अग्रलेख: आम्हाला काहीही म्हणायचे नाही… नागपुरातील नाचक्की!

51

एरवी पावसामुळे मुंबईच्या केवळ सखल भागात वीतभर पाणी साचले तरी ‘मुंबई बुडाली होSS’ असा बेंबीच्या देठापासून कंठशोष करणारे वाचाळवीर आता कुठे आहेत? त्यांना कोणीतरी कंठसुधारक वटी नेऊन द्यायला हवी. मुंबई महापालिका आणि शिवसेनेविरुद्ध कोणाला कितीही ठणाणा करू देत, पण काही तासांच्या पावसात नागपूर का बुडाले? कोणामुळे बुडाले? विधिमंडळाचे अधिवेशन स्थगित करण्याइतकी नाचक्की का ओढवली, यावर मात्र आम्हाला काहीही म्हणायचे नाही!

महाराष्ट्राची उपराजधानी पाण्यात बुडाली आहे. शुक्रवारी पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नागपूर शहराची दाणादाणच नव्हे तर दैना उडवली आहे. नागपुरात सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने राज्याचे संपूर्ण सरकारच नागपुरात आले आहे. तथापि, विधान भवनातच पाणी शिरल्याने  विधिमंडळाचे अधिवेशनच दिवसभरासाठी स्थगित करण्याची भयंकर नामुष्की सरकारवर ओढवली. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्मभूमी असलेले नागपूर काही तासांच्या पावसाने जलमय झाले. आमदार निवास, मंत्र्यांचे बंगले, वीज उपकेंद्रे सारे काही पाण्यात आहे. अधिवेशनासाठी आलेले अधिकारी, कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचेही अतोनात हाल झाले. आपल्या डोळ्यासमोर शहरात पाणी भरते आहे, रस्त्यांचे रूपांतर नद्यांमध्ये होत आहे, हे पाहून मुख्यमंत्रीही नक्कीच व्यथित झाले असणार. ‘विकास पुरुष’ अशी ओळख असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे हे शहर. आपल्या लाडक्या शहराची आज जी अवस्था झाली ती बघून धडाकेबाज गडकरींनाही निःसंशय वेदना झाल्या असणारच. नागपूरच्या विमानतळापासून विधान भवनापर्यंत आणि बाजारपेठांपासून नागरिकांच्या घरादारांपर्यंत सारे काही जलमय झाले. घराबाहेर आणि रस्त्यावर उभी असलेली वाहने तर बुडालीच, पण दुकानांतही पाणी शिरले. सगळे रस्ते पाण्याखाली आणि विजेअभावी काळोख. यामुळे अवघे नागपूर शहर ठप्प झाले. मुंबई शहरातून जशी मिठी नदी धावते तशीच नागपुरातून नाग नदी वाहते. शुक्रवारच्या पावसात ही नदी दुथडी भरून वाहू लागली.

