सामना अग्रलेख – जिरेटोपामागचे (खालचे) डोके

मोदी-शहांच्या डोक्यावर शिवकालीन पगड्या घातल्या तरी त्यांच्या डोक्यात वळवळणाऱ्या महाराष्ट्रद्वेषाचे किडे काही शांत होणार नाहीत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र. डॉ. आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या बाबतीत यांच्या डोक्यात काही शुद्ध प्रामाणिक विचार नाहीत. संविधान बदलायचा विचार त्यांच्या डोक्यात सुरूच आहे. शिवरायांचा महाराष्ट्र व महाराष्ट्राचा मर्दानी बाणा त्यांच्या डोळ्यात खुपत आहे व डोक्यात त्याबाबत कारस्थाने आहेत. अशा डोक्यावर शिवरायांचा जिरेटोप ठेवणे म्हणजे लटकत्या आत्म्यांचा जिहादच आहे. आमच्या दैवतांचा आणि हिंदुत्वाचादेखील हा अपमान आहे.

घाटकोपर येथील होर्डिंग्ज दुर्घटनेत आतापर्यंत 18 जणांचे बळी गेल्याचे समोर आले आहे. त्याच घाटकोपरला पंतप्रधान मोदी यांनी रोड शो केला. जणू काही घडलेच नाही, अशा थाटात भाजपने हे केले. आदल्या दिवशी गोंदियाचे प्रफुल पटेल यांनी काशीला जाऊन मोदी यांना शिवरायांप्रमाणे जिरेटोप घातला. हा जिरेटोप मोदींच्या डोक्यावर नीट बसला की नाही ते त्यांनाच माहीत. मात्र हेच पटेल दाऊद इब्राहिमचे साथीदार इक्बाल मिर्चीचे हस्तक असल्याचा आरोप याच मोदी यांनी उघडपणे केला होता. आता त्याच ‘मिर्ची मियाँ’ पटेलांकडून मोदी यांनी स्वतःच्या डोक्यावर जिरेटोप चढवून घेतला. हा महाराष्ट्राचा व छत्रपती शिवरायांचा अपमानच म्हणावा लागेल. पुन्हा या जिरेटोपाखालचे डोके महाराष्ट्राच्या बाबतीत प्रामाणिक नाही. महाराष्ट्राविरुद्ध अनेक कारस्थाने त्या डोक्यात घोळत असतात. मराठी माणसाच्या बाबतीत द्वेषाचे विष ज्या डोक्यात उकळत असते त्या डोक्यावर शिवरायांप्रमाणे जिरेटोप चढवून गोंदियाच्या पटेलांनी काय साधले? दाऊदचा हस्तक मिर्ची याच्याशी व्यावहारिक संबंध असल्याचा ठपका ‘ईडी’ वगैरे संस्थांनी याच पटेलांवर ठेवला होता. त्यामुळे पटेलांची शे-पाचशे कोटींची संपत्ती जप्त केली गेली. त्याच पटेलांकडून मोदी यांनी स्वतःचा सन्मान करून घेतला. काशीच्या पवित्र नगरीत हे घडले. यावर नीतिमान भाजपचे काय म्हणणे आहे? अलीकडे श्रीमान मोदी हे महाराष्ट्रात जवळ जवळ मुक्कामी असल्यासारखेच आहेत. एकटय़ा बुधवारच्या दिवशीच पिंपळगाव, बसवंत, कल्याण, भिवंडी, मुंबईतले ‘रोड शो’ अशा त्यांच्या

