सामना अग्रलेख – एपस्टिन कांड, आज काय घडेल?

एपस्टिन फाईल्समध्ये भारतातील काही प्रमुख राजकारणी, आजीमाजी खासदारांचा समावेश आहे त्यामुळे भारतीय राजकारणास धक्के बसतील, असे पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावरून दिसते. जेफ्री एपस्टिनचे भूत 19 डिसेंबरला अमेरिकन संसदेत हजारो फायलींतून बाहेर पडेल मोकाट सुटेल. ही भुताटकी भारतात येईल. हे भूत कोणाच्या मानगुटीवर बसते आणि कोणाचा गळा आवळते ते पाहावे लागेल. पृथ्वीराज चव्हाण म्हणतात त्याप्रमाणे एपस्टिन कांडामुळे भारतात राजकीय उलथापालथ होईल. पंतप्रधान बदलले जातील. चव्हाणांच्या तोंडात तूपसाखर!

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका व्यक्तव्याने देशाच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. चव्हाण हे काही हवेत बार उडवणारे नेते नाहीत. जागतिक घडामोडींचा अभ्यास असलेले सुसंस्कृत नेते आहेत. चव्हाण यांनी दावा केला की, “19 डिसेंबरला देशाच्या राजकारणात भूकंप होईल. भारताच्या पंतप्रधानपदावरील व्यक्ती बदलली जाऊ शकते. देशाच्या राजकारणात उलथापालथ होईल व मराठी माणूस पंतप्रधान होईल.’’ पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य गांभीर्याने घेतले तर (आज) 19 डिसेंबरला भूकंप झालाच तर त्याचा केंद्रबिंदू कोठे असेल? अर्थात, त्याचा केंद्रबिंदू अमेरिकेच्या संसदेत आहे. अमेरिकेतील ‘एपस्टिन फाईल्स’ 19 डिसेंबरला तेथील संसदेत उघड होणार आहेत. त्यातून समोर येणारी माहिती जगाला हादरवणारी आणि भारताच्या राजकारणावर परिणाम करणारी असेल, असे पृथ्वीराज चव्हाणांचे म्हणणे आहे. हे एपस्टिन प्रकरण काय आहे हे मराठी जनतेने समजून घेतले पाहिजे. संस्कार, नीतिमत्ता, चारित्र्य, धर्म यांवर प्रवचने झोडणाऱ्यांचे पुरते वस्त्रहरण ‘एपस्टिन फाईल्स’मध्ये झाले आहे. एपस्टिन हा एक ‘दलाल’ छाप उद्योगपती होता व ‘राजकारण्यांची सर्व सोय पाहणारा’ अशी त्याची ख्याती होती. जगभरातील प्रमुख राजकारणी अमेरिकेत येत तेव्हा त्यांना बायका, अल्पवयीन मुली पुरवण्याचे उद्योग या एपस्टिन नावाच्या महाभागाने केले व कोणाला कधी काय पुरवले याचा ‘रेकॉर्ड’ ठेवला. हा सर्व रेकॉर्ड अमेरिकन संसदेत उघड केला जाईल व त्यामुळे अमेरिकेसह जगभरातील अनेक राज्यकर्ते व राजकारणी अडचणीत येतील. अनेकांना पदत्याग करावा लागेल असे म्हटले जाते. ‘एपस्टिन फाईल्स’मध्ये भारतातील काही प्रमुख राजकारणी व आजी-माजी खासदारांचा समावेश आहे व त्यामुळे

