सामना अग्रलेख – मर्दानी भाषा भवन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवरायांचा मावळा राष्ट्राच्या रक्षणासाठी जिवाची बाजी लावतो असेच इतिहास सांगतो. जिवाची बाजी लावून जो राष्ट्राचे रक्षण करतो, त्या वीरांची भाषा मराठी. बाबरीवर हातोडे मारून पुन्हा ‘‘होय, बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे,’’ असे ठणकावणारे मर्द सेनापती हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भाषा मराठी. ‘‘अमरनाथ यात्रेकरूंच्या केसाला हात लावाल तर याद राखा’’ या इशाऱ्याने पाकडय़ा दहशतवाद्यांना धडकी भरवणारी भाषा मराठी. अशा मर्दानी मराठी भाषेचे भवन उभे राहत आहे. या कार्यात अडथळा आणाल तर याद राखा!

महाराष्ट्राच्या राजधानीत, आपल्या मुंबई शहरात मराठी भाषा भवन उभे राहत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठी भाषा भवनाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. केंद्र सरकार मराठीच्या बाबतीत द्वेषाने वागत आहे. मराठीस अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून शर्थ सुरू आहे, पण मराठीच्या नशिबी नकारघंटाच येत आहे. आता मरीन ड्राईव्हच्या समुद्रकिनारी मराठी भाषा भवन दिमाखात उभे राहत आहे. ठाकरे सरकारने हे उत्तम काम केले. केंद्रास मराठी भाषेबाबत ऐतिहासिक, प्राचीन, अर्वाचीन पुरावे हवे असतील तर या वास्तूत त्यांना अभ्यास करता येईल. मरीन लाइन्स ही अतिश्रीमंत लोकांची जहागिरी आहे. येथे मराठी माणूस अभावानेच आढळतो. मराठी ही कष्टकऱ्यांची, लढवय्यांची भाषा. मराठी म्हणजे छत्रपती शिवरायांपासून ते क्रांतिवीरांची भाषा. मुंबई महाराष्ट्रात यावी व मराठी भाषिकांचे एक अखंड राज्य निर्माण व्हावे यासाठी जे 105 हुतात्मे कामी आले, त्या हुतात्म्यांची भाषा मराठी. संत ज्ञानोबा, तुकारामाची भाषा मराठी. गांधीजींनी मुंबईत ‘चले जाव’चा नारा देताच हजारो गिरणी कामगार रस्त्यावर उतरले, त्या लढवय्यांची भाषा मराठी. देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर प्राणत्याग करणाऱ्यांची भाषा मराठी. अनेक आक्रमणे पचवून जी भाषा उभी आहे, त्या मराठी भाषेचे भवन मुंबईत निर्माण व्हावे व उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान असताना मराठीची ही पताका फडकावी हे महत्त्वाचे. प्रबोधनकार ठाकरे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व आता उद्धव ठाकरे अशा

