सामना अग्रलेख – श्री. मोदी प्रा. लिमिटेड!

भारतीय जनता पक्ष ही आज ‘पब्लिक कंपनी’ म्हणजे लोकांचा सहभाग असलेला पक्ष नाही. तो भागधारक, भांडवलदार, व्यापारी, गुंतवणूकदार लोकांचा प्रायव्हेट पक्ष बनला आहे. काँग्रेसने सार्वजनिक उपक्रमांचा पाया रचला. हा पाया श्री. मोदी प्रा. लिमिटेड कंपनीने मोडून विकून खाल्ला. तेलंगणातील शेतकऱ्यांची स्थिती देशात उत्तम आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने, ‘ठाकरे’ घराण्याने सामाजिक, राजकीय वारसा निर्माण केला. मोदी-शहा यांना कोणताही वैचारिक, सांस्कृतिक वारसा नाही. ते आले तसे जातील. त्यांचे नामोनिशाणही इतिहासात राहणार नाही. अंध भक्तांच्या कुजबुजीवर वारसा टिकत नाही. त्यासाठी जमिनीत व लोकांच्या मनात रोपटे पेरावे लागते. दुसऱ्यांनी लावलेली रोपटी उपटून स्वतःचा विचार कसा पेरणार?

घराणेशाही, परिवारवाद यावर पंतप्रधान मोदी अलीकडे बोलू लागले आहेत व त्यांचे बोलणे गमतीचे आहे. पंतप्रधान मोदी रविवारी तेलंगणात होते. तेथे त्यांनी परिवारवादावर भाष्य करून आपल्या विरोधकांवर हल्ला केला आहे. काही राजकीय पक्ष प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे चालवले जातात. मोदी यांनी राजकीय घराण्यांना ‘प्रायव्हेट कंपनी’ म्हटले. या प्रायव्हेट कंपन्यांना जनतेशी घेणेदेणे नाही असा श्री. मोदींचा रोख आहे, पण सत्य असे की, यातील बऱ्याचशा प्रायव्हेट कंपन्या भाजपने चालवायला घेतल्या आहेत. तेलंगणात मोदी यांनी भारत राष्ट्र समिती व काँग्रेसवर प्रहार केला. ज्याला कुटुंब आहे त्याला भावना आहेत, भावना आहेत म्हणजे परिवार आहे. परिवार नसलेले लोक भावनाशून्य असतात. हिंदू संस्कृती व मोदींच्या नव्या सनातन धर्मात कुटुंब, परिवार, एकत्र कुटुंब पद्धती यास महत्त्व आहे, पण मोदींचा धर्म वेगळा आहे. मोदी तेलंगणात जाऊन परिवारवाद, खासगी कंपन्यांचा पक्ष यावर टीका करतात, पण विसंगती अशी की, ओडिशात नवीन पटनायक, आंध्रात जगनमोहन रेड्डी यांच्या राजकीय परिवारवादावर बोलत नाहीत. आंध्रात व ओडिशातील परिवारवादी पक्ष एखाद्या प्रायव्हेट कंपनीप्रमाणे चालवले जात आहेत व या कंपन्यांनी केंद्रातील मोदी सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मोदी हे परिवारवादासंदर्भात किती ‘ढोंगी’ भूमिका घेत आहेत ते स्पष्ट होते. उत्तर प्रदेशात मायावती यांच्या ‘प्रायव्हेट कंपनी’शी सूत जुळवण्याचे प्रयत्न भाजप करत आहे. ‘इंडिया’ला रोखण्यासाठी ‘एमआयएम’ या आणखी एका प्रायव्हेट कंपनीशी छुपी हातमिळवणी त्यांनी केलीच आहे. महाराष्ट्रात बारामती परिवारातल्या अजित पवारांना भाजपने मांडीवर घेतले आहे. कर्नाटकातील आणखी एक प्रायव्हेट कंपनी देवेगौडाकृत जनता दल (सेक्युलर) पक्षाशी भाजपने युती जाहीर करून एक प्रकारे

