खरोखरच अल्बर्ट आइन्स्टाइन जीनियस होते. त्यांनी नेहरूंचे महानपण पहिल्या भेटीतच ओळखले. 56 वर्षांपूर्वी नेहरू गेले तरी त्यांचे हे मोठेपण कायम आहे. महान नेहरू यांनी जात-धर्मनिरपेक्ष देश घडविण्याचा सफल प्रयत्न केला. स्वतःच्या जातीचा प्रचार करून राजकारण करण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. धर्माच्या अफूची गोळी व जातीचा गांजा त्यांनी लोकांना दिला नाही. त्यांनी ज्ञान-विज्ञानाचा मंत्र चिरंजीव केला. त्यामुळे वारंवार स्वतःच्या जातीचा उद्धार करण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. मोदी हे स्वतःची जात रोज सांगतात. खरे तर पंतप्रधानपदावरील व्यक्तीस ‘जात’ नसते. मोदी हे मात्र जातीत रमतात! त्यामुळे आइन्स्टाइन त्यांना कधीच भेटणार नाहीत!
राजकारणात एखाद्याकडे सांगण्यासारखे फार काही नसले की तो स्वतःच्या जातीवर येतो. स्वतःची जात काढतो. जातीबाबत हातघाईवर येतो. पंतप्रधान मोदी यांनी तेच केले आहे. पंतप्रधान स्वतःची जात वगैरे सांगून रडायला लागतो व त्यावर मते मागतो तेव्हा बेशक समजावे, या पंतप्रधानाने जनतेसाठी व देशासाठी काहीच केलेले नाही व जात हाच त्याचा मुख्य आधार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेस उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितले, “मी ओबीसी आहे.’’ 2014 साली ते महागाई, भ्रष्टाचार कमी करण्याच्या मुद्दय़ांवर मते मागत होते. 2019 साली ‘पुलवामा’तील हुतात्म्यांच्या नावाने मतांचा जोगवा मागितला व आता राममंदिराबरोबर ते स्वतःची जात चालवू पाहत आहेत. हा प्रकार धक्कादायक आहे. मोदी हे स्वतःला ‘ओबीसी’ असल्याचे सांगतात. पण ही त्यांची थापेबाजी असून मोदी देशाला फसवत आहेत, असे राहुल गांधी यांनी पुराव्यासह समोर आणले. मोदी हे नकली ओबीसी आहेत. मोदी यांचा जन्म मोढ घांची जातीत झाला. उत्तरेत ही जात ‘तेली’ म्हणून ओळखली जाते. गुजरातमध्ये ही जात आधी ओबीसी प्रवर्गात समाविष्ट नव्हती. केंद्रात भाजपचे राज्य आल्यावर त्यांनी आपल्या मोढ घांची जातीचा समावेश ‘ओबीसी’त केला. मोदी गुजरातच्या सधन व समृद्ध जातीत जन्मास आले व राजकीय लाभासाठी त्यांनी स्वतःची जात ‘ओबीसी’त घातली. त्यामुळे मोदी यांचा ते ‘ओबीसी’ वगैरे असल्याचा आक्रोश खोटा आहे. गुजरात सरकारच्या समाज कल्याण विभागाने 25 जुलै 1994 रोजी एक अधिसूचना जारी केली. त्यानुसार नव्या 36 जाती ओबीसी प्रवर्गात सामील केल्या. त्यातील 25(ब) क्रमांकावर मोढ घांची जातीचा समावेश असून त्या जातीस ओबीसीमध्ये सामील केले गेले. आता आपले पंतप्रधान मोदी हे ज्या श्रीमंत मोढ घांची जातीतून आले ती जात नेमकी आहे तरी काय? या जातीचे लोक घाण्यापासून बनवल्या जाणाऱया तेलाचा व्यापार करतात व त्या व्यापारातून ते बऱयापैकी समृद्ध झाले. ही जात गरीब किंवा गरीब रेषेखाली नसल्याचे सांगितले जाते. अर्थात ते काही असले तरी दहा वर्षे
पंतप्रधानपदाचे वैभव भोगणाऱ्या
व्यक्तीने आपण ‘ओबीसी’ जातीचे असल्याचा आक्रोश करणे योग्य आहे काय? मोदी यांचा सूट-बूट दहा-पंधरा लाखांचा, मनगटावरील घड्याळ पाच लाखांचे, खिशाला पेन चार लाखांचे, वीस हजार कोटींचे विमान त्यांनी स्वतःच्या उड्डाणासाठी खरेदी केले. त्यामुळे अशा व्यक्तीने मी या किंवा त्या जातीचा आहे असे वारंवार बोलणे बरे नाही. देशात आज ‘जात विरुद्ध जात’ असा संघर्ष अनेक राज्यांत उभा राहिला आहे. महाराष्ट्रात कधी नव्हे तो ‘मराठा विरुद्ध ओबीसी’ असा संघर्ष निर्माण झाला व मोदी यांनी स्वतःची जात सांगून या संघर्षात तेलच ओतले. लोकमान्य टिळक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे