सामना अग्रलेख – मोदी आणि कुटुंब!

कुटुंब आणि त्याचा सांभाळ या फंदात स्वतः मोदी यांनी न पडलेलेच बरे! तुम्ही पंतप्रधान होण्यापूर्वी ‘एनडीए’ हेदेखील एक मोठे कुटुंबच होते. तुमच्या काळात ‘एनडीए’चे कुटुंब नावापुरतेच उरले आहे. 2014 पूर्वी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील नातेही कौटुंबिक स्वरूपाचेच होते. तुमच्या काळात विरोधक म्हणजे वैरी, देशाचे शत्रू ठरवले गेले. खुद्द तुमचा स्वतःचा पक्षदेखील सध्या ‘दोघांचेच कुटुंब’ ठरला आहे. तरीही ‘मोदी का परिवार’ नावाने जनतेकडे मते मागण्याचा भंपकपणा तुम्ही करीतच आहात. देश आणि समाज ज्यांना कुटुंब म्हणून सांभाळता आला नाही त्यांनी इतरांच्या कुटुंबात का डोके खुपसावे? कुटुंब सांभाळता आले नाही असे एक बोट दुसऱ्याकडे दाखविताना ‘स्वतः तरी कुटुंब कुठे सांभाळले?’ या प्रश्नाची तीन बोटे आपल्याकडे येतात हे कोणीही विसरू नये.

नरेंद्र मोदी हे पराभवाच्या छायेत आहेत. त्यामुळे ते निराश आणि हताश झाले असावेत. त्यातून त्यांच्या तोंडून एकप्रकारे भडास बाहेर पडत आहे. मोदी यांचे बोलणे शुद्ध किंवा संयमी कधीच नव्हते. त्यात निवडणुकांचा मोसम म्हणजे त्यांच्या मूळ स्वभावासाठी पर्वणीच ठरते व ते लोकांसमोर येऊन बेछूट बोलत असतात. प्रचाराची पातळी व स्तर उंच ठेवण्याची जबाबदारी पंतप्रधानांची असते, पण मोदी यांनी निवडणुकांचे तिन्ही टप्पे आपल्या प्रचाराने खालच्या स्तरावर नेले. मंगळसूत्रापासून नेत्यांच्या कुटुंबांपर्यंत ते घसरत खाली आले. मोदी यांचे हे कृत्य हिंदू संस्कृतीत बसत नाही. मोदी यांनी त्यांच्या मनावरचा ताबा गमावला आहे व ते सभांतून थयथयाट करीत आहेत. महाराष्ट्रात येऊन ते श्री. उद्धव ठाकरे व श्री. शरद पवार यांच्याविषयी बेताल विधाने करतात. पंतप्रधानपदावर आपण बसलो आहोत याचे भान न ठेवता ते बोलतात व वागतात याचेच आश्चर्य वाटते. मंगळसूत्र किंवा कुटुंब या संस्थांशी मोदींचा संबंध नाही, पण मोदी त्यावर हवे ते बोलतात. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ व सत्तेच्या राजकारणातही स्वतःचा तोल कधी ढळू न देणाऱ्या नेत्यावरही व्यक्तिगत टीका करण्यापासून मोदी स्वतःला रोखू शकले नाहीत. निवडणूक प्रचारात आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पणी होतच राहणार, पण त्यातही एक सभ्यतेची, नैतिकतेची मर्यादा पाळायची असते. मात्र एका वृत्तवाहिनीशी बोलताना मोदी यांनी या मर्यादेचे पुन्हा उल्लंघन केले. त्यांनी शरद पवार यांच्या वाढत्या वयाचा उल्लेख तर केलाच; परंतु त्यांच्या कुटुंबातील सध्याचा राजकीय बेबनाव टीकेचा मुद्दा बनवला. ‘ज्यांना कुटुंब सांभाळता आले नाही ते महाराष्ट्र काय सांभाळणार?’ असा