परिवारवादाच्या झेंड्याला

आपला दांडा दिला आहे. मुलायमसिंग यादव हे समाजवादी पक्षाचे संस्थापक. त्यांचा राजकीय परिवार मोठा आहे. मुलायमसिंग यांना मोदी यांनीच पद्मविभूषण देऊन गौरविले आहे. जम्मू-कश्मीरात मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षाबरोबर भाजपने बराच काळ सत्ता भोगली. हा पक्षदेखील परिवारवादी असा ‘प्रायव्हेट कंपनी’प्रमाणेच होता. परिवारवादाचे काटे तेव्हा या मंडळींना का टोचू नयेत? बिहारातील रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष हा परिवारवादाचा उत्तम नमुना असून हा नमुना सध्या भाजपने त्यांच्या गोटात घेऊन स्वतःचे ढोंग पुन्हा उघडे केले आहे. जीतनराम मांझी यांचा ‘हिंदुस्थानी आवाम मोर्चा’ (हम), मुकेश साहनी यांची ‘विकसनशील इन्सान पार्टी’ या परिवारवादी पक्षांनाही भाजपने जवळ केले आहेच. ‘अपना दल’ हा काwटुंबिक पक्ष मोदी सरकारमध्ये सामील आहे. त्यामुळे परिवारवाद म्हणजे नक्की काय ते नव्याने समजून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मध्य प्रदेशात ‘शिंदेशाही’ परिवारवादास जवळ केल्यानेच तेथे भाजपचे सरकार आले. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, धर्मेंद्र प्रधान ही राजकीय घराणेशाहीचीच प्रतीके आहेत. महाराष्ट्रासह देशातील अनेक राजघराणी भाजपने राजकीय स्वार्थासाठी मांडलिक करून घेतली आहेत. हीसुद्धा एक प्रकारची घराणेशाहीच आहे. महाराष्ट्रातील विखेपाटलांची कुटुंबशाही भाजपने जिरवून घेतली. अगदी गेला बाजार आज भाजपमध्ये असलेले वरुण गांधी, श्रीमती मनेका गांधी यांना जे स्थान आहे ते त्यांच्या घराण्यांमुळेच ना? देशातील सर्वाधिक राजकीय घराणी आज भाजपमध्ये आहेत. ती काही भाजपचा विचार पटतोय म्हणून नाही. ईडी, सी.बी.आय.चा धाक दाखवून ही घराणी भाजपने आपल्या तंबूत घेतली आहेत. भाजपचे दात परिवारवादाबाबत जेथच्या तेथे घशात घालता येतील अशी अनेक उदाहरणे देता येतील. अमित शहांचा परिवारवाद भारतीय क्रिकेटमध्ये

कोणत्या निकषावर ‘विटीदांडू’

खेळत आहे? हा एखाद्याचा संशोधनाचा विषय आहे. भाजपने देशातील अनेक घटनात्मक संस्था या स्वतःच्या प्रायव्हेट कंपन्या असल्याप्रमाणेच चालवल्या आहेत व देशाला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. मुळात भारतीय जनता पक्षाचीच आज एक प्रकारे प्रायव्हेट कंपनी झाली आहे. या कंपनीचे खरे संस्थापक लालकृष्ण आडवाणी यांना अडगळीत फेकून या कंपनीचा ताबा घेण्यात आला व पक्षावर एक प्रकारे मालकी हक्क प्रस्थापित केला गेला. भारतीय जनता पक्ष ही आज ‘पब्लिक कंपनी’ म्हणजे लोकांचा सहभाग असलेला पक्ष नाही. तो भागधारक, भांडवलदार, व्यापारी, गुंतवणूकदार लोकांचा प्रायव्हेट पक्ष बनला आहे. राहुल गांधी सांगतात त्याप्रमाणे ही कंपनी ‘हम दो और हमारे दो’पुरतीच मर्यादित बनली. या प्रायव्हेट कंपनीस ना धोरण, ना विचारांचे तोरण! अशा परिस्थितीत भारतीय जनता पार्टी हा पक्ष नसून एक व्यापार केंद्रच बनले आहे. काँग्रेसचे, शिवसेनेचे, बीआरएसचे एक घराणे नक्कीच असेल, पण या घराण्यांनी देशाला, समाजाला, शेतकरी, कष्टकरी यांना जे दिले ते तुम्ही गेल्या दहा वर्षांत करू शकलात काय? काँग्रेसच्या घराण्याने जे 70 वर्षांत कमावले ते गेल्या दहा वर्षांत विकून, मोडून खाणे हाच तुमच्या प्रायव्हेट कंपनीचा धंदा बनला. काँग्रेसने सार्वजनिक उपक्रमांचा पाया रचला. हा पाया श्री. मोदी प्रा. लिमिटेड कंपनीने मोडून विकून खाल्ला. तेलंगणातील शेतकऱ्यांची स्थिती देशात उत्तम आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने, ‘ठाकरे’ घराण्याने सामाजिक, राजकीय वारसा निर्माण केला. शरद पवारांचा हात धरून आपण राजकारणात आलो असे सांगणारे मोदी पुन्हा त्यांच्या परिवारवादावर टीका करतात. पवारांच्या राजकीय परिवारातील प्रफुल्ल पटेल व अजित पवार हे आज मोदींबरोबर आहेत. मोदी-शहा यांना कोणताही वैचारिक, सांस्कृतिक वारसा नाही. ते आले तसे जातील. त्यांचे नामोनिशाणही इतिहासात राहणार नाही. अंध भक्तांच्या कुजबुजीवर वारसा टिकत नाही. त्यासाठी जमिनीत व लोकांच्या मनात रोपटे पेरावे लागते. दुसऱयांनी लावलेली रोपटी उपटून स्वतःचा विचार कसा पेरणार?