खऱया अर्थाने तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी होते. म्हणजेच समाजातील कष्टकऱयांचे नेतृत्व ते करीत होते. महात्मा गांधी, सरदार पटेल, भगतसिंग, राजगुरू यांनीही ‘जात’ पंचायत केली नाही. पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्र्ााr, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी अशा पंतप्रधानांवर ‘जात’ मुखवटा लावून आक्रोश करण्याची वेळ आली नव्हती. कारण त्यांचे राष्ट्रकार्य, विकास कार्य अफाट होते व हे लोक नैराश्याने ग्रासलेले नव्हते. पंतप्रधान मोदी यांचे तसे नाही. ते दहा वर्षांनंतरही कमालीचे असुरक्षित आहेत व त्यापायी ते जात-धर्म वगैरे विषयांचे राजकारण करतात. मोदी यांना वारंवार खोटे बोलावे लागते. इतिहासाचे खोटे दाखले द्यावे लागतात. ज्यांनी देश घडवला अशा नेहरूंसारख्या थोर व्यक्तिमत्त्वावर चिखल उडवावा लागतो. कारण स्वतःचे कर्तृत्व इतरांच्या बाबतीत खुजे आहे. मंदिरा-मंदिरांत जाणे, पितांबर नेसणे, ध्यानमग्न छायाचित्रे काढणे, कपाळास भस्म लावून वावरणे, उपवास वगैरे करीत असल्याचा प्रचार करणे, अयोध्या ते दुबई मंदिर उद्घाटनांचे सोहळे करून लोकांना गुंग करणे हे प्रगतीशील राष्ट्राच्या नेत्याचे काम नाही. पण मोदी तेच करतात. नेहरू यांनी हे केले नाही म्हणून मोदी हे नेहरूंवर
घाणेरडी टीका
करतात. नेहरू जगभरातील तंत्रज्ञान, शास्त्र्ाज्ञांत रमले. 1949 साली नेहरू अमेरिकेत गेले व अल्बर्ट आइन्स्टाइन यांना भेटले. भेट संपल्यावर नेहरू आइन्स्टाइन यांना म्हणाले, ‘‘सर, आपण जीनियस आणि महान आहात. येणाऱ्या पिढ्या आपले सदैव स्मरण ठेवतील.’’ यावर आइन्स्टाइन यांनी उत्तर दिले, “मि. नेहरू, कोण किती महान हे 21 व्या शतकात कळेल.’’ आइन्स्टाइन यांच्या या उत्तरात एक गर्भित अर्थ दडला होता. त्या भेटीच्या 70 व्या वर्षानंतर प्रत्येक भारतीय नागरिकाला समजले की, आइन्स्टाइन शंभर टक्के खरे बोलले होते. कारण आजही देशाचा स्वयंघोषित ओबीसी प्रधान सेवक आपल्या प्रत्येक अपराधातून मुक्ती मिळवण्यासाठी देशाच्या पहिल्या कर्तबगार प्रथम सेवकास शरण जातो. ‘नेहरू नेहरू नेहरू’चा जप करतो. जी व्यक्ती आपल्या मृत्यूनंतर 56 वर्षांनंतरही 56 इंच छाती असणाऱया पंतप्रधानांना सकाळ, संध्याकाळ, रात्री सलग आठवते ती व्यक्ती खरोखरच किती महान असेल? खरोखरच अल्बर्ट आइन्स्टाइन जीनियस होते. त्यांनी नेहरूंचे महानपण पहिल्या भेटीतच ओळखले. 56 वर्षांपूर्वी नेहरू गेले तरी त्यांचे हे मोठेपण कायम आहे. महान नेहरू यांनी जात-धर्मनिरपेक्ष देश घडविण्याचा सफल प्रयत्न केला. त्यांच्या धर्मनिरपेक्षतेविषयी मतभेद असू शकतात, पण देशाचे मन दुभंगावे असे कृत्य त्यांनी केले नाही. स्वतःच्या जातीचा प्रचार करून राजकारण करण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. प्रत्येक संकटासमोर ते धैर्याने उभे राहिले असे इतिहास सांगतो. आपल्या स्वार्थासाठी इतिहासाच्या फालतू खोदकामांत त्यांनी वेळ घालवला नाही. त्यांनी लोकांना देश घडविण्याच्या कामी लावले. थाळ्या-टाळ्या, अक्षता, व्रत-वैकल्यांत त्यांनी लोकांना गुंगवून ठेवले नाही. धर्माच्या अफूची गोळी व जातीचा गांजा त्यांनी लोकांना दिला नाही. त्यांनी ज्ञान-विज्ञानाचा मंत्र चिरंजीव केला. त्यामुळे वारंवार स्वतःच्या जातीचा उद्धार करण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. मोदी हे स्वतःची जात रोज सांगतात. खरे तर पंतप्रधानपदावरील व्यक्तीस ‘जात’ नसते. मोदी हे मात्र जातीत रमतात! त्यामुळे आइन्स्टाइन त्यांना कधीच भेटणार नाहीत!