशा मांजरपाटांच्या विरोधाची पर्वा न करता अयोध्येत राममंदिर उभे राहील. राममंदिर हा फक्त धर्माचा आणि राजकारणाचा विषय नव्हता. तो तितकाच राष्ट्रीय अस्मितेचाही विषय आहे. अयोध्या नगरी ही प्रभू श्रीरामाची हे सिद्ध करण्यासाठी देशाला मोठा संघर्ष करावा लागला. त्या संघर्षात अनेकांचे खरे दात दिसले, अनेकांचे मुखवटे गळून पडले, पण अयोध्येचे रण लढणाऱयांच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहिले ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेच. देशातील नव्हे, तर जगातील तमाम हिंदूंच्या मनात त्या दिवशी एक विश्वास निर्माण झाला. ज्या क्षणी शिवसेनाप्रमुखांनी परिणामांची पर्वा न करता कडाडून सांगितले, ‘‘होय, अयोध्येत राममंदिरच होईल. बाबरीचे घुमट ज्यांच्या मजबूत इराद्यांनी कोसळले ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा गर्व आहे, अभिमान आहे.’’ शिवसेनाप्रमुखांची ही वाणी आकाशात हजारो विजा एकाच वेळी कडाडाव्यात अशीच होती. या विजांच्या लखलखाटात देशाची हिंदू संस्कृती

तेजाने उजळून

निघाली. त्याच तेजाच्या किरणांनी हिंदू समाजाला सत्तेचा मार्ग दाखवला. त्यामुळे देशाची सध्याची राजकीय घडी निर्माण करण्यात श्रीरामाइतकेच हिंदुहृदयसम्राटांचे योगदान कोणालाच नाकारता येणार नाही. अयोध्येत भव्य राममंदिर उभारले जाईल, त्या मंदिराच्या कळसावर झेंडा फडकवला जाईल, पण मंदिराचा पाया हजारो रामभक्तांच्या रक्ताने शिंपला आहे. त्यांना कोणताही राजकीय पक्ष नव्हता. अयोध्येतील राममंदिराची पहिली पायरी ही शिवसेनाप्रमुखांच्या हिमतीतून उभी राहिली याची जाणीव अयोध्या नगरीस आहेच. बाळासाहेब ठाकरे अयोध्या नगरीच्या मनामनांत आहेत याचा अनुभव आम्ही अनेकदा घेतला आहे. स्वतः उद्धव ठाकरे हे अयोध्येत जात आहेत ते त्याच एका श्रद्धेने. हातात सत्ता नव्हती तेव्हाही ते रामचरणी गेले. आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावरही ते अयोध्येत जात आहेत ते त्याच नम्र भावाने. प्रभू श्रीराम हे सगळ्यांचेच आहेत. ‘ठाकरे सरकार’ अयोध्येतून रामराज्यातल्या जनहिताच्या कार्याची ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात येतील. महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, महिला, आबालवृद्ध हे सुखाने नांदावेत, राज्याच्या बोकांडी बसलेली ईडापीडा टळावी, राज्यात एकात्मता आणि बंधुभाव नांदावा अशी प्रार्थना ‘ठाकरे सरकार’ रामचरणी करतील व प्रभू श्रीराम त्यांना महाराष्ट्राच्या बळकटीसाठी आशीर्वाद देतील. हे राज्य श्रींचे आहे. म्हणजे छत्रपती शिवरायांचे आहे. ते छत्रपतींच्या न्यायबुद्धीने, तितकेच श्रीरामांच्या सत्य मार्गाने चालेल. जनतेला दिलेल्या वचनांना जागणारी कर्तव्यबुद्धी सरकारच्या विचारात असणे हेच रामराज्य ठरते. हेच राज्य महात्मा गांधींना हवे होते. महाराष्ट्रात त्याच विचारांचे राज्य चालले आहे. ते तसेच चालत राहील. पाठीशी श्रीराम आहेतच!

आपली प्रतिक्रिया द्या