भारतीय राजकारणास धक्के

बसतील, असे पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावरून दिसते. एपस्टिन हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष प्रे. ट्रम्प यांचा बराच काळ मित्र होता व ट्रम्प यांना सर्व सेवा पुरवण्याचे काम एपस्टिनने केले. त्यामुळे धक्क्यांची सुरुवात अमेरिकेपासून होईल हे नक्की. ‘एपस्टिन फाईल्स’मध्ये गेल्या 30-35 वर्षांच्या नोंदी आहेत. त्यात ई-मेल, छायाचित्रे, व्हिडीओंचा समावेश आहे. एपस्टिनच्या यौन शोषणातले भागीदार व लाभार्थी नक्की कोण यावर तर्क लावले गेले. त्यात उद्योगपती, मीडिया हाऊसचे मालक यांचा समावेश आहे. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचे जागतिक नेटवर्क मोठे आहे. स्वामी म्हणतात, ‘‘भारतातील काही विद्यमान मंत्री, माजी मंत्री व खासदारांचा एपस्टिन कांडात सहभाग आहे.’’ अमेरिकेच्या न्याय विभागाचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे एपस्टिनसंदर्भात हजारो फायली आहेत व लाखो पानांचा दस्तावेज आहे. एपस्टिन त्याच्या आर्थिक व राजकीय दबावाखाली अनेक अल्पवयीन मुलींना जाळय़ात ओढायचा व त्या मुलींना तो राजकारण्यांच्या ‘सेवे’त पाठवून द्यायचा. एपस्टिनविरोधात अल्पवयीन मुलींनी यौन शोषणाच्या तक्रारी केल्या. 6 जुलै 2019 ला न्यूयॉर्कला एपस्टिनला ‘सेक्स ट्रॅफिकिंग’च्या गंभीर गुन्ह्याखाली अटक झाली. त्याला तुरुंगात पाठवले. 23 जुलैला तो तुरुंगातील त्याच्या सेलमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याच्या गळ्यावर खुणा होत्या. कोणीतरी त्याचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यात तो वाचला. त्यानंतर त्याची सुरक्षा वाढवण्यात आली, पण अचानक ही सुरक्षा हटवण्यात आली. 10 ऑगस्ट 2019 ला त्याच हाय सिक्युरिटी जेलमध्ये एपस्टिन मृतावस्थेत सापडला. जेल

अधिकाऱ्यांच्या अहवालात

दाखवण्यात आले की, एपस्टिनने गळफास घेऊन आत्महत्या केली, पण वैद्यकीय व कायदेतज्ञांनी या अहवालावर आक्षेप घेतला. अनेक राजकारणी, उद्योगपतींची ‘सिक्रेट’ एपस्टिनकडे होती. यापैकी काहींनी एकत्र येऊन एपस्टिनची हत्या घडवून आणली व त्यासाठी कोट्यवधी डॉलर्स खर्च केले. एपस्टिनच्या ‘क्लायंट लिस्ट’मध्ये अनेक तालेवार व मान्यवर लोक होते. त्यांनी एपस्टिनला ठार केले, असे सांगितले जाते. अर्थात, एपस्टिनचे भूत जिवंत आहे व आता ते कोणाच्या मानगुटीवर बसेल ते सांगता येत नाही. जेफ्री एपस्टिन याने पंतप्रधान मोदी व स्टीव बैनन यांच्यात बैठक व्हावी म्हणून विशेष प्रयत्न केले होते, असे प्रसिद्ध झाले आहे. पण त्यात तथ्य दिसत नाही. केंद्रीय मंत्री व भारतातील काही प्रमुख उद्योगपतींशी जेफ्री एपस्टिनचा सुसंवाद होता. पृथ्वीराज चव्हाणांनी आणखी एक बॉम्ब टाकला तो म्हणजे, पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानबरोबरचे युद्ध अचानक थांबवण्याचा निर्णय का घेतला? हे एक रहस्य आहे. अमेरिकेतून फोन आला व पंतप्रधान मोदी यांनी युद्ध थांबवले. व्यापार थांबवण्याच्या धमकीमुळे युद्ध थांबवले की एपस्टिन कांडाशी संबंधित हा विषय आहे हे 19 डिसेंबरनंतर तपासावे लागेल. मोदी आधी जोशात होते व नंतर युद्ध थांबवण्याचे आदेश देऊन कोशात गेले हे समजण्यापलीकडचे आहे. जेफ्री एपस्टिनचे भूत 19 डिसेंबरला अमेरिकन संसदेत हजारो फायलींतून बाहेर पडेल व मोकाट सुटेल. ही भुताटकी भारतात येईल. हे भूत कोणाच्या मानगुटीवर बसते आणि कोणाचा गळा आवळते ते पाहावे लागेल. पृथ्वीराज चव्हाण म्हणतात त्याप्रमाणे एपस्टिन कांडामुळे भारतात राजकीय उलथापालथ होईल. पंतप्रधान बदलले जातील. चव्हाणांच्या तोंडात तूप-साखर!