सामना अग्रलेख – ‘एक्स’ आणि ‘पायरी’

सत्ताकारणात कोणाला ‘एक्स’ म्हणजे माजी करायचे, कोणाला कळसावरून ‘पायरी’वर आणायचे हे मतदारच ठरवत असतो. या वेळीही देशातील मतदारांनी तसे ठामपणे ठरविले आहेच. मतदानाच्या आतापर्यंतच्या टप्प्यांत तेच दिसून आले आहे. कदाचित या भयगंडातूनच मोदी हे विरोधकांच्या ‘एक्स्पायरी डेट’च्या वल्गना करीत आहेत. स्वतःच्या समाधानासाठी तुम्ही हे पोकळ फुगे खुशाल हवेत सोडा, परंतु 2014 आणि 2019 मध्ये तुम्हाला डोक्यावर घेतलेल्या जनतेने आता सत्तेतून ‘एक्स’ (माजी) करण्याचे ठरविले आहे. तुम्हाला तुमची ‘पायरी’ दाखवून देण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा ‘एक्स’ फॅक्टर हाच आहे!

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा तिसरा टप्पा मंगळवारी पार पडला. मागील दोन टप्प्यांप्रमाणेच या टप्प्यातही बऱ्याच ठिकाणी मतदानाची टक्केवारी घसरलेलीच दिसली. प्रत्येक टप्प्यात कार्यवाहक पंतप्रधान मोदी यांनी प्रचाराचे नवनवीन मुद्दे आणण्याचा प्रयत्न केला, परंतु ते सगळे हवेतच विरले. प्रचारात रंगत येण्याऐवजी जनतेच्या थंड प्रतिसादाने त्यांच्याच चेहऱ्यावरचे रंग उडाले. आधी ‘अब की बार, चार सौ पार’ची हवा करण्यात आली. ‘चार सौ पार’च्या घोषणांनी भाजपचे कार्यकर्ते आणि अंधभक्तांनी आपले घसे फोडले. मात्र पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या झटक्याने ही मंडळी जमिनीवर आली आणि ‘चार सौ पार’ची हवा आणि घोषणा कुठे विरून गेल्या हे त्यांनाही समजले नाही. दुसऱ्या टप्प्यातील प्रचारात नेहमीप्रमाणे पाकिस्तान, हिंदू-मुस्लिम वगैरे नेहमीची शस्त्र मोदींनी आणून वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला. रेवण्णा सेक्स स्कँडलवर मौन बाळगणारे मोदी हिंदू-मुस्लिम, पाकिस्तान या मुद्दय़ांवर

घसा फोडून

बोलत होते. मात्र दुसऱ्या टप्प्यातही आधीच्या टप्प्याचीच पुनरावृत्ती झाली आणि पाकिस्तानचे शस्त्र मोदी पक्षाला झाडावर टांगून ठेवणे भाग पडले. तिसऱ्या टप्प्यात ‘व्होट जिहाद’ की ‘रामराज्य’, मुस्लिम आरक्षण वगैरे मुद्दे उकरून काढले गेले. हिंदु-मुस्लिम हे जुनेच पत्ते पिसण्याचा प्रयत्न मोदी यांनी केला. 4 जून ही इंडिया आघाडीची ‘एक्स्पायरी डेट’ आहे आणि नंतर आघाडीचे झेंडे उचलायलाही कोणी राहणार नाही, अशी वल्गना त्यांनी केली, परंतु हा नवा सूरही मतदारांनी बेसूरच ठरविला आहे. कारण मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यातही वेगळे काही घडलेले नाही. मतदानाचा टप्पा जसजसा पार पडतो आहे तसतसे त्यांनी काढलेले बाण त्यांना पुन्हा त्यांच्या भात्यात भरावे लागत आहेत. ज्या लाटेच्या बाता मोदी आणि भक्त मंडळी करीत होती ती लाट सोडा, साधी झुळूकही आतापर्यंतच्या मतदानात दिसलेली नाही. राममंदिर, 370 वगैरे मुद्दे तर आसपासही फिरकताना दिसत नाहीत. आतापर्यंतची मतदानाची आकडेवारी आणि मतदानाचा कल

वेगळेच संकेत

देत आहेत. त्यामुळे मोदी यांनी विरोधकांच्या ‘एक्स्पायरी डेट’ची उठाठेव न केलेलीच बरी. उलट मतदारांनी भाजपचाच ‘काटा’ काढलेला नाही ना, हे आधी तपासून घ्यावे. विरोधकांच्या ताटात डोकावण्यापेक्षा स्वतःच्या ताटात 4 जून रोजी काय वाढून ठेवले आहे, याचा विचार करावा. सत्ताकारणात कोणाला ‘एक्स’ म्हणजे माजी करायचे, कोणाला कळसावरून ‘पायरी’वर आणायचे हे मतदारच ठरवत असतो. या वेळीही देशातील मतदारांनी तसे ठामपणे ठरविले आहेच. मतदानाच्या आतापर्यंतच्या टप्प्यांत तेच दिसून आले आहे. कदाचित या भयगंडातूनच मोदी हे विरोधकांच्या ‘एक्स्पायरी डेट’च्या वल्गना करीत आहेत. स्वतःच्या समाधानासाठी तुम्ही हे पोकळ फुगे खुशाल हवेत सोडा, परंतु 2014 आणि 2019 मध्ये तुम्हाला डोक्यावर घेतलेल्या जनतेने आता तुम्हाला सत्तेतून ‘एक्स’ (माजी) करण्याचे ठरविले आहे. तुम्हाला तुमची ‘पायरी’ दाखवून देण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा ‘एक्स’ फॅक्टर हाच आहे!