सामना अग्रलेख – आता सिंदूरचे राजकारण!

राजकीय प्रचाराच्या भाषणात मोदी यांनी सांगितले की,‘‘माझ्या नसांत आता रक्त नसून गरमागरम सिंदूर उसळत आहे.’’ मोदी हे हिंदुत्ववादी असतील तर त्यांनी सिंदुराचे महत्त्व समजून बोलायला हवे. सिंदूर भांगेतच शोभते. ते शरीरात गेले की त्याचे विष होते. आम्हाला मोदींच्या प्रकृतीची चिंता वाटते. शंकराने हलाहल पचवले. मोदी सिंदूरचे विष प्राशन करायला निघाले. 26 जणींच्या भांगेतले सिंदूर दहशतवाद्यांनी पुसले. त्या भगिनी उजाडलेले कपाळ घेऊन न्याय आणि बदला मागत आहेत. सिंदूरचे राजकारण करणाऱ्यांना हे कळेल काय?

पहलगाम हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’चे राजकारण करू नये, अशी भूमिका पंतप्रधान मोदी यांनी सुरुवातीला घेतली होती. आता स्वतः मोदी यांनीच या भूमिकेला तिलांजली देऊन सिंदूरचे राजकारण सुरू केले. हा प्रकार अमानुष आहे. पहलगामची लढाई ही दहशतवादाविरुद्धची निर्णायक लढाई होती व त्यात सर्व मतभेद विसरून विरोधी पक्ष सरकारच्या मागे एकवटला याबद्दल मोदी व त्यांच्या सरकारने किमान कृतज्ञता भाव व्यक्त करायला हवा होता, पण विरोधकांना श्रेय देतील ते मोदी कसले? कश्मीर खोऱ्यात 26 माय-भगिनींच्या कपाळावरील कुंकू अतिरेक्यांच्या हल्ल्यात पुसले व त्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सेनेने ‘सिंदूर’ ऑपरेशन राबवले, हे अभिमानास्पद आहे. सैन्य कारवाईवर कोणी राजकारण करू नये, हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. विरोधकांनी हे पथ्य पाळले असले तरी भाजप व त्यांचे लोक ‘सिंदूर’ प्रकरणाचे राजकारण करून या प्रकरणात ते किती असंवेदनशील आहेत याचे प्रदर्शन रोज घडवीत आहेत. भाजप ठिकठिकाणी ‘सिंदूर’ यात्रा काढून राजकीय प्रचाराचा शंखनाद करीत आहे. सीमेवर जणू भाजपचे कार्यकर्तेच लढायला उतरले व त्यांच्यामुळेच पहलगामचा बदला पूर्ण झाल्याच्या थाटात हे लोक सिंदूर यात्रा काढू लागले आहेत. सिंदूर यात्रा काढावी असे कोणते शौर्य भाजपवाल्यांनी गाजवले आहे? जो काही पराक्रम केला तो भारतीय सैन्याने केला, पण पराक्रमाने शिखर गाठण्याआधीच अमेरिकेचे प्रे. ट्रम्प यांनी भारतीय सैन्याचे दहशतवादाविरुद्ध पुकारलेले युद्ध थांबवले. भारत हे जणू

