सामना अग्रलेख – बंडखोर प्रबोधनकार!

प्रबोधनकार ठाकरे यांची लेखणी, वाणी म्हणजे तोफांचा मारा होता. शत्रू किती सामर्थ्यशाली आहे, तो आपले किती नुकसान करील, याची पर्वा त्यांनी कधीच केली नाही. महाराष्ट्राच्या शत्रूंवर ते बेभानपणे तुटून पडले. प्रबोधनकारांच्या प्रेरणेतून ‘शिवसेने’सारख्या शुद्ध महाराष्ट्रीय, हिंदुत्ववादी संघटनेची स्थापना झाली व शिवतीर्थावरील पहिल्याच सभेत प्रबोधनकारांनी महाराष्ट्रापुढे ओंजळ रिती करत सांगितले, ‘‘आज हा माझा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे.’’ त्याच बाळ केशव ठाकरे म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे इतिहास निर्माण केला. प्रबोधनकार ठाकरे यांना लाख लाख अभिवादन. प्रबोधनकारांच्या सामाजिक क्रांतीच्या मशालीस मानाचा मुजरा!

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा आज 50 वा स्मृतिदिन. पन्नास वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले, पण महाराष्ट्राच्या या बंडखोर समाजसुधारकाचे नाव आजही शाहू, फुले, आंबेडकर यांच्या बरोबरीने घेतले जाते. महाराष्ट्र आज जातीपातीत दुभंगला आहे. श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धा आणि व्यक्तिपूजेस महत्त्व देणारा समाज, जादूटोणा, बुवा-महाराज म्हणजेच हिंदुत्व असे मानणारे सत्ताधारी सभोवती ढोंगबाजीचे अवडंबर माजवीत असताना प्रबोधनकारांच्या ज्वलंत विचारांची व नेतृत्वाची गरज जाणवत आहे. प्रबोधनकारांचे सबंध आयुष्य म्हणजे अनेक लढायांचा नुसता खणखणाट होता. ते अत्यंत तर्कशुद्ध असे सुधारणावादी होते. ते लेखक होते, पत्रकार होते, फर्डे वक्ते होते, संपादक होते, नट होते, परखड इतिहासकार होते आणि सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या ‘महाभारता’तील आघाडीचे योद्धा होते. त्यांच्या वाणीस व लेखणीस तलवारीची धार होती. ‘कोदंडाचा टणत्कार’, ‘भिक्षुकशाहीचे बंड’, ‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’ अशा पुस्तकांतून त्यांनी प्रचलित धर्मव्यवस्थेवरील कर्मकांडावर प्रहार केले. जाती व्यवस्था, अस्पृश्यता, हुंडा-बालविवाहास सक्रिय विरोध केला. या परंपरा हिंदू धर्मास मारक आहेत व थांबल्याच पाहिजेत असे त्यांचे मत होते. ते सुधारणावादी हिंदू होते. त्यांची त्याबाबतची मते सध्याच्या ढोंगी हिंदुत्ववाद्यांना व सनातन्यांना पटणार नाहीत. त्यांना एकदा विचारले, ‘‘परधर्मीयाकडे अन्न भक्षण केल्याने हिंदू बाटतो की नाही?’’ त्यावर प्रबोधनकार कडाडले, ‘‘हिंदूला कशानेही बाट लागत नाही.’’ प्रबोधनकारांना पुढचा प्रश्न होता, ‘‘काय हो, तुम्ही हिंदू, मग कधी मुसलमानांकडे जेवता का?’’ प्रबोधनकार म्हणाले, ‘‘आम्ही वाटेल त्याच्या हातचे खाऊ आणि हिंदू राहू.’’ हा प्रश्नकर्ता ख्रिस्ती रेव्हरंड होता व तो

