
पुणे महापालिकेत, राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाची सत्ता असतानाही असे का घडले? स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नावाखाली वेडेवाकडे प्रयोग करण्याचा सपाटा पुण्यात सुरू आहे. सत्ताधाऱ्यांना ठेकेदारी आणि आरक्षणे उठविण्यातच अधिक रस आहे. मुंबई पाण्यात गेल्यानंतर पुण्यात आरामखुर्चीत बसून टीकेच्या बाकरवडय़ा तोडणाऱ्यांनी आता पुणे का बुडाले यावरही थोडे चर्वितचर्वण करायला काय हरकत आहे?
पुणे शहरात बुधवारी झालेल्या ढगफुटीसारख्या पावसाने एका रात्रीत जी दाणादाण उडवली ती थरारकच होती. वास्तविक गेले काही दिवस पुण्यात पावसाने ‘रात्रीस खेळ चाले’चाच प्रयोग सुरू केला आहे. दिवसा कडकडीत ऊन आणि सायंकाळी सातनंतर दे दणादण पाऊस! बुधवारी सायंकाळी तर पावसाने भयंकरच रौद्ररूप दाखवले. त्यामुळे पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळाले. पुणे तिथे काय उणे अशी अभिमानाने हाळी देणाऱ्या पुणेकरांची बोबडी पावसाने वळविली. बुधवारी सायंकाळी आठनंतर दोन तासात ढगफुटीसारखा पाऊस झाला. पुण्याच्या नकाशावर कुठेही बोट ठेवले तरी तिथे कमरेइतके पाणी साठलेय अशी परिस्थिती होती. मध्यभागातील पेठांमध्ये, इमारतीच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले होते. दांडेकर पूल भागातील वस्तीत इतके पाणी घुसले की, तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले. ठिकठिकाणी पाणी साचून रस्ते बंद झाल्यामुळे घराकडे निघालेली हजारो माणसे रस्त्यातच वाहतूककोंडीत अडकून पडली. कात्रजपासून सिंहगड रोडपर्यंत अवघे पुणे जलमय झाले. पेठांच नव्हे तर आयटी पार्क म्हणविणारा हिंजेवाडी परिसरही पाण्यात गेला. बिबवेवाडी, अरण्येश्वर, तावरे कॉलनी, सातारा रस्ता, कात्रज या भागात येणारे पाण्याचे लोट पाहून लोक अक्षरशः इमारतीच्या टेरेसवर जाऊन बसले. सातारा रस्त्यावर बीआरटी मार्गात अडकलेल्या लोकांनी पाण्याचा लोंढा पाहून जागेवरच वाहने सोडून सुरक्षितस्थळी आसरा घेतला आणि डोळ्यादेखत आपली कार, दुचाकी वाहून जाताना त्यांना पहावे लागले. पार्किंग केलेल्या शेकडो कार, दुचाकी रात्रीत वाहून गेल्या. अमृता सुदामे ही तरुणी ऍक्टिव्हासह वाहून गेली. 52 वर्षीय दत्तात्रय गिरमे त्यांच्या कारमध्येच मृतावस्थेत सापडले. असे
12 जणांचे बळी चार तासांत
गेले आणि हजारो पुणेकरांनी संपूर्ण रात्र भेदरलेल्या अवस्थेत काढली. पुण्याने जणू ‘मिनी केदारनाथ’ म्हणावा असा प्रलय पाहिला. रस्त्यावर हाहाकार उडालेला असताना कुठलीच सरकारी यंत्रणा मदतीला नव्हती. स्थानिक लोकच या अस्मानी संकटाशी सामना करत होते. मध्यरात्री दीड-दोननंतर अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे जवान मदतीसाठी पोहचू शकले. इतकी भीषण पूरस्थिती पुण्याने आजवर कधीच बघितली नव्हती. पुण्यातील या परिस्थितीला एका रात्रीतला पाऊस जबाबदार आहे की, पुणे महापालिकेचे बेजबाबदार प्रशासन आणि