तीन पिढय़ा ‘मराठी’साठी लढा

देत आहेत याचा उल्लेख उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. मुंबईत येऊन व्यापार-धंदा करायचा, मिळेल त्या मार्गाने पैसा कमवायचा आणि ‘‘मराठीत व्यवहार करा, दुकानावर मराठी पाटय़ा लावा’’ असे सांगितले की, काही महाभाग मराठीविरुद्ध कोर्टात जाणार. अशा अतिशहाण्यांची मस्ती उतरविण्यासाठी मराठी भाषा भवनात स्वतंत्र कक्ष स्थापन व्हायलाच हवा. मराठी भाषा महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात सक्तीची असू नये म्हणून भाजपचे किरीट सोमय्यासारखे लोक कोर्टात गेले. अशा लोकांनी मराठी माणूस आणि मराठी भाषेविरुद्ध उभा दावा मांडला आहे. हे लोक मराठी भाषा भवनाच्या उभारणीत अडथळे आणण्यासाठी ‘ईडी’चा वापर नक्कीच करतील, पण अशा नतद्रष्टांच्या छाताडावर पाय ठेवून मराठी भाषा भवन उभे करावे लागेल. राज्यात मराठी संस्कृती, मराठी भाषेचा ठसा पुसण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ‘ज्ञानपीठ’कार कुसुमाग्रजांनी मराठी भाषेच्या संदर्भात व्यक्त केलेली खंत आजही अस्वस्थ करीत आहे. मंत्रालयाच्या पायरीवर मराठी भाषा फाटक्या वस्त्रात भिकारणीसारखी उभी आहे, अशी खंत कुसुमाग्रजांनी व्यक्त केली होती. मंत्रालयात, राजकीय व्यवहारात मराठीचा वापर करायला हवा. मराठी साहित्य, नाटक, चित्रपट, संस्कृती, सण-उत्सव यासाठी मराठी भाषा भवनातून मोठमोठय़ा मोहिमा राबवायला हव्यात. मराठीचे शिलालेख, पुस्तके, संदर्भ ग्रंथ, वर्तमानपत्रे यातून ज्ञान मिळेल, पण मुंबईसह महाराष्ट्रात, जगाच्या पाठीवर मराठी तरुणांनी उत्तुंग झेप घ्यावी यासाठी मराठी भवनातून विशेष कार्य घडायला हवे. हे सर्व काम गेली कित्येक वर्षे

शिवसेना एका इमानाने

करीत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी भाषा व अस्मितेच्या रक्षणासाठीच शिवसेना काढली, मराठीद्वेष्टय़ांच्या कानफटात मारली, मराठी माणसांना ओळख दिली, स्वाभिमान दिला. मराठी म्हणून गर्वाने जगायला शिकवले. मराठीच्या अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेऊन आपटायची हिंमत दिली. ‘‘महाराष्ट्रात राहताय ना, मग शिवरायांना मुजरा करावाच लागेल, मराठी भाषा शिकावीच लागेल’’ याच आग्रहातून महाराष्ट्र गौरवाचे तेज वाढत गेले. दिल्लीच्या तख्तालाही अनेकदा महाराष्ट्रापुढे नमावे लागले ते तेजस्वी मराठी भाषेच्या धारदार तलवारीमुळे. आज पंचतारांकित हॉटेलात, आकाशातील विमानातही ‘जय महाराष्ट्र’ कानी पडते ते शिवसेनाप्रमुखांच्या मराठीबाबतच्या दूरदृष्टीमुळेच. भाषावार प्रांतरचनेनुसार देशात भाषिक राज्ये निर्माण झाली, पण मराठी भाषिकांना त्यांचे महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यासाठी पाच वर्षे झगडावे लागले. म्हणून मराठी माणसाने सदैव सावधान राहायला हवे. महाराष्ट्राला इतिहास आहे, इतर राज्यांना भूगोल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला म्हणून हा इतिहास आहे. महात्मा गांधींनी देशाच्या स्वातंत्र्य लढय़ासाठी महाराष्ट्राची भूमी निवडली. कारण शिवरायांचा मावळा राष्ट्राच्या रक्षणासाठी जिवाची बाजी लावतो असेच इतिहास सांगतो. जिवाची बाजी लावून जो राष्ट्राचे रक्षण करतो, त्या वीरांची भाषा मराठी. बाबरीवर हातोडे मारून पुन्हा ‘‘होय, बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे,’’ असे ठणकावणारे मर्द सेनापती हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भाषा मराठी. ‘‘अमरनाथ यात्रेकरूंच्या केसाला हात लावाल तर याद राखा’’ या इशाऱ्याने पाकडय़ा दहशतवाद्यांना धडकी भरवणारी भाषा मराठी. अशा मर्दानी मराठी भाषेचे भवन उभे राहत आहे. या कार्यात अडथळा आणाल तर याद राखा!