प्रबोधनकारांना

घोळात घेत होता. त्याने शेवटी विचारले, ‘‘मि. ठाकरे, तुम्ही गोमांस खाल का?’’ त्यावर प्रबोधनकारांनी खणखणीतपणे सांगितले, ‘‘अरे बाबा, आम्ही गोमांसच काय, आम्ही तुम्हाला खाऊ, तुमच्या क्रिस्ताला खाऊ, सगळय़ा जगाला खाऊ आणि वर निर्भेळ हिंदूच राहू. आजकालची ही नवी जनस्मृती आहे!’’ प्रबोधनकारांचे विचार असे क्रांतिकारक होते. प्रबोधनकार म्हणजे लढणारा शेलारमामा. जिथे कुठे अन्याय दिसेल तिथे ते पेटून उठायचे, अन्यायाचा फडशा पाडायचे. त्या कामी अन्याय करणाऱयांची ‘दे माय धरणी ठाय’ करायचे. सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांना इंग्रजांनी पदभ्रष्ट केले. मराठय़ांच्या राजावरील अन्यायाची तड लावण्यासाठी रंगो बापूजी गुप्ते थेट लंडनपर्यंत धडक मारायला गेले. राजासाठी ते लंडनच्या भूमीवर शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले. त्या झुंझार रंगो बापोजींचा इतिहास पुस्तकरूपाने लिहून प्रबोधनकारांनी इतिहासात मानाचे पान पटकावले. कर्मवीर भाऊराव पाटील हे प्रबोधनकारांना गुरुस्थानी मानत. भाऊरावांनी गोरगरीब मुलांसाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेचा व्याप प्रचंड वाढला आहे, पण ही संस्था सुरू करताना प्रबोधनकार भाऊरावांच्या पाठीशी ठामपणे उभे होते. या संस्थेची माहिती त्यांनीच आपल्या ‘प्रबोधन’ आणि ‘लोकहितवादी’ या साप्ताहिकांतून समस्त महाराष्ट्राला करून दिली. ‘रयत’च्या उभारणीसाठी लागणारे अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी प्रबोधनकारांनी मेहनत घेतली. आपल्या ‘खरा ब्राह्मण’ या नाटकाचा प्रयोग कोल्हापूर येथे करून एका प्रयोगाचे सर्व उत्पन्न रयत शिक्षण संस्थेला दिले. इतकेच नव्हे तर महात्मा गांधी पुण्याला आलेले असताना त्यांच्याशी खडाजंगी करून प्रबोधनकारांनी भाऊरावांच्या शाहू बोर्डिंगला हरिजन फंडातून चांगले

अनुदान मिळवून

दिले. प्रबोधनकार ठाकरे यांची लेखणी, वाणी म्हणजे तोफांचा मारा होता. शत्रू किती सामर्थ्यशाली आहे, तो आपले किती नुकसान करील, याची पर्वा त्यांनी कधीच केली नाही. महाराष्ट्राच्या शत्रूंवर ते बेभानपणे तुटून पडले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्यांच्या मनात नितांत श्रद्धा होती. दलित जनतेस आवाहन करताना त्यांनी एकदा सांगितले, ‘‘तुम्ही माझ्यावरही विश्वास ठेवू नका. येडपटांनो, तुमच्या भाग्याने तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा तरणा जवान, हाडा-रक्तामांसाचा पुढारी लाभला असताना तुम्ही इतरांच्या मागे का लागावे? अहो, मेंढय़ांचा पुढारी दाढीवाला बोकड असावा, लांडगा कसा चालेल? त्या आंबेडकरांना जाऊन भेटा, तोच तुमचे कल्याण करणार!’’ असे होते प्रबोधनकार. संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा लढा होता. आयुष्यभर संघर्ष करीत राहिल्याने त्यांचे शरीर थकले होते. तरीही ते संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात उतरले. ज्याला आयुष्यात काही करून दाखवायचे आहे, त्याने प्रबोधनकारांच्या ‘माझी जीवनगाथा’ची पारायणे केली पाहिजेत. आपल्या जीवनगाथेत प्रबोधनकार एक मंत्र देतात, ‘‘ज्याच्या अंगात हुन्नर आहे, हिंमत आहे, जिद्द आणि स्वाभिमान आहे असा माणूस केव्हाही बेरोजगार आढळणार नाही. हा माझ्या जीवनाचा साक्षात्कार आहे, सिद्धांत आहे.’’ प्रबोधनकारांच्या प्रेरणेतून ‘शिवसेने’सारख्या शुद्ध महाराष्ट्रीय, हिंदुत्ववादी संघटनेची स्थापना झाली व शिवतीर्थावरील पहिल्याच सभेत प्रबोधनकारांनी महाराष्ट्रापुढे ओंजळ रिती करत सांगितले, ‘‘आज हा माझा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे.’’ त्याच बाळ केशव ठाकरे म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे इतिहास निर्माण केला. प्रबोधनकार ठाकरे यांना लाख लाख अभिवादन. प्रबोधनकारांच्या सामाजिक क्रांतीच्या मशालीस मानाचा मुजरा!