नोकरशाही यास कारणीभूत आहे, यावर आता चर्चा झडायला हवी. गेल्याच महिन्यात कोल्हापूर, सांगलीत कृष्णा, पंचगंगेस पूर आला तेव्हा पावसाच्या पाण्याने नदीचे पात्र फुगले अन् गावेच्या गावे पाण्यात बुडाली. मात्र पुण्यात मुळा, मुठा नद्यांची पात्रे आटोक्यात असतानाही रस्त्यारस्त्यांवर पूर आला. वास्तविक पुणे शहराची नैसर्गिक रचनाच अशी आहे की, कितीही पाऊस पडला तरी पाणी नाला-ओढय़ातून नदीपात्रात वाहून जाऊ शकते. इथे मुंबई शहरासारखे चहूबाजूने समुद्र आणि खाडीने वेढलेय अशी परिस्थिती नाही की भरतीचे पाणी शहरात घुसण्याची भीती नाही. तरीही पुणे का बुडाले? मुंबईत पाणी तुंबल्यावर नाकाने कांदे सोलणारे आता पुण्याच्या परिस्थितीवर कुठली कारणे देणार आहेत? चहुबाजूने समुद्र असलेली मुंबई भरतीच्या संकटात जलमय परिस्थतीशी दोन हात करत असते तेव्हा मुंबई महापालिकेविरुद्ध सोशल मीडियावरून ठणाणा करणारे वाचाळवीर आता कुठली चादर ओढून लपून बसले आहेत? नागपूर, अहमदाबादसारखी शहरे पावसामुळे जलमय होतात तेव्हाही न्यूज चॅनल्स आणि सोशल मीडियावर
तोंडाची डबडी कुणी
वाजवत नाही. मुंबईला निसर्गतःच पाण्याने वेढलेले आहे. परंतु पुण्यासारख्या शहरात हाहाकार का उडावा? इथे तर निसर्गानेच टेकडय़ा, डोंगरउतार इथून पाणी नदीपत्रात वाहून जाण्याची व्यवस्था केलेली आहे. मात्र अवाढव्य वाढणारी बांधकामे, इमारतींच्या संरक्षक भिंती, महापालिकेचे चुकीचे शहर आराखडे व नियोजन हेच या पूरपरिस्थितीला जबाबदार आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली ओढय़ांच्या पात्राचे गळे घोटले. स्वार्थासाठी हवे तसे वळविले. मग दुसरे काय होणार? ऑगस्ट महिन्यातच पुण्यातली सर्व धरणे काठोकाठ भरलेली असताना शहरात मात्र पाणीपुरवठा नाही. हे कोणामुळे घडतेय? शिवाजीनगरच्या नागरिकांना पाण्यासाठी भरपावसात हंडा मोर्चा काढावा लागतो. पुणेकरांना दहा मिनिटांच्या अंतरासाठी पाऊण तास, दीड तास रस्त्यावर अडकून पडावे लागते. गळक्या पीएमपीएल बसमधून कोंबून जावे लागते. सोशल मीडियावर जगभरातील घडामोडींविषयी भाष्य करून आपले ज्ञान पाजळणाऱ्या मंडळींची नेमकी पुण्यातील या रोजच्या त्रासावरच दातखिळी कशी बसते? बुधवारच्या प्रलयकारी पावसानंतर पुण्यात आलेल्या महापुराचे पाणी गुरुवारी ओसरले. तथापि, पुणेकरांच्या मनात बसलेली भीती मात्र लगेचच ओसरणार नाही. पुणे महापालिकेत, राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाची सत्ता असतानाही असे का घडले? स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नावाखाली वेडेवाकडे प्रयोग करण्याचा सपाटा पुण्यात सुरू आहे. सत्ताधाऱ्यांना ठेकेदारी आणि आरक्षणे उठविण्यातच अधिक रस आहे. मुंबई पाण्यात गेल्यानंतर पुण्यात आरामखुर्चीत बसून टीकेच्या बाकरवडय़ा तोडणाऱ्यांनी आता पुणे का बुडाले यावरही थोडे चर्वितचर्वण करायला काय हरकत आहे?






























