जंगी कार्यक्रमांचे

आयोजन केले गेले. मुळात मोदी हे दिल्ली सोडून सतत महाराष्ट्रात येत आहेत ते पराभवाच्या भीतीने. मोदी हे प्रतिशिवाजी आहेत व छत्रपती शिवरायांप्रमाणे ते महाराष्ट्रात पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करतील अशा भ्रमात त्यांचे लोक असतील तर ते तितकेसे खरे नाही. मोदी हे मुंबईत राजकीय रोड शोसाठी येत असले तरी पंतप्रधानपदाचा लवाजमा घेऊन आले व त्यांच्या रोड शोच्या निमित्ताने अर्धी मुंबई पोलिसांनी बंद करून ठेवली. अनेक रस्त्यांवरची वाहतूक दिवसभर बंद केली. काही मार्ग वळवले. मोदी जेथे जाणार तेथील दुकाने, टपऱ्या, लहान व्यवसाय बंद करण्यात आले. रिक्षावाले, टॅक्सीवाले यांच्या पोटावर मारून त्यांना तेथे फिरकू दिले नाही. आजूबाजूच्या अनेकांच्या खिडक्या बंद करून ठेवण्यास सांगितले. मुंबई मेट्रो सेवादेखील संध्याकाळी अचानक बंद केली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. लोकांना अशा प्रकारे वेठीस धरून कार्यवाहक पंतप्रधानांना मुंबईत प्रचार करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे काय? ही प्रचाराची बादशाही किंवा शहेनशाही पद्धत लोकशाही किंवा निवडणूक आचारसंहितेच्या कोणत्या कलमात बसते ते आपल्या महान निवडणूक आयोगाने एकदा स्पष्ट करावे. मुंबईचे रस्ते अडवून व ताब्यात घेऊन लोकांचा छळ करून असा प्रचार करणे हे अमानुष व संवेदनाहीनतेचे लक्षण आहे. घाटकोपरमधील होर्डिंग्ज दुर्घटनेत आतापर्यंत 18 जणांचे बळी गेले आहेत. आजही अनेक जण त्या ढिगाऱयाखाली अडकून पडले असावेत अशी भीती व्यक्त होत आहे. मुंबई महापालिकेत आता तीनेक वर्षांपासून भाजपचेच राज्य सुरू आहे. मुंबईतील एक बिल्डर पालकमंत्री लोढा यांनी तर त्यांचे

कार्यालय महापालिकेतच

थाटले, तेव्हा पालिकेचे सध्याचे कारभारी हेच घाटकोपरच्या होर्डिंग्ज दुर्घटनेस जबाबदार आहेत. घाटकोपरमधील या दुर्घटनेत 18 बळी का गेले? याबाबत मोदी यांनी त्यांच्या लोकांना प्रश्न केला असेल काय? गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात नवी मुंबईतील खारघर येथे झालेल्या श्री सेवकांच्या मेळाव्यास गृहमंत्री शहा हजर होते. त्या वेळीही पन्नासेक श्री सेवक उन्हात तडफडून व गुदमरून मृत झाले होते. या दुर्घटनेबाबतही वरवरचा अश्रुपात करून सर्वच प्रकरण रफादफा केले गेले. सूर्य आग ओकत असताना त्या भर उन्हात असे कार्यक्रम करणे, त्या कार्यक्रमास देशाच्या गृहमंत्र्यांनी हजेरी लावणे आणि चेंगराचेंगरीत लोक मरत असताना दिल्लीस पलायन करणे, हे संवेदनाहीनतेचेच लक्षण होते; पण भाजप परिवार व संवेदना यांचे विळ्या-भोपळ्याचे नाते असल्याने त्यांच्याकडून किमान माणुसकीची अपेक्षा करणे तसे चूकच आहे. मोदी-शहांच्या डोक्यावर शिवकालीन पगड्या घातल्या तरी त्यांच्या डोक्यात वळवळणारे महाराष्ट्रद्वेषाचे किडे काही शांत होणार नाहीत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र. डॉ. आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या बाबतीत यांच्या डोक्यात काही शुद्ध प्रामाणिक विचार नाहीत. संविधान बदलायचा विचार त्यांच्या डोक्यात सुरूच आहे. शिवरायांचा महाराष्ट्र व महाराष्ट्राचा मर्दानी बाणा त्यांच्या डोळ्यात खुपत आहे व डोक्यात त्याबाबत कारस्थाने आहेत. अशा डोक्यावर शिवरायांचा जिरेटोप ठेवणे म्हणजे लटकत्या आत्म्यांचा जिहादच आहे. आमच्या दैवतांचा आणि हिंदुत्वाचादेखील हा अपमान आहे. तूर्त इतकेच!