अमेरिकेचे अंकित राष्ट्र

आहे अशा थाटात ‘व्यापार’ थांबवण्याची धमकी देऊन भारतीय सैन्याला पराक्रमाचे शिखर रचण्यापासून थांबवले व पंतप्रधान मोदी प्रे. ट्रम्पच्या या हस्तक्षेपावर मूग गिळून बसले आहेत. हा मोदींचा पराक्रम ऑपरेशन सिंदूरचाच भाग असेल तर भाजपच्या सिंदूर यात्रेत तसे स्पष्ट केले पाहिजे. पहलगाम हल्ल्यातले सहा अतिरेकी अद्यापि सापडले नाहीत. त्यांचा ठावठिकाणा लागत नाही. मग सिंदूरच्या नावाने यात्रा काढून भाजप काय साध्य करीत आहे? पाकिस्तानवर अर्धामुर्धा हल्ला केला व पहलगामचे हल्लेखोर अतिरेकी हातून निसटले. हे काय विजय उत्सव साजरे करण्याचे कारण झाले? मोदी यांनी स्वतःच्या लष्करी गणवेशातले फोटो, होर्डिंग्ज सर्वत्र लावले आहेत. हा भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा अपमान आहे. भारतात लष्करशाही आली आहे काय? पाकिस्तानात, युगांडात, म्यानमार, आफ्रिकेतील अनेक राष्ट्रांचे प्रमुख हे लष्करी गणवेशात असतात. त्या देशात लोकशाही नाही व लष्करात बंडाळ्या घडवून हे लोक सत्तेवर येतात. युगांडात ईदी अमीन, पाकिस्तानात याह्या खान, जनरल झिया उल हक, जनरल मुशर्रफ वगैरे लोक सैन्याच्या वेषात राज्यकर्ते झाले. हे हुकूमशाहीचे प्रतीक आहे. मोदी पहलगाम हल्ल्यानंतर वारंवार लष्करी गणवेषात दाखवले जात आहेत. याचा अर्थ भारतीयांनी काय घ्यायचा? पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी ‘रालोआ’शासित मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. ‘ऑपरेशन सिंदूर’ हेच यापुढे प्रचाराचे अस्त्र असेल असे या बैठकीत ठरविण्यात आले. म्हणजे पुलवामात

हौतात्म्य पत्करलेल्या

चाळीस जवानांच्या प्रेतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार 2019 च्या लोकसभा निवडणुकीत झाला. तोच प्रयोग ‘सिंदूर’ पुसल्या गेलेल्या 26 जणींच्या बाबतीत होईल. पहलगाम हल्ला व ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने राजकीय शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रकार धक्कादायक आहे. देश संकटात असतानाही मोदी व त्यांचे लोक त्यांचा हेका आणि ठेका सोडायला तयार नाहीत. या संकटसमयी जगातले एकही राष्ट्र भारताच्या बाजूने ठामपणे उभे राहिले नाही. हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे व डंकापती पंतप्रधान मोदींच्या विश्वरूपी नेतृत्वाचे अपयश आहे. त्या अपयशाचा उत्सव ‘सिंदूर यात्रा’ वगैरे काढून साजरा करणे हे भाजपलाच जमू शकेल. भारताने पाकिस्तानविरोधात घेतलेली भूमिका ही दहशतवाद संपविण्याची आहे. ही भूमिका जगाला समजावी म्हणून सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळे जगभरात पाठवली, पण येथे भारतात पाकिस्तानच्या निमित्ताने मोदी व त्यांचे लोक विरोधी पक्षाशी लढत आहेत. दहशतवाद्यांचा इतका मोठा हल्ला होऊनही सरकारचे शेपूट वाकडे आहे व ते खोटे बोलून विषय रेटून नेण्यातच धन्यता मानत आहेत. राजकीय प्रचाराच्या भाषणात मोदी यांनी सांगितले की, ‘‘माझ्या नसांत आता रक्त नसून गरमागरम सिंदूर उसळत आहे.’’ मोदी हे हिंदुत्ववादी असतील तर त्यांनी सिंदुराचे महत्त्व समजून बोलायला हवे. सिंदूर भांगेतच शोभते. ते शरीरात गेले की त्याचे विष होते. आम्हाला मोदींच्या प्रकृतीची चिंता वाटते. शंकराने हलाहल पचवले. मोदी सिंदूरचे विष प्राशन करायला निघाले. 26 जणींच्या भांगेतले सिंदूर दहशतवाद्यांनी पुसले. त्या भगिनी उजाडलेले कपाळ घेऊन न्याय आणि बदला मागत आहेत. सिंदूरचे राजकारण करणाऱ्यांना हे कळेल काय?