नाग नदीतील अतिक्रमणांमुळे

पुराच्या पाण्याने पात्र सोडले आणि हे पाणी शहरभर पसरले. शिवाय, शहरातील सगळ्या गटारी चोकअप! तुंबलेल्या गटारांनी नागपूरची परिस्थिती आणखी बिकट केली. अनेक ठिकाणी तर गटारांचे पाणी नागरिकांच्या घरातील टॉयलेटमधून बाहेर पडू लागले. आज राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस काही काळ नागपूरचे महापौर होते. त्या शहराचा एका पावसात असा बोजवारा उडालेला पाहून मुख्यमंत्री हळहळले असतील. पुन्हा महिन्यापूर्वीच नागपूर शहराला देशातील ‘स्मार्ट’ शहरांच्या यादीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. अशा ‘स्मार्ट’ शहराचे एका पावसात असे विद्रूपीकरण का झाले आणि त्याला जबाबदार कोण, यावर ‘चिंतन’ मात्र जरूर व्हायला हवे. नागपूर शहर हे भौगोलिकदृष्ट्या देशाचा केंद्रबिंदू तर आहेच, पण केंद्रीय सरकारचा राजकीय केंद्रबिंदूही नागपुरातच आहे. भारतीय जनता पक्षाची जननी असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय याच ठिकाणी आहे. केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. महाराष्ट्रातही भाजपचीच सत्ता आहे. शिवाय नागपूर महापालिकेतही भारतीय जनता पक्षाचेच कारभारी सत्तेच्या खुर्च्यांवर विराजमान आहेत. असे असतानाही पावसाच्या पाण्यामुळे देशातील हे ‘हाय प्रोफाईल’ शहर ठप्प झाले. तेथील जनजीवन कोलमडले. त्यामुळे भाजपची कशी फटफजिती झाली, असे समजून टाळ्या वाजवण्याचा हा प्रसंग नाही. शेवटी सलगपणे धो-धो कोसळणारा पाऊस  ही एक नैसर्गिक आपत्तीच आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन सक्षम असायला हवे, पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा, ड्रेनेज सिस्टिम नीट कार्यान्वित असायला हवी, नालेसफाईबरोबरच गटारांचीही साफसफाई पावसाळ्यापूर्वी व्हायला हवी, हे सगळे खरे आहे. मात्र हे केवळ मुंबईतच नव्हे देशातील

प्रत्येक शहरात

व्हायला हवे. जून महिन्यात झालेल्या पहिल्याच पावसात अहमदाबाद, बडोदासारखी शहरे पाण्याखाली गेली. देशाची राजधानी असलेली दिल्लीही प्रत्येक पावसाळ्यात तुंबते आणि आता महाराष्ट्राच्या उपराजधानीतही तेच सुरू आहे. कित्येक तास जेव्हा पाऊस कोसळतो तेव्हा महापालिकेने केलेली पूर्वतयारी कोलमडते. अर्थात त्यासाठी एकटय़ा महापालिकेला दोष देऊन चालणार नाही. शहरात सुरू असलेली विकास कामे, एमएमआरडीएसारख्या सरकारी एजन्सीकडून विविध कामांसाठी केले जाणारे खड्डे, मेट्रोसाठी सुरू असलेली खोदकामे, भूमिगत केबल वायरिंगसाठी फोडले जाणारे रस्ते, असे एक ना अनेक घटक पाणी तुंबण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. नागपुरात तेच झाले. त्यामुळे केवळ महापालिकेला झोडपून काढण्याचा एककलमी कार्यक्रम न राबवता इतरही जबाबदार एजन्सींचे प्रताप शोधायला हवेत. आपत्ती पावसाची असो की संभाजीनगरच्या कचरा प्रश्नासारखा गंभीर पेचप्रसंग असो, अशावेळी केवळ महापालिकांवर जबाबदारी ढकलून सरकारने नामानिराळे होऊ नये, पण दुर्दैवाने तसे होत नाही. पालिकांवर कुठल्या पक्षाची सत्ता आहे त्यावरून सरकारपक्षाची भूमिका ठरणे योग्य नव्हे. आपत्ती किंवा पेच असेल तिथे धावून जाण्याएवढे मोठे मन सरकारकडे असलेच पाहिजे. एरवी पावसामुळे मुंबईच्या केवळ सखल भागात वीतभर पाणी साचले तरी ‘मुंबई बुडाली होSSअसा बेंबीच्या देठापासून कंठशोष करणारे वाचाळवीर आता कुठे आहेत? त्यांना कोणीतरी कंठसुधारक वटी नेऊन द्यायला हवी. मुंबई महापालिका आणि शिवसेनेविरुद्ध कोणाला कितीही ठणाणा करू देत, पण काही तासांच्या पावसात नागपूर का बुडाले? कोणामुळे बुडाले? विधिमंडळाचे अधिवेशन स्थगित करण्याइतकी नाचक्की का ओढवली, यावर मात्र आम्हाला काहीही म्हणायचे नाही!

आपली प्रतिक्रिया द्या