
लडाख हे एक स्वतंत्र राज्य करा आणि तेथे विधानसभा द्या यासाठी बोलणारे, चीनच्या घुसखोरीवर देशाला जागे करणारे, पर्यावरणाची व हिमालयात उभे असलेल्या भारतीय सैनिकांची काळजी वाहणारे वांगचुक यांना मोदी सरकार देशद्रोही ठरवते. सत्य हाच हिंदुत्वाचा आधार आहे, पण भाजपवाल्यांचा पाया लबाडी आणि खोटारडेपणा आहे. त्यामुळे हे लोक हिंदू असूच शकत नाहीत, असा संताप सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी व्यक्त केला तो शंभर टक्के खरा आहे. लडाखमधील तरुणांच्या मनातली आग पाहून भारतातील हुकूमशहा घाबरले, लटपटू लागले व त्यांनी गांधीवादी वांगचुक यांना अटक केली. ब्रिटिशांनी यापेक्षा वेगळे काय केले होते?
पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते जगमान्य तसेच ‘लोकमान्य’ सोनम वांगचुक यांना सरकारने अटक केली. वांगचुक यांची अटक समर्थनीय ठरविण्यासाठी आता ते कसे राष्ट्रद्रोही आहेत वगैरे ठरवण्याचा आटापिटा सुरू झाला आहे. लडाख हिंसाचारामागे पाकिस्तानचा हात आहे व सोनम वांगचुक यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचे आता लडाख पोलीस महासंचालक जामवाल यांनी जाहीर केले. वांगचुक यांनी पाकिस्तानात ‘डॉन’ वर्तमानपत्राच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती, वांगचुक यांनी बांगलादेशलाही भेट दिली होती, अशी फालतू विधाने सरकारतर्फे करण्यात आली आहेत. वांगचुक हे पाकिस्तान किंवा बांगलादेशात गेले असतील तर ते काही चोरट्या मार्गाने घुसखोरी करीत गेले नाहीत. भारतीय पासपोर्टवर दोन्ही देशांचा व्हिसा मिळवून गेले व तेथील सामाजिक कार्यक्रमांना हजेरी लावली. अशा प्रकारे एकदा नरेंद्र मोदीही पाकिस्तानात तेव्हाचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला गेले होते. बांगलादेश हा तर आपला मित्र राष्ट्रच मानला जातो. बांगलादेशच्या पदभ्रष्ट राष्ट्राध्यक्षा शेख हसिना यांना पंतप्रधान मोदी यांनी भारतातच राजकीय आश्रय दिला हे लडाखच्या पोलीस महासंचालकांना माहीत नसावे याचे आश्चर्य वाटते. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी तर सरकारच्या खोटेपणाचा बुरखाच फाडला. त्यांनी सांगितले की, वांगचुक यांचा पाकिस्तान दौरा हा संयुक्त राष्ट्राच्या परिषदेचा भाग होता. ही परिषद पर्यावरण, हवामान बदल या विषयावर होती. वांगचुक यांनी या परिषदेत हवामान बदलाबाबत मार्गदर्शन केले. भारत सरकारच्या परवानगीनेच ते पाकिस्तानात गेले. हे उघड असताना ‘लेह’मधील हिंसाचारात
पाकिस्तानचा हात
आहे व त्यास वांगचुक जबाबदार आहेत असे सांगणे मूर्खपणाचे आहे. वांगचुक हे लेह-लडाखवासीयांच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसले होते. लडाखी जनतेची मागणी काय आहे? लडाखला संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये सामील करा. म्हणजे आम्हाला लोकशाही मार्गाने पूर्ण राज्याचा दर्जा द्या. आता हे वचन कोणी दिले होते? तर प्रत्यक्ष पंतप्रधान मोदी व भारतीय जनता पक्षानेच हे वचन लेह-लडाखवासीयांना दिले. ही वचनपूर्ती करा असा आग्रह धरणाऱ्या वांगचुक यांना आता सरळ राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केली हा मोदी सरकारचा भित्रेपणा आहे. लडाखमध्ये चीन घुसले आहे हे नवीन नाही, पण लडाखची हिंसा पाकिस्तानने घडवली. म्हणजे येथे पाकडेही घुसले आहेत हे मोदी प्रशासन मान्य करते. मोदींचे हे अपयश आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’चा दणका पाकड्यांना हवा तसा बसला नाही व त्यांचे भारतात दहशतवाद, हिंसाचार घडवण्याचे धंदे सुरूच आहेत. मोदी सरकारची ही विफलता आहे. लडाखमध्ये हिंसाचार घडविणाऱ्या पाकिस्तानवर मोदी व अमित शहांनी काय कारवाई केली? पाकिस्तानबरोबरचे युद्ध थांबवताना भारताने म्हणे अशी अट टाकली होती, यापुढे भारताच्या हद्दीतील कोणताही हल्ला किंवा कश्मीर खोऱ्यातील हिंसा म्हणजे भारतावरील युद्ध हल्ला मानून चोख उत्तर दिले जाईल. मग त्या चोख उत्तराचे आता काय झाले? सोनम वांगचुक हे शांततापूर्ण मार्गाने त्यांचे प्रश्न मांडत होते. त्यांनी लडाखच्या जनतेसाठी 16 दिवसांचे उपोषण केले. म्हणजे त्यांचा मार्ग गांधीवादाचाच आहे. सरकारने या 16 दिवसांत वांगचुक यांच्याकडे दुर्लक्ष केले. तेथील जनतेत आपल्याला
फसवल्याची भावना
वाढत गेली. बेरोजगारीने तेथे कळस गाठला. लडाखमध्ये आधीच चीन घुसला आहे. तेथे उद्योगपतींनाही मोठ्या प्रमाणावर जमिनी दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान वाढले. वांगचुक या सगळ्याविरुद्ध धीराने आवाज उठवत राहिले. चीन लडाखमध्ये किती व कसा घुसला हे वांगचुक यांनी मोदी सरकारला दाखवले. त्यामुळे मोदी व भाजपची फजिती झाली. त्याचा सूड म्हणून वांगचुक यांना हिंसाचारी, देशद्रोही वगैरे ठरवून अटक झाली. त्यांचा पाकिस्तानशी संबंध जोडला. त्याच वेळी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना मोदी सरकारच्या परवानगीने खेळवला जात होता व त्यातून झालेली शेकडो कोटींची आर्थिक उलाढाल आणि सट्टेबाजी पाकिस्तानला मदत करत होती. हे सर्व ‘खेळ’ करणारे भाजपचेच सुपुत्र आहेत. या सगळ्यांना सरकार जाब विचारत नाही, पण लडाख हे एक स्वतंत्र राज्य करा आणि तेथे विधानसभा द्या यासाठी बोलणारे, चीनच्या घुसखोरीवर देशाला जागे करणारे, पर्यावरणाची व हिमालयात उभे असलेल्या भारतीय सैनिकांची काळजी वाहणारे वांगचुक यांना मोदी सरकार देशद्रोही ठरवते. सत्य हाच हिंदुत्वाचा आधार आहे, पण भाजपवाल्यांचा पाया लबाडी आणि खोटारडेपणा आहे. त्यामुळे हे लोक हिंदू असूच शकत नाहीत, असा संताप सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी व्यक्त केला तो शंभर टक्के खरा आहे. लडाखमधील तरुणांच्या मनातली आग पाहून भारतातील हुकूमशहा घाबरले, लटपटू लागले व त्यांनी गांधीवादी वांगचुक यांना अटक केली. ब्रिटिशांनी यापेक्षा वेगळे काय केले होते?