सामना अग्रलेख – डोंबिवलीतील स्फोट! भोपाळच्या दिशेने…

डोंबिवलीच्या केमिकल कंपनीतील स्फोटात 11 जणांचे बळी गेले. तेथील केमिकल कंपन्यांमध्ये वारंवार होणारे स्फोट व सततच्या वायूगळतीच्या घटना पाहता येथील केमिकल झोनची वाटचाल ‘भोपाळ वायू दुर्घटने’च्या दिशेने सुरू आहे अशी भीती वाटते. हा संपूर्ण पट्टा ‘सुप्त केमिकल ज्वालामुखी’ बनला आहे. आणखी किती स्फोटांनंतर राज्यकर्त्यांना त्याची जाणीव होणार आहे? डोंबिवलीतील स्फोटाच्या विध्वंसक घटनेनंतर तरी भानावर या आणि डोंबिवलीसह त्या परिसरातील आणि मुंबईलगतच्या सर्व केमिकल कंपन्यांचे सुरक्षा ऑडिट करा!

डोंबिवलीतील एका रासायनिक कंपनीत झालेल्या भयंकर स्फोटाने व मनुष्यहानीने तेथील औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गुरुवारी दुपारी डोंबिवली एमआयडीसीच्या फेज-2 मधील ‘अमुदान’ कंपनीत रिअॅक्टरचा शक्तिशाली स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, तब्बल 5 किलोमीटरच्या परिसरात त्याचे हादरे जाणवले. कानठळ्या बसवणाऱ्या स्फोटाने आगीचे व धुराचे लोट आकाशाला भिडले. स्फोटाच्या हादऱ्याची व अग्नितांडवाची झळ आजूबाजूच्या 11 कंपन्यांना तर पोहोचलीच; शिवाय एमआयडीसीलगतच्या निवासी भागातील 15 इमारतींनाही तडे गेले. आधीच आकाशातून सूर्य आग ओकत असताना रिअॅक्टर फुटून झालेल्या स्फोटाने उकळत्या रसायनांमध्ये होरपळून अनेक कामगार जखमी झाले. स्फोटाच्या वेळी अमुदान कंपनीत सुमारे 50 कामगार काम करीत होते. काही कामगार जीव मुठीत धरून पळाले म्हणून वाचले; पण 11 कामगारांना मात्र बचावाची संधी मिळाली नाही. काही कळायच्या आत त्यांचा होरपळून मृत्यू झाला. आसपासच्या 10-12 कंपन्यांनाही स्फोटाचा व आगीचा तडाखा बसला व तिथे काम करणारे अनेक कामगारही होरपळून जखमी झाले. या स्फोटात जखमी झालेल्या 63 जणांपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. तब्बल 11 जणांचे बळी घेणाऱ्या या स्फोटाकडे केवळ एक दुर्घटना म्हणून पाहण्याचे पाप

राज्यातील ‘तीन तिघाडा’ सरकारने

व प्रशासनाने करू नये. कारण डोंबिवली एमआयडीसीतील अशा प्रकारच्या स्फोटाची ही काही पहिलीच घटना नाही. तेथील रासायनिक कंपन्यांमध्ये वारंवार अशा स्फोटाच्या घटना घडत असतील तर त्यावर केवळ दुर्घटनेचा शिक्का मारून गप्प बसता येणार नाही. घातपाताच्या घटनेप्रमाणे जबाबदारी निश्चित करून कारवाई झाल्याशिवाय स्फोटांचे हे सत्र थांबणार नाही. गेल्या 7-8 वर्षांत डोंबिवलीच्या एमआयडीसीमध्ये रासायनिक कंपन्यांमध्ये स्फोट होण्याची मालिकाच सुरू आहे. आठ वर्षांतील हा तब्बल 36 वा स्फोट आहे आणि आजवर या घटनांमध्ये 35 जणांचा मृत्यू झाला आहे. मुळात रासायनिक कंपनी म्हणजे अत्यंत ज्वलनशील मामला. चोवीस तास जीव धोक्यात घालूनच तेथील कामगार, अधिकाऱ्यांना वावरावे लागते. कायमच जिवाशी खेळ. शिवाय कमी खर्चात अकुशल मनुष्यबळ वापरून अधिकाधिक नफा कमावण्याची विकृत मानसिकताही बऱयाचदा अशा भयंकर घटनांना जन्म देत असते. कामगारांचे जीव कवडीमोल आहेत, असे कंपन्यांच्या मालकांना व औद्योगिक सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांना वाटते काय, असा प्रश्न डोंबिवलीच्या स्फोटाने उपस्थित केला आहे. रासायनिक कंपन्यांसाठी घालून दिलेल्या सुरक्षाविषयक नियमावलीचे किती कंपन्या काटेकोरपणे पालन करतात व त्याकडे डोळ्यात तेल घालून

लक्ष देण्याची जबाबदारी

ज्या अधिकाऱयांवर आहे ते कितपत आपले कर्तव्य बजावतात हादेखील कळीचा मुद्दा आहे. रासायनिक कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ व सुरक्षाविषयक उपकरणे किती रासायनिक कंपन्यांकडे आहेत, हा दुसरा प्रश्न. शिवाय अशा कंपन्यांमध्ये काम करण्यातील धोके व तेथे काम करत असताना होणारी क्षुल्लक मानवी चूकही किती धोकादायक ठरू शकते याविषयी तमाम कर्मचारी वर्गाला कितपत प्रशिक्षित केले जाते हादेखील मुद्दा आहेच. औद्योगिक सुरक्षेच्या नियमांची ऐसीतैसी करून वाट्टेल तशा रासायनिक प्रक्रियांचे उद्योगधंदे जिवाशी खेळ ठरत असतील तर ते काय कामाचे? डोंबिवलीच्या केमिकल कंपनीतील स्फोटात 11 जणांचे बळी गेले. या कामगारांच्या कुटुंबांचा वाली आता कोण आहे? तेथील केमिकल कंपन्यांमध्ये वारंवार होणारे स्फोट व सततच्या वायूगळतीच्या घटना पाहता येथील केमिकल झोनची वाटचाल ‘भोपाळ वायू दुर्घटने’च्या दिशेने सुरू आहे अशी भीती वाटते. हा संपूर्ण पट्टा ‘सुप्त केमिकल ज्वालामुखी’ बनला आहे. आणखी किती स्फोटांनंतर राज्यकर्त्यांना त्याची जाणीव होणार आहे? डोंबिवलीतील स्फोटाच्या विध्वंसक घटनेनंतर तरी भानावर या आणि डोंबिवलीसह त्या परिसरातील आणि मुंबईलगतच्या सर्व केमिकल कंपन्यांचे सुरक्षा ऑडिट करा!