सामना अग्रलेख – निवडणूक आयोगाला जनता चाबकाने फोडेल!

राहुल गांधी यांनी मतचोरीचा जो बॉम्ब फोडला त्यामुळे सगळ्यांचेच मुखवटे गळून पडले. मतदारांची फसवणूक करून मोदी, फडणवीस वगैरे लोक निवडणूक जिंकले. हे देशाचे अपराधी आहेत. निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे यांचा त्यांना विसर पडला आहे. भोळ्या लोकांना फसविणे हे या संस्थेचे काम बनले असून ते वेगळ्याच नशेत धुंद झाले आहेत. ही भोळी जनता संतापून रस्त्यावर उतरली तर आयोगाची खैर नाही. इंडिया गेटसमोर निवडणूक आयोगाला जनता चाबकाने फोडेल, इतका अंत पाहू नये.

भारताचा निवडणूक आयोग म्हणजे एक भाजपपुरस्कृत बिनपैशांचा तमाशा झाला आहे. सध्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांचा कारभार आणि भाजपची चमचेगिरी पाहिली की, त्यांच्या आधीचे निवडणूक आयुक्त बरे होते असेच म्हणावे लागेल. सध्याचे महान निवडणूक आयुक्त हे अमित शहांबरोबर आधी गृहखात्यात व नंतर सहकार मंत्रालयात काम करत होते आणि शहांनीच या महाशयांना निवडणूक आयुक्तपदी चिकटवले. त्यामुळे हे निवडणूक आयुक्त श्री. शहांच्या चापलुसीशिवाय दुसरे काय करू शकणार? निवडणूक आयोग व भाजपने ‘युती’ करून मतांची चोरी केली, हे राहुल गांधी यांनी पुराव्यासह सिद्ध केले. या चोरीचा कट कसा शिजला, काय डावपेच रचले, निवडणूक आयोग या मतचोरी प्रकरणात कसा सहभागी होता, हे गांधी यांनी दणकून सांगितले. त्यामुळे भारतीय लोकशाही व सध्याच्या निवडणूक यंत्रणेचा मुखवटाच ओरबाडला गेला. एखादा निवडणूक आयुक्त असता तर नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा दिला असता व भारतीय जनतेची माफी मागितली असती. किमान पन्नास लोकसभा मतदारसंघांत मतांची मोठी हेराफेरी केल्यामुळेच मोदी हे पुन्हा पंतप्रधान होऊ शकले. पंचवीस मतदारसंघ असे आहेत की, जेथे शेवटच्या फेरीपर्यंत भाजपविरोधक आघाडीवर होते. तेथे मतमोजणी थांबवून गोंधळ निर्माण केला व शेवटी भाजप उमेदवारास विजयी घोषित केले. जयपूर ग्रामीण मतदारसंघातील काँगेसचे उमेदवार चोपडा हे मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत आघाडीवर होते. तेथे मतमोजणी थांबविण्यात आली, पोस्टल बॅलटचा घोळ घालण्यात आला व भाजपच्या उमेदवारास विजयी घोषित केले. मुंबईत शिवसेनेच्या अमोल कीर्तिकरांच्या बाबतीत तेच केले. अशा पद्धतीने 50-55 मतदारसंघांत मते व विजय चोरण्यात आला हे स्पष्ट दिसते. राहुल गांधी यांनी हे सर्व उघड केले. या सगळ्या घोटाळ्यांची चौकशी करण्याची गरज आहे, पण आयोग चौकशीचे नाव काढत नाही. उलट तुम्ही सांगताय ते सत्य आहे असे शपथपत्र राहुल गांधींकडे मागितले जातेय. आपली माहिती खरी आहे असे स्वाक्षरीसह शपथपत्र लिहून द्यावे, असा

