
मुंबईसह 29 महानगरपालिकांत ‘आदर्श’ पद्धतीने निवडणुका व्हाव्यात यासाठी जनतेने सावधान राहायला हवे. मुंबईसारखे राजधानीचे शहर, जे 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून महाराष्ट्राला मिळाले. त्या मुंबईचा महाराष्ट्रापासून तुकडा पाडण्यासाठी, मुंबईचा लिलाव पुकारण्यासाठी सत्ताधारी या निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद वापरतील. तरीही मराठी जनांनी आत्मविश्वास न गमावता ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर करीत मैदानात उतरायला हवे. मुंबई हातून गेली तर महाराष्ट्र सत्त्व, शौर्य, तेज गमावून बसेल. मराठी माणसाला आयुष्यभराची गुलामी पत्करावी लागेल. तेव्हा मराठी माणसा, तुझ्या भावी पिढ्यांसाठी उचल ती अस्मितेची भवानी तलवार. बोल, हर हर महादेव!
अखेर नाइलाजाने का होईना, निवडणूक आयोगाने मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. 15 जानेवारीला मतदान होईल आणि 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल लागतील. तब्बल साडेसात वर्षांनंतर या निवडणुका होत आहेत. खरे तर आताही या निवडणुका घेण्याचा फडणवीस-मिंधे सरकारचा इरादा नव्हता. या ना त्या कारणाने निवडणुका पुढे ढकलत राहायचे व प्रशासनाच्या माध्यमातून महापालिकांची लूट करायची हेच त्यांचे धोरण होते, पण सुप्रीम कोर्टाने निवडणुका घेण्याचे आदेश दिले व 31 जानेवारीच्या आत निवडणूक प्रक्रिया संपवा असे सांगताच मुंबईसह 29 महापालिकांत घुसलेल्या रहेमान डपैत टोळीचा नाइलाज झाला. या प्रशासकीय राजवटीत पालिकांमधून प्रचंड प्रमाणात लूट झाली. आता त्याच लुटीच्या पैशांतून सत्तापक्षाचे लोक निवडणुका लढवतील हे नक्की आहे. राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे, पण ही आचारसंहिता फक्त विरोधी पक्षांसाठी असेल. सत्ताधारी पक्षाचे लोक, त्यांचे मंत्री रोज आचारसंहितेचे उल्लंघन करतात, नियम आणि कायदा मोडतात व मनमानी करतात. राज्याचा पिंवा देशाचा निवडणूक आयोग त्यांच्या या कायदेभंगाकडे ढुंकून पाहत नाही. कारण निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर बनले आहे. अशा विषम परिस्थितीत पालिका निवडणुकांचा महासंग्राम होईल व मराठी माणसाला हा महासंग्राम पडेल ती पिंमत देऊन जिंकावाच लागेल. गेल्या काही महिन्यांपासून विरोधी पक्ष आणि निवडणूक आयोगात संघर्ष सुरू आहे. मतदार यादी निर्दोष नाही. मतदार यादीत घोटाळे आहेत. हे
घोटाळे दूर केल्याशिवाय
निवडणुका घेणे लोकशाहीविरोधी आहे, असे सांगण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला तेव्हा निवडणूक आयोगाने फक्त टोलवाटोलवी केली. आताही निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या तरी मतदार यादीतले घोळ कायम आहेत. मतदार यादीत लाखोंच्या संख्येत दुबार मतदार आहेत. राज्यात 15 लाखांवर दुबार मतदार असून मुंबई महानगरपालिकेतच दीड लाखावर दुबार मतदार आहेत. ही बाब गंभीर आहे असे आमच्या निवडणूक आयोगास वाटत नसेल तर त्याच्या गळय़ात सरकारने गुलामी आणि लाचारीचा पट्टा बांधला आहे हे मान्य करावे लागेल. आचारसंहिता लागण्यापूर्वी शासनाने 49 शासन निर्णय जारी केले. विकासकामांच्या उद्घाटनांचा सपाटा लावला. सर्वाधिक शासन निर्णय नगर विकास खात्याशी संबंधित आहेत. हे सर्व निर्णय फसवे आणि मुंबईकरांच्या तोंडास पाने पुसणारे आहेत. मुंबई पागडीमुक्त करण्याचा निर्णय असो की पोलिसांना घरे देण्याचा, लोकांना थापा मारून वेळ मारून न्यायची व मते उकळायची यापलीकडे या शासन निर्णयांना महत्त्व नाही. सरकारने काढलेल्या 49 शासन निर्णयांतून विविध महापालिकांच्या कामासाठी 500 कोटींहून अधिक रुपयांची तरतूद केली. निवडणुकांची घोषणा होण्याआधी काही तास या विकासकामांच्या घोषणा झाल्या. सरकार व निवडणूक आयोगाचे हे उघड उघड साटेलोटे आहे. मुंबई, पुणे, नागपूर या ‘अ’ वर्ग महानगरपालिका आहेत. तेथे उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा 15 लाख इतकी आहे. पिंपरी-चिंचवड, नाशिक, ठाण्यात खर्च मर्यादा 13 लाख आहे. कुठे ती 11 लाख, तर कुठे 9 लाख आहे. या खर्च मर्यादेत सत्ताधारी पक्षाचे लोक खरेच
निवडणुका लढवतील
काय? राज्यात नगरपालिका, नगर पंचायत निवडणुका संपलेल्या नाहीत. एकेका नगरपालिकेत सत्ताधारी पक्षाने शंभर ते दीडशे कोटी रुपयांची उधळण केली. मते विकत घेतली. पैशांच्या बॅगा मंत्र्यांनी हेलिकॉप्टरमधून आणल्या. सध्या नगर पंचायतीत मताला 15 ते 20 हजार असा भाव सत्ताधाऱ्यांनी लावला व खुलेआम पैशांचे वाटप झाले. सत्ताधारी पक्षाचे आमदार नीलेश राणे यांनी सिंधुदुर्गात भाजपच्या ‘थैल्या’ पकडून दिल्या, पण निवडणूक आयोग ढिम्म म्हणजे ढिम्मच राहिला. याला आमचा आदर्श निवडणूक आयोग व त्याची आदर्श आचारसंहिता म्हणायची म्हणजे सगळा खेळखंडोबा असेच म्हणावे लागेल. अशा वातावरणात मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. 29 महानगरपालिकांत ‘आदर्श’ पद्धतीने निवडणुका व्हाव्यात यासाठी जनतेने सावधान राहायला हवे. मुंबईसारखे राजधानीचे शहर, जे 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून महाराष्ट्राला मिळाले. मराठी माणसाने त्यासाठी रक्ताचे शिंपण केले, तुरुंगवास भोगला त्या मुंबईचा महाराष्ट्रापासून तुकडा पाडण्यासाठी, मुंबईचा लिलाव पुकारण्यासाठी सत्ताधारी या निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद वापरतील. तरीही मराठी जनांनी आत्मविश्वास न गमावता ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर करीत मैदानात उतरायला हवे. मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. छत्रपती शिवराय व त्यांचे मावळे ज्या त्वेषाने ‘स्वराज्या’ची लढाई लढले, त्याच त्वेषाने मुंबईची लढाई पुढे न्यावी लागेल. मुंबई हातून गेली तर महाराष्ट्र सत्त्व, शौर्य, तेज गमावून बसेल. मराठी माणसाला आयुष्यभराची गुलामी पत्करावी लागेल. तेव्हा मराठी माणसा, तुझ्या भावी पिढय़ांसाठी उचल ती अस्मितेची भवानी तलवार. बोल, हर हर महादेव!































































