सामना अग्रलेख – भीती आणि धास्ती

देशभरातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस फुगतच चालला आहे. डिसेंबरच्या मध्याला रोजची रुग्णवाढ केवळ 13 हजार होती ती 4 जानेवारीला 58 हजार आणि आता 90 हजारांच्या पुढे गेली आहे. तिसऱया लाटेची खरी भीती हीच आहे. त्यात ओमायक्रोनमुळे जगाला आणखी एका नवीन व्हेरिएंटचा धोका आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. म्हणजे नवनव्या व्हेरिएंटची धास्ती काही कमी होण्याची चिन्हे नाहीत. कोरोना, भीती आणि धास्ती असे भूत जगाच्या मानगुटीवर बसले आहे. ते कधी उतरणार, हा जगाला पडलेला प्रश्न आहे. तूर्त तरी त्याचे उत्तर कोणाकडेच नाही. तोपर्यंत सरकारी सूचना आणि कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन हाच एकमेव पर्याय आणि उपाय आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत वेगाने वाढू लागली आहे. पंधरा दिवसांपूर्वी काहीच राज्यांत आणि दोन आकडय़ांत असलेला ओमायक्रोन हा कोरोनाचा भाऊबंद 26 राज्यांमध्ये आणि चार आकडय़ांत वावरू लागला आहे. आकडय़ांच्याच भाषेत बोलायचे तर मागील दिवसाच्या तुलनेत गेल्या 24 तासांत देशभरात थोडेथोडके नव्हे तर 90 हजार नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. ही वाढ तब्बल 56 टक्के एवढी प्रचंड आहे. दिवसागणिक कोरोना रुग्ण 50-55 टक्क्यांनी वाढू लागले तर दुसऱया लाटेपेक्षाही तिसऱया लाटेतील कोरोनाचा विस्फोट भयंकर असेल हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. आपल्या देशात तर मागील आठ दिवसांत चित्र एकदमच बदलले आहे. देशातील जी रुग्णसंख्या दिवसाला 15 हजार होती ती एका झटक्यात 90 हजारांपर्यंत पोहोचली आहे. हा झपाटा असाच राहिला तर नजीकच्या भविष्यात तिसरी लाट अक्राळविक्राळ रूप धारण करू शकते. दुसऱया लाटेच्या वेळी रोजची रुग्णसंख्या 3-4 लाख होती. त्यावेळी देशभरातील वैद्यकीय यंत्रणा कोलमडूनच पडली होती. उपचार आणि ऑक्सिजनअभावी हजारो रुग्णांचा मृत्यू झाला होता. आता तर संक्रमण दर पाचपट आहे. कोरोना आजाराचे स्वरूप तूर्त ‘सौम्य’ दिसत असले तरी रुग्णसंख्येचा

भयंकर विस्फोट

सगळे चित्र पालटू शकतो. कोरोनाच्या तिसऱया लाटेचा खरा धोका हाच आहे आणि तो जनतेनेही ओळखायला हवा. नेहमीची बेफिकिरी संकट आणखी गडद करू शकते. ही परिस्थिती ओढवली जाऊ नये यासाठी राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करीत आहेच, पण नेहमीप्रमाणे येथे जनतेचेही सहकार्य अपेक्षित आहे. एकटय़ा मुंबईत 24 तासांतील कोरोना रुग्णांची वाढ 15 हजार एवढी आताच झाली आहे, तर राज्यभरात ती 25 हजार 538 अशी आहे. पुन्हा तिसऱया लाटेचे तडाखे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱयांनाही बसू लागले आहेत. मुंबईत वेगवेगळय़ा रुग्णालयांमधील जवळजवळ 200 डॉक्टर्सना कोरोनाची लागण झाली आहे. तूर्त प्रशासनाचा भर ‘ऑगमेंटेड रिस्ट्रिक्शन्स’वर आहे आणि ते योग्यच आहे, पण भविष्यात कोरोनाची तिसरी लाट किती मोठी होते याचाही विचार करावा लागेलच. गर्दी आणि कोरोना वाढ हेच सूत्र आहे आणि ते मोडून काढल्याशिवाय कोरोनावरील नियंत्रण शक्य होणार नाही. त्यामुळेच 15 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील महाविद्यालये ‘ऑनलाइन’च सुरू ठेवण्यात येणार आहेत. पहिली ते आठवीचे वर्गही बंदच राहणार आहेत. लहान मुलांच्या

लसीकरणालाही वेग

देण्यात आला आहे. इतरही सर्व यंत्रणा ‘हाय ऍलर्ट’वर ठेवण्यात आल्या आहेत. कारण आधीच्या ‘डेल्टा’पेक्षा ‘ओमायक्रोन’ पाचपट अधिक वेगाने संक्रमित होतो हे आता सिद्धच झाले आहे. कोरोनाची दुसरी लाट शिखरावर होती त्यावेळी कोरोनाचा संक्रमण प्रसार दर (आर. व्हॅल्यू) 1.69 होता. आता हा दर तिसऱया लाटेच्या प्रारंभीच 2.67 एवढा झाला आहे. म्हणूनच देशभरातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस फुगतच चालला आहे. डिसेंबरच्या मध्याला रोजची रुग्णवाढ केवळ 13 हजार होती ती 4 जानेवारीला 58 हजार आणि आता 90 हजारांच्या पुढे गेली आहे. कोरोना संसर्गाचा हा महाप्रचंड वेग हेच सध्याचे आव्हान आहे. तिसऱया लाटेची खरी भीती हीच आहे. त्यात ओमायक्रोनमुळे जगाला आणखी एका नवीन व्हेरिएंटचा धोका आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. म्हणजे नवनव्या व्हेरिएंटची धास्ती काही कमी होण्याची चिन्हे नाहीत. कोरोना, भीती आणि धास्ती असे भूत जगाच्या मानगुटीवर बसले आहे. ते कधी उतरणार, हा जगाला पडलेला प्रश्न आहे. तूर्त तरी त्याचे उत्तर कोणाकडेच नाही. तोपर्यंत सरकारी सूचना आणि कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन हाच एकमेव पर्याय आणि उपाय आहे.