सामना अग्रलेख – अवघे पाऊणशे वयमान…

या वेळच्या लोकसभा निवडणूक काळातला मोदींचा प्रचार, त्यांचा खोटेपणा, भंपकपणा, धर्मांधता ही क्लेशदायक ठरली. मोदी हे लवकरच पंचाहत्तरी गाठत आहेत. ‘म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान’ असे एक ‘पद’ मराठी संगीत नाटकात आहे. मोदी पाऊणशे वर्षांचे होत असतानाही भाजप त्यांना स्वार्थासाठी वेठबिगारासारखे राबवत आहे, हे निर्घृण आहे. मोदी 18 तास काम करतात. त्यांना झोपता येत नाही. त्यांना झोपेची व विश्रांतीची गरज दिसते. शिवाजी पार्कच्या सभेने मोदींच्या विश्रांतीचा मार्ग मोकळा केला. महाराष्ट्र मोदींना विश्रांती मिळवून देईल.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांचा शेवटचा म्हणजे पाचवा टप्पा 20 मे रोजी आहे. त्यामुळे प्रचाराचे रण आज शांत होत आहे. शुक्रवारी शिवतीर्थावर नरेंद्र मोदींची सभा पार पडली, तर वांद्रय़ाच्या बीकेसीत महाविकास आघाडीची सभा झाली. आज शनिवार रोजी 5 वाजता प्रचार संपेल. मुंबईतील 6 जागांसह 13 लोकसभा मतदारसंघांत मतदान होईल. त्यामुळे शुक्रवार-शनिवारचा दिवस हा महाप्रचाराचा दिवस राहील. शिवाजी पार्कात मोदी व राज ठाकरे यांचे एकत्र असणे हे गमतीचेच चित्र होते. महाराष्ट्रद्रोही मोदी-शहांना इकडे पाय ठेवू देऊ नका असे सांगणारे, गरजणारे पुढारी स्वाभिमान वगैरे गुंडाळून त्याच मोदी-शहांच्या चरणी बसून सुपारी कातरत बसतात तेव्हा भविष्यात या पक्षाची व नेत्यांची दुकाने कायमची बंद होतील याचीच गॅरंटी मऱहाठी जनता देत असते. विचारांचा वारसा म्हणजे शेवटी सोयीचेच राजकारण. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आपणच ‘वाहक’ आहोत, असे ‘मिंधे’ वगैरे लोक प्रचारात या वेळी बोलत होते व मोदी-शहा हे व्यापारी मंडळ मिंधे, राणे, राज वगैरे हेच खरे बाळासाहेबांचे वारसदार, असे तुणतुणे वाजवताना महाराष्ट्राने पाहिले. ज्यांनी स्वतःचे इमान विकले ते मिंधे, राज, राणे हे कोणत्या अर्थाने शिवसेनाप्रमुखांचे खास वारसदार असल्याचा साक्षात्कार मोदी-शहा या दोन व्यापाऱ्यांना झाला? जे सर्वकाही खाऊन, गिळून कातडी वाचवण्यासाठी पळून गेले व पुन्हा शिवसेनेवरच भुंकू लागले असे

डरपोक लोक

बाळासाहेबांचे वारसदार वगेरे कदापि होऊच शकत नाहीत. हिंदुहृदयसम्राटांनी एक मंत्र निष्ठावंत मर्द-शिवसैनिकांना दिला तो म्हणजे, ‘‘एकवेळ लढला नाहीस तरी चालेल, पण विकला जाऊ नकोस!’’ तर सांगायचे असे की, जे विकले गेले व ज्यांनी विकत घेऊन चरणाशी बसवले अशांना मोदी यांनी प्रचारात व्यासपीठावर बसवून लोकांचे मनोरंजन केले. मोदी हे एक संवेदनाशून्य व्यक्ती आहेत. घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला. आणखी काही लोक त्या ढिगाऱ्याखाली चिरडले असावेत, त्यांचा शोध लागलेला नाही. त्या शोकमग्न परिसरात मोदी व त्यांच्या लोकांनी भव्य ‘रोड शो’ करून लोकांच्या मरणाचे आपल्याला काहीच सोयरसुतक नसल्याचे दाखवून दिले. मोदी हे पंतप्रधान कमी व ‘इव्हेंट नायक’ जास्त. जन्माबरोबर मरणाचाही ते इव्हेंट करतात. भाजपची त्यांनी गेल्या दहा वर्षांत इव्हेंट कंपनी केली व मोदी त्या इव्हेंट कंपनीचे ‘सीईओ’ बनले. हुकमी रडायचं, हसायचं, पूजा करायची, खोटे बोलायचे, कपाळावर भस्म लावायचं, गरीबांबाबत कणव असल्याचे ढोंग करायचे, स्वतःला विश्वगुरू असल्याचे भासवायचे व त्यासाठी भाडोत्री टाळकरी नेमायचे. फकीर असल्याचे सांगायचे व कोट्वयधींचे कपडे, महागडी घडय़ाळे, पेन, खास विमान यांचा ‘भोग’ घ्यायचा हे यांचे धंदे. त्यांच्या भोगांना जो पैसा लागतो त्याची लूट त्यांना मुंबई-महाराष्ट्रातून करायची आहे. नव्हे, गेल्या दहा वर्षांत

अशा लुटीतूनच

त्यांनी मुंबई कंगाल केली. महाराष्ट्राचा तरुण बेरोजगार व शेतकऱयांना भिकारी केले. अशा मोदींच्या मांडीस मांडी लावून बसणाऱयांना यापुढे महाराष्ट्र, मऱ्हाठी स्वाभिमान वगैरेंवर बोलण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्र या वेळी मोदींचा दारुण पराभव करत आहे. मोदी हे राज्यात विक्रमी सभा घेत आहेत व मोदी जातील तिथे लोक त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडत आहेत. मोदी देशाच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. हिंदू-मुसलमान, उद्धव ठाकरे, शरद पवार यावरच ते बोलतात व कालपर्यंत जे भ्रष्ट व देश लुटणारे होते त्यांचे कौतुक करतात. व्यासपीठावर त्यांना मिठय़ा मारतात. प्रज्वल रेवण्णा याने 2000 वर बलात्कार केले. अशा सर्व रेवण्णांना व ‘काम’ण्णांना खांद्यावर आणि मांडीवर घेऊन मोदी विजय मिळवू इच्छितात. मुंबईतील शिवाजी पार्कावर या सगळय़ाचे हिडीस प्रदर्शन घडले. या वेळच्या लोकसभा निवडणूक काळातला मोदींचा प्रचार, त्यांचा खोटेपणा, भंपकपणा, धर्मांधता ही क्लेशदायक ठरली. मोदी हे लवकरच पंचाहत्तरी गाठत आहेत. त्यामुळे त्यांच्या मनावरचा, शरीरावरचा ताण त्यांच्या वाणीवर दिसू लागला आहे. ‘म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान’ असे एक ‘पद’ मराठी संगीत नाटकात आहे. मोदी पाऊणशे वर्षांचे होत असतानाही भाजप त्यांना स्वार्थासाठी वेठबिगारासारखे राबवत आहे, हे निर्घृण आहे. मोदी 18 तास काम करतात. त्यांना झोपता येत नाही. त्यांना झोपेची व विश्रांतीची गरज दिसते. शिवाजी पार्कच्या सभेने मोदींच्या विश्रांतीचा मार्ग मोकळा केला. महाराष्ट्र मोदींना विश्रांती मिळवून देईल.