सामना अग्रलेख – शाल, श्रीफळ, ताम्रपट!

फडणवीस व त्यांच्या टोळीवर भ्रष्टाचारासह बेकायदेशीर फोन टॅपिंगचे आरोप होते. चौकशीत तसे पुरावे समोर आले. ज्या गुन्हे शाखेने अजित पवारांच्या घोटाळ्याची आधी चौकशी केली व आता क्लीन चिट दिली, त्याच तपास यंत्रणेने हा तपास केला, पण सत्तेवर येताच हे सर्व तपास फडणवीसांनी थांबवले व गुन्हेच रद्द केले. स्वतःच स्वतःला व आपल्या टोळीला क्लीन चिट देऊन मोकळे झाले. आता अजित पवार यांनाही स्वच्छ करून घेतले. अजित पवार यांना क्लीन चिट दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ व मानाचा ताम्रपट देण्याचा सोहळा फडणवीसांनी आयोजित करावा.

अजित पवार व त्यांच्या कुटुंबाने भ्रष्टाचार करून महाराष्ट्र लुटला आहे, असा गंभीर आरोप देशाचे पंतप्रधान मोदी यांनी जाहीरपणे केला होता. त्यास वर्षही झाले नसेल. राज्य सहकारी बँक म्हणजे शिखर बँकेतील कोट्यवधींची अफरातफर व 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा अजित पवारांनी केला. त्याबद्दल पंतप्रधान मोदी हे अजित पवार यांना तुरुंगातच टाकायला निघाले होते. अजित पवार हे भ्रष्टाचारी असून त्यांना तुरुंगात चक्की पिसायला लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनीही केला, पण पवार व त्यांचे कुटुंब भाजपमध्ये गेले व त्यामुळे या सर्व घोटाळ्यातून मोदी, फडणवीस व त्यांच्या चौकशी यंत्रणांनी अजित पवार यांना ‘क्लीन चिट’ दिली. देशाचे पंतप्रधान बोलतात तेव्हा ते खरेच बोलत असावेत या विश्वासाला यामुळे तडे गेले आहेत. अजित पवार हे सध्या भाजपच्या तंबूत शिरले आहेत व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढत आहेत. याचे बक्षीस म्हणून भाजपने पवार व त्यांच्या पत्नीस घोटाळ्यातून मुक्त केले. अजित पवार हे खरोखरच ‘क्लीन’ किंवा निर्दोष असतील तर पंतप्रधान मोदी हे त्यांच्यावरील आरोपांबाबत धादांत खोटे बोलले, असेच म्हटले पाहिजे. या खोटेपणाबद्दल नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण पवार कुटुंबाची आणि महाराष्ट्राचीच माफी मागायला हवी. अजित पवारांच्या घोटाळय़ाचा तपास करणाऱया गुन्हे शाखेने जाहीर केले की, अजित पवार हे बेदाग आहेत. कर्जवाटपात आणि जरंडेश्वर साखर कारखाना विक्रीत शिखर बँकेला काहीही तोटा झालेला नाही.