निर्लज्ज प्रतिवाद

भारताच्या निवडणूक आयोगाने केला. राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत व त्यांनी संसदेत संविधानानुसार शपथ घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर निवडणूक आयोगाने विश्वास ठेवायला हवा. उलट शपथेवर लिहून द्या, असले बकवास प्रकार आयोग करीत असेल तर राहुल गांधींच्या आरोपावर निष्पक्ष चौकशी करण्याचे सोडून ‘आयोग’ भाजपची चोरी समर्थनीय ठरवीत आहे. देशातील संविधानिक संस्था नष्ट होत चालल्या आहेत. पंतप्रधान मोदी निवडणूक घोटाळा करून पंतप्रधान झाले हे भारताच्या लोकशाहीवर आलेले संकट आहे. भाजपने 35 हजार किंवा त्यापेक्षा कमी मताने जिंकलेल्या पंचवीसच्या वर जागांवर जो घोटाळा झाला, त्याचा इलेक्ट्रॉनिक डेटा निवडणूक आयोगाने नष्ट केला याचा काय अर्थ समजायचा? राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर पद्धतशीर शस्त्रक्रिया केली आहे. गांधीचे म्हणणे आहे की, निवडणूक आयोगाने आम्हाला गेल्या 10 वर्षांची संपूर्ण इलेक्ट्रॉनिक मतदार यादी द्यावी आणि व्हिडीओग्राफी देशाला द्यावी. जर हे सर्व दिले नाही तर तो गुन्हा आहे. कर्नाटकच्या महादेवपुरा विधानसभेत 6.50 लाख मते आहेत. त्यातली सुमारे एक लाख मते चोरीला गेली. चोरी पाच-सहा प्रकारची आहे. डुप्लिकेट मतदार म्हणून भाजपने घुसवलेल्या त्या मतदाराने पाच-सहा वेळा मतदान केले. एका मतदाराने अनेक वेळा बिनधास्त मतदान केले व त्याला कोणी रोखले नाही. अशा किमान 40 हजार मतदारांनी एकाच विधानसभा मतदारसंघात अनेक वेळा मतदान केले व ज्यांचा धड कोठे पत्ताही नव्हता. एकेका पत्त्यावर 40-40 मतदार नोंदवले गेले. हे सर्व निवडणूक आयोगाच्या सहकार्याशिवाय कसे होऊ शकेल? महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही हेच घडवले गेले. मोठय़ा प्रमाणात बोगस मतदान करून घेतले. काही हजार मते अशी होती की, त्यात ‘फॉर्म 6’ चा उघड गैरवापर झाला. ‘फॉर्म 6’ नवीन मतदारांसाठी आहे, परंतु हजारो मतदार असे आहेत की, ज्यांचे वय 60, 70 आणि 80 वर्षे आहे. या

डुप्लिकेट मतदारांनी

आधी कर्नाटकात मतदान केले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात मतदान केले आणि उत्तर प्रदेशातही मतदान केले. बिहारमध्ये मोठा गाजावाजा आणि ‘पारदर्शकते’चा आव आणत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांबाबत ‘विशेष मोहीम’ राबवली. 1 ऑगस्ट रोजी एक मतदार यादी आयोगाने तेथे जारी केली. मात्र त्यातील नवे घोळ आणि घोटाळे आता चव्हाट्यावर येत आहेत. मुजफ्फरपूरच्या भगवानपूर विधानसभा मतदारसंघात बूथ क्र. 370 वरील एकूण 619 मतदारांपैकी तब्बल 269 मतदारांची नावे ‘घर क्र. 27’ या एकाच पत्त्यावर नोंदवलेली दिसत आहेत. जमुईमध्येदेखील बूथ क्र. 86 वरील एकूण 618 मतदारांपैकी 247 मतदारांची नोंद ‘घर क्र. 3’ या एकाच पत्त्यावर दिसत आहे. एकाच घरात 269 आणि 247 एवढे मतदार कसे राहू शकतात? ‘विशेष मोहिमे’च्या नावाखाली बिहारमध्येही गडबड – घोटाळे करण्याचे निवडणूक आयोगाचे उद्योग सुरूच आहेत असाच याचा अर्थ. या पद्धतीने भारतीय लोकशाहीचा बट्ट्याबोळ भाजप करत आहे तो निवडणूक आयोगाला हाताशी धरून. राहुल गांधी यांनी हे सर्व पुराव्यांसह मांडले व देशातील कोट्यवधी मतदारांना खात्री पटली की, मोदी यांनी मतांची चोरी करून निवडणूक जिंकली. ‘आपल्याला फसवले, ठगवले’ अशी भावना मतदारांची झाली. लोकसभेत आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजप जिंकल्याचा विजयोत्सव कोठेच साजरा झाला नाही. लोकांनी जल्लोष वगैरे केला नाही तो यामुळेच. कारण भाजप आणि मिंध्यांचा विजय खरा नव्हता. भाजप जिंकला यावर लोकांचा आजही विश्वास बसत नाही. महाराष्ट्रातील विजयाचे श्रेय कोणी ‘लाडकी बहीण’सारख्या योजनांना, भाजप-मिंध्यांच्या पैसे वाटपाला देत असले तरी इतका मोठा विजय मिळणे शक्य नव्हते. राहुल गांधी यांनी मतचोरीचा जो बॉम्ब फोडला त्यामुळे सगळ्यांचेच मुखवटे गळून पडले. मतदारांची फसवणूक करून मोदी, फडणवीस वगैरे लोक निवडणूक जिंकले. हे देशाचे अपराधी आहेत. निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे याचा त्यांना विसर पडला आहे. भोळ्या लोकांना फसविणे हे या संस्थेचे काम बनले असून ते वेगळ्याच नशेत धुंद झाले आहेत. ही भोळी जनता संतापून रस्त्यावर उतरली तर आयोगाची खैर नाही. इंडिया गेटसमोर निवडणूक आयोगाला जनता चाबकाने फोडेल. इतका अंत पाहू नये. हे सर्व गुन्हे मूकबधिरपणे पाहणाऱ्या सुप्रीम कोर्टाचीही आम्हाला चिंता वाटते. निवडणूक आयोगाप्रमाणे भारताचे सुप्रीम कोर्टही मोदी-शहांच्या अंगठ्याखाली आहे काय?