सामना अग्रलेख – ‘खोकी’ खर्ची पडतील काय? शेतकऱ्यांच्या आत्महत्या!

गेल्या आठ महिन्यांमध्ये मराठवाडय़ात 685 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे हे उच्चांकी प्रमाण शरमेने मान खाली घालायला लावणारे आहे. दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि अत्यल्प पावसामुळे मराठवाडय़ावर ओढवलेले दुष्काळाचे भीषण सावट पाहता आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याचा धोका आहे. कमालीचे नैराश्य आणि वैफल्य यामुळे मराठवाडय़ातील शेतकरी रोज मृत्यूला कवटाळत असतानाच मिंध्यांचे खोकेसरकार मंत्रिमंडळ बैठकीसाठी मराठवाडय़ात येत आहे. जीवन संपवायला निघालेल्या मराठवाडय़ातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या मदतीसाठी या बैठकीतून काही खोकीखर्ची पडतील काय?

राज्यातील ‘एक फुल, दोन हाफ’ सरकार येत्या शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरात मुक्कामाला येत आहे. मिंधे सरकारच्या मंत्रिमंडळाची एक बैठक मराठवाडय़ात घ्यायची, हा सोपस्कार पूर्ण करण्यासाठीच ही बैठक आहे, असे दिसते. अवघे मंत्रिमंडळ शहरात येणार म्हणून सर्वत्र रंगरंगोटीची कामे सुरू आहेत. त्यातच मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवाचा समारोप करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेदेखील 75 मिनिटांच्या दौऱ्यावर येणार असल्याने शहरात रंगसफेदीचे काम जोरात हाती घेण्यात आले आहे. पण दुष्काळाच्या संकटात काळवंडलेल्या मराठवाडय़ाला व मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना या वरवरच्या रंगरंगोटीने काय मिळणार आहे? ऐन पावसाळय़ात ओढवलेले दुष्काळाचे संकट, सततची नापिकी आणि डोक्यावरील कर्जाच्या असहय़ बोजामुळे मराठवाडय़ात रोज कुठे ना कुठे शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. रविवारी तर छत्रपती संभाजीनगर जिल्हय़ात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे झाले एका दिवसाचे. पण गेल्या आठ महिन्यांत मराठवाडय़ात तब्बल 685 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यापैकी 475 शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारी मदतीसाठी पात्र ठरवण्यात आल्या आहेत, तर 200 हून अधिक शेतकरी कुटुंबे मदतीपासून वंचित आहेत. एकीकडे देशात जी-20 शिखर परिषदेच्या आयोजनावरून ‘बघा, देश किती पुढे गेला’, असे ढोल बडवले जात आहेत. समाज माध्यमांवर कायम पडून असलेल्या टोळय़ा वांझोटय़ा उन्मादाचे वातावरण निर्माण करत आहेत. जी-20 चे आयोजन करून जगभरातील राष्ट्रप्रमुखांचे आगतस्वागत केले म्हणजे देशातील सारे प्रश्न जणू काही संपुष्टातच आले आहेत, असे

आभासी चित्र

निर्माण करण्यात भक्तमंडळींच्या टोळधाडी मश्गुल असतानाच महाराष्ट्रातील व खासकरून मराठवाडा, विदर्भातील पिचलेले शेतकरी मात्र गळफास घेऊन वा विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करीत आहेत. हजारो कोटी रुपये खर्च करून आयोजित केलेल्या जी-20 शिखर परिषदेच्या यशाचे गोडवे गाणाऱ्या भाटांची तोंडे आपल्याच प्रांतातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवर मात्र काहीच बोलत नाहीत. महाराष्ट्रातील मिंध्यांच्या सरकारला तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची काही चाड उरली आहे काय? राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्रच सुरू झाले आहे, पण मिंधे सरकारमधील एकही मंत्री-संत्री त्यावर बोलायला तयार नाही. एकमेकांवर कुरघोडय़ा करण्यातच मग्न असलेल्या या तीन पायांच्या सरकारकडे शेतकऱ्यांसाठी वेळ आहे तरी कुठे? तब्बल 40 दिवस पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यातील बहुतांश भागांत खरीप पिकांचा हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. कोरडवाहू जमिनींवरील कापूस, सोयाबीन, मका इत्यादी पिके शेतकऱ्यांच्या डोळय़ांसमोर वाळून गेली. चार दिवसांपूर्वी थोडाफार पाऊस झाला, पण पुन्हा दोन दिवसांपासून कडक ऊन पडू लागले आहे. भरघोस पाऊस पाडणारा ऑगस्ट महिनाही उन्हाळय़ासारखा रखरखीत गेला, त्यामुळे मराठवाडा-विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्हय़ांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. हे संकट साधेसुधे नाही. सप्टेंबरचा निम्मा महिना संपला आहे. पावसाळय़ाचे जेमतेम शेवटचे पंधरा दिवस शिल्लक आहेत. दोन दिवसांच्या शिडकाव्यानंतर पाऊस पुन्हा गायब झाला आहे. गतवर्षी याच महिन्यात राज्यातील सारी धरणे तुडुंब भरली होती. मराठवाडय़ातील जायकवाडीसह अनेक प्रकल्प ओसंडून वाहात होते.

यावर्षी मात्र सारी धरणे

लहान-मोठय़ा प्रकल्पांतील जलसाठा 40 टक्क्यांच्या खालीच आहे. विहिरी, तलावांनी पावसाळय़ातच तळ गाठला आहे. त्यामुळे उन्हाळय़ापर्यंत तग कसा धरायचा आणि शेती, पिके व फळबागा कशा वाचवायच्या, या चिंतेने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. खरीप हंगामासाठी गावातीलच सधन व्यक्तींकडून उधार-पाधार घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी केली. दुष्काळी परिस्थितीने उसनवारी करून केलेली पेरणी तर वाया गेलीच; पण हातउसने म्हणून घेतलेल्या कर्जाची फेड कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या विवंचनेतूनच रविवारी छत्रपती संभाजीनगर जिल्हय़ात तीन शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले. कन्नड तालुक्याच्या हतनूर येथील दिनकर बिडवे या शेतकऱ्याने घरातच गळफास घेतला. फुलंब्री तालुक्यातील माणिकराव पाटोळे आणि वैजापूरमधील अरविंद मतसागर या शेतकऱ्यांनी विषारी औषध घेऊन मरण पत्करले. गेल्या आठ महिन्यांमध्ये मराठवाडय़ात 685 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे हे उच्चांकी प्रमाण शरमेने मान खाली घालायला लावणारे आहे. दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि अत्यल्प पावसामुळे मराठवाडय़ावर ओढवलेले दुष्काळाचे भीषण सावट पाहता आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याचा धोका आहे. कमालीचे नैराश्य आणि वैफल्य यामुळे मराठवाडय़ातील शेतकरी रोज मृत्यूला कवटाळत असतानाच मिंध्यांचे ‘खोके’ सरकार मंत्रिमंडळ बैठकीसाठी मराठवाडय़ात येत आहे. जीवन संपवायला निघालेल्या मराठवाडय़ातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या मदतीसाठी या बैठकीतून काही ‘खोकी’ खर्ची पडतील काय?