जरंडेश्वर साखर कारखान्याचा

मुद्दा मुलुंडचा नागडा पोपटलाल किरीट सोमय्या याने उजेडात आणला होता. शिखर बँकेने गुरू कमॉडिटी प्रा. लिमिटेड या कंपनीला जरंडेश्वर साखर कारखाना 65 कोटी रुपयांमध्ये विकला. प्रत्यक्षात ही मालमत्ता अनेक पट जास्त किमतीची होती, पण हा कारखाना स्वस्तात विकत घेऊन लगेच खासगी जरंडेश्वर शुगर मिलला भाडे करारावर दिला. या सगळ्यात अजित पवार व त्यांचे कुटुंब होते. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंडळ म्हणजे नाबार्डने 2011 मध्ये शिखर बँकेतील या व्यवहाराची चौकशी करून बँकेला 144 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा ठपका ठेवला होता. सर्व नियम धाब्यावर बसवून सहकारी साखर कारखाने विक्रीस काढले आणि सूत गिरण्यांना मनमानी पद्धतीने कर्जवाटप करून बँकेला तोट्यात आणले, असा ठपका बँकेच्या संचालक मंडळावर ठेवण्यात आला होता. शिखर बँक प्रकरणात अजित पवार यांना तुरुंगात टाकू, अशा धमक्या भाजपकडून दिल्या गेल्या व अटक होईल याच भीतीने अजित पवार हे राष्ट्रवादीच्या चाळिसेक आमदारांसह भाजपच्या तंबूत शिरले. परिणामी अजित पवार यांना आता या घोटाळ्यातून निर्दोष मुक्ततेची बक्षिसी मिळाली. पोलीस यंत्रणेचे खच्चीकरण करण्याचाही हा प्रकार आहे. तपास यंत्रणांचा वापर करून आपल्या राजकीय विरोधकांना जेरीस आणायचे व हे लोक भाजपमध्ये आले की, त्यांना त्याच तपास यंत्रणांकडून ‘क्लीन चिट’ द्यायला लावायची. नागडे महाराज किरीट सोमय्या यांनी आता अजित पवारांचा नागरी सत्कार भाजपच्या मुख्यालयात केला पाहिजे. ‘जरंडेश्वर कारखान्यात घोटाळा झाला असून अजित पवारांना ‘हिसाब’ द्यावाच लागेल,’ अशी या नागडे महाराजांची ईर्षा होती. त्यामुळे

खोटे आरोप करणाऱ्या

या नागडे महाराजांनाच कोर्टात खेचायला हवे व ते काम अजित पवार यांच्या स्वाभिमानी कुटुंबाने करायचे आहे. मोदी व त्यांचे लोक एकतर खोटेच खोटे बोलतात किंवा भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देऊन देश लुटणाऱयांच्या टोळीशी भागीदारी करतात. अजित पवार हे घाबरले नसते व हिमतीने काम केले असते तर त्यांचा बालही बांका झाला नसता, पण भाजपकडे लोकांना घाबरवण्याची, दहशत निर्माण करण्याची यंत्रणा आहे. मोदी, फडणवीस, अमित शहा यांच्या हाती ईडी, सीबीआय, पोलीस आहेत म्हणून ते छातीचा फुगा फुगवून चालतात व बोलतात. प्रत्यक्षात त्यांची छाती म्हणजे माचीसचा रिकामा खोका आहे. एकनाथ शिंदे व त्यांचे लोकही अशाच भीतीपोटी पळून गेले. त्यांना चौकश्या व अटकेची भीती दाखवली गेली व त्यांच्या कमरेवरचे वस्त्र ओले झाले. शिंदे म्हणतात, ठाकरे यांचे सरकार फडणवीस, दरेकर, गिरीश महाजन, लाड वगैरे लोकांना अटक करणार होते. हे सर्व सांगत बसण्यापेक्षा फडणवीसांचे सरकार शिंदे यांच्या अटकेची का तयारी करत होते व अटक टाळण्यासाठी घाबरगुंडी उडालेले आपण स्वतः कसे पळून गेलो व भाजपच्या गोठ्यात सामील झालो हे त्यांनी स्पष्ट करायला हवे. फडणवीस व त्यांच्या टोळीवर भ्रष्टाचारासह बेकायदेशीर फोन टॅपिंगचे आरोप होते. चौकशीत तसे पुरावे समोर आले. ज्या गुन्हे शाखेने अजित पवारांच्या घोटाळ्याची आधी चौकशी केली व आता क्लीन चिट दिली, त्याच तपास यंत्रणेने हा तपास केला, पण सत्तेवर येताच हे सर्व तपास फडणवीसांनी थांबवले व गुन्हेच रद्द केले. स्वतःच स्वतःला व आपल्या टोळीला क्लीन चिट देऊन मोकळे झाले. आता अजित पवार यांनाही स्वच्छ करून घेतले. अजित पवार यांना क्लीन चिट दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ व मानाचा ताम्रपट देण्याचा सोहळा फडणवीसांनी आयोजित करावा.