
कालपर्यंत अमेरिकेच्या खैरातीवर जगणारा आणि ऊठ म्हटले की उठणारा पाकिस्तान अचानक अमेरिकेच्या कडेवरून उतरून रशियाच्या मांडीवर जाऊन बसल्यामुळे अमेरिकेचे पित्त खवळले असेल आणि म्हणून अमेरिकेने इम्रान यांच्या खुर्चीखाली फटाका लावला असा आरोप केला जात असेल तर अमेरिकेचा पूर्वेतिहास पाहता वावगा म्हणता येणार नाही.
पाकिस्तान आणि चीन हे आपले असे दोन शेजारी देश आहेत की, इच्छा असो वा नसो, पण तेथील घटना, घडामोडींची नोंद हिंदुस्थानला घ्यावीच लागते. खास करून पाकिस्तानातील राजकीय घडामोडींवर तर हिंदुस्थानला बारकाईने नजर ठेवावी लागते. इम्रान सरकारविरुद्ध विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावापासून गेले 15 दिवस पाकिस्तानात नित्य नवी राजकीय दंगल सुरू आहे. यावर तोडगा म्हणून मावळते पंतप्रधान इम्रान खान यांनी अखेर पाकिस्तानची संसदच बरखास्त करून टाकली. इम्रान यांनी सभागृहातील शक्तिपरीक्षेला सामोरे न जाता थेट संसदच विसर्जित करून तीन महिन्यांत निवडणुका घेण्याची घोषणा केली. इम्रान यांच्या या आकस्मिक पवित्र्याने अविश्वास ठराव आणणारे विरोधी पक्ष, इम्रान यांच्या ‘तहरीक ए इन्साफ’ या पक्षातील बंडखोर मंत्री व खासदार आणि पाकिस्तानातील लष्करालाही बुचकळय़ात टाकले. बहुमत सिद्ध करण्याऐवजी इम्रान यांनी संसद बरखास्त करून घटनेचा भंग केल्याचा आरोप पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी केल्यानंतर विरोधी पक्षांनी पाकिस्तानचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांविरुद्ध तेथील सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने
संसदेच्या कामकाजाची
सर्व कागदपत्रे मागवली आहेत आणि येते काही दिवस राजकीय दंगलीचा हा वणवा पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात भडकताना दिसेल. संसद विसर्जित करताना पंतप्रधान इम्रान खान यांनी सरकार अस्थिर करण्यासाठी थेट अमेरिकेवरच दोषारोप केला होता. विरोधी पक्षांचे नेते आणि सरकारमधील आपल्या विरोधकांना हाताशी धरून अमेरिकेनेच आपली सत्ता उलथवून लावण्याचे षड्यंत्र रचले होते, असा गंभीर आरोप इम्रान यांनी केला होता. हा आरोप किती खरा आणि किती खोटा, यावरून पाकिस्तानात वादाला तोंड फुटले असतानाच आता रशियानेही या वादात उडी घेऊन इम्रान यांच्या दाव्याची पुष्टी केली आहे. इम्रान खान यांनी अमेरिका आणि पाश्चात्य देशांचा विरोध झुगारून दोन महिन्यांपूर्वी रशियात जाऊन ब्लादिमिर पुतीन यांची जी भेट घेतली त्याची किंमत इम्रान यांना मोजावी लागली, असा आरोप रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला आहे. इम्रान यांना राजकीयदृष्टय़ा अडचणीत आणणे हा अमेरिकेचा निर्लज्ज हस्तक्षेप असल्याची प्रतिक्रिया रशियाने नोंदवली आहे. कोणत्याही देशात जाऊन नाक खुपसण्याचा व तेथील अंतर्गत कारभारात लुडबुड करण्याचा अमेरिकेचा पूर्वेतिहास पाहता इम्रान खान व रशिया यांचा आरोप सपशेल चुकीचा आहे हे छातीठोकपणे कोणीही सांगू शकणार नाही. इम्रान आणि रशियाने केलेले आरोप अमेरिकेने फेटाळून लावले असले तरी त्यावर विश्वास कोण ठेवणार? इम्रान यांनी अमेरिकेला फाटय़ावर मारून 24 फेब्रुवारी रोजी
रशियात जाऊन पुतीन यांची
भेट घेतली आणि त्याच दिवशी रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारल्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इम्रान यांच्या तख्ताखाली सुरुंग लावला असे सांगितले जाते. त्यात तथ्यांश असेलही; कारण कालपर्यंत अमेरिकेच्या खैरातीवर जगणारा आणि ऊठ म्हटले की उठणारा पाकिस्तान अचानक अमेरिकेच्या कडेवरून उतरून रशियाच्या मांडीवर जाऊन बसल्यामुळे अमेरिकेचे पित्त खवळले असेल आणि म्हणून अमेरिकेने इम्रान यांच्या खुर्चीखाली फटाका लावला, असा आरोप केला जात असेल तर अमेरिकेचा पूर्वेतिहास पाहता तो वावगा म्हणता येणार नाही. आर्थिक दिवाळखोरीमुळे आधीच पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. त्यात प्रचंड भडकलेली महागाई, बेरोजगारी आणि दारिद्रय़ यांसारखे प्रश्न आ-वासून उभे असताना पाकिस्तानात राजकीय दंगल उसळली आहे. ही दंगल आटोक्यात आणण्यासाठी इम्रान यांनी थेट संसदच बरखास्त केली. परंतु दंगलीची आग शमण्याऐवजी त्याचा अधिकच भडका उडाला. पाकिस्तानात पेटलेल्या या राजकीय लढाईत आणखी तेल टाकण्याचे काम अमेरिका आणि रशियासारखे मातब्बर देश करत आहेत. त्यामुळे पाकिस्तानवर ओढवलेले राजकीय अस्थिरतेचे संकट ओसरण्याऐवजी अधिकच गडद होण्याची शक्यता अधिक आहे. केवळ धर्माच्या आधारावर हिंदुस्थानातून फुटून बाहेर पडलेल्या पाकिस्तानात संसदीय लोकशाहीची पाळेमुळे कधी खोलवर रुजलीच नाहीत. त्यामुळे दर दोन-पाच वर्षांनी पाकिस्तानात राजकीय अस्थिरतेचा तमाशा होत असतोच. मात्र, इम्रान यांना कठपुतळीप्रमाणे पंतप्रधानपदावर बसविणारे पाकिस्तानी लष्कर हा राजकीय तमाशा निमूटपणे का बघत असेल? की पाकिस्तानचे लष्करही अमेरिकेच्या इम्रानविरोधी कटात सहभागी आहे, हे येणारा काळच सांगेल.



























