उफराटा सवाल

मोदींनी शरद पवार यांना उद्देशून केला. मोदी यांना या प्रकारची टिप्पणी करण्याची खरोखरच गरज होती का? मोदी आणि त्यांचा पक्ष स्वतःला ‘चाल, चरित्र आणि नैतिकते’चा आदर्श म्हणवून घेत असतो. मग पवारांसारख्या राजकीय नैतिकता आणि चारित्र्य सांभाळणाऱया ज्येष्ठ नेत्याबद्दल पंतप्रधानपदावरील व्यक्तीने असे बोलणे भाजपच्या कोणत्या नैतिकतेत बसते? की हेच त्यांचे 2014 पासून ‘चाल’ आणि ‘चारित्र्य’ बनले आहे? मोदी यांच्या या अश्लाघ्य टीकेचा शरद पवार यांनी त्यांच्या पद्धतीने समाचार घेतला हे ठीकच झाले; परंतु मोदी आणि कुटुंब या परस्परसंबंधांवर मागील दहा वर्षांत जी प्रश्नचिन्हे उपस्थित केली गेली त्यावर खुद्द मोदींकडे तरी कुठे उत्तर आहे? लोकांनी तुमच्या कौटुंबिक स्थितीवर बोलू नये, तुमच्या पदवीविषयी प्रश्न उपस्थित करू नये; पण तुम्ही मात्र कधी विरोधकांच्या कौटुंबिक कलहाची, तर कधी महिलांच्या मंगळसूत्रांची नसती उठाठेव करणार? मुळात कुटुंब आणि त्या व्यवस्थेपासून जे अलिप्त राहिले त्यांनी इतरांच्या कौटुंबिक सुख-दुःखाची उठाठेव का करावी? त्यांच्या कौटुंबिक वादांना स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी प्रचारात का आणावे? हे कुठल्या राजकीय नैतिकतेत बसते? मोदी यांच्याकडे मुद्देच नसल्याने ते विरोधकांच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक वादविवादांवर घसरत आहेत. कधी ते राहुल गांधी यांची ‘शहजादे’ म्हणून संभावना करतात, तर कधी रायबरेली या परंपरागत मतदारसंघात न उभे राहता राज्यसभेवर जाण्याच्या सोनियांच्या निर्णयाची खिल्ली उडवतात. कधी शरद पवारांच्या वाढत्या वयाचा आणि कुटुंबकलहाचा संबंध जोडून स्वतःच्या

राजकीय दुराचाराचा

परिचय करून देतात. मोदी हे स्वतःला देशाचे प्रधानसेवक म्हणवून घेतात. देशाची 140 कोटी जनता म्हणजे आपले कुटुंब, अशी शेखी मिरवतात. सध्या भाजपवाल्यांनी ‘मोदी का परिवार’ हे एक नवीनच पिल्लू प्रचारात सोडले आहे. त्याचा एवढा बोभाटा केला जात आहे की, मोदी हे जणू ‘विश्वगुरू’च नव्हे, तर ‘जागतिक कुटुंबप्रमुख’देखील बनले आहेत! जनतेने सलग दोनदा तुमच्याकडे देशाची सूत्रे सोपविताना तुमच्या कुटुंब न सांभाळण्याच्या क्षमतेचा विचार केला असता तर? ना तुम्ही पंतप्रधान बनले असते, ना ‘विश्वगुरू’ होऊ शकले असते, ना तथाकथित ‘मोदी का परिवार’चे स्वयंघोषित कुटुंबप्रमुख. मुळात कुटुंब आणि त्याचा सांभाळ या फंदात स्वतः मोदी यांनी न पडलेलेच बरे! तुम्ही पंतप्रधान होण्यापूर्वी ‘एनडीए’ हेदेखील एक मोठे कुटुंबच होते. तुमच्या काळात ‘एनडीए’चे कुटुंब नावापुरतेच उरले आहे. 2014 पूर्वी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील नातेही कौटुंबिक स्वरूपाचेच होते. तुमच्या काळात विरोधक म्हणजे वैरी, देशाचे शत्रू ठरवले गेले. खुद्द तुमचा स्वतःचा पक्षदेखील सध्या ‘दोघांचेच कुटुंब’ ठरला आहे. तरीही ‘मोदी का परिवार’ नावाने जनतेकडे मते मागण्याचा भंपकपणा तुम्ही करीतच आहात. देश आणि समाज ज्यांना कुटुंब म्हणून सांभाळता आला नाही त्यांनी इतरांच्या कुटुंबात का डोके खुपसावे? समाजात कलहाचे राजकारण भिणविणाऱ्यांनी इतरांच्या कौटुंबिक कलहाची नसती उठाठेव कशाला करावी? कुटुंब सांभाळता आले नाही असे एक बोट दुसऱ्याकडे दाखविताना ‘स्वतः तरी कुटुंब कुठे सांभाळले?’ या प्रश्नाची तीन बोटे आपल्याकडे येतात हे कोणीही विसरू नये.