सामना अग्रलेख – ते पुन्हा पकडले!

3891
Silhouette of soldier with rifle

कश्मीरात मोठा फौजफाटा आहे म्हणून परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. शांततेचे धुके पसरले असले तरी भूगर्भात एक वेगळी खदखद जाणवत आहे. हे सर्व काळजीपूर्वक पाहणे गरजेचे आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांना जेरबंद करणे ही प्रत्येक वर्षी होणारी कारवाई आहे. आताही ते पुन्हा पकडले गेले आहेत आणि कश्मीर तसेच राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याचा कट उधळला गेला आहे. दिल्लीचाच नव्हे तर कश्मीर खोऱ्यात फडकणारा प्रत्येक तिरंगा सुरक्षित राहिला पाहिजे!

स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनाचे सोहळे जवळ आले की, एका बातमीची प्रतीक्षा सगळय़ांनाच असते. जणू ही बातमीच प्रजासत्ताक दिनाचा सांगावा घेऊन येते. या वेळीही तशी बातमी सरकारी गोटातून आली आहे. प्रजासत्ताक दिनी हल्ले करण्याचा कट तूर्त तरी कश्मीर पोलिसांनी उधळला आहे. आता लवकरच आणखी एक बातमी दिल्लीच्या दिशेने सरकेल ती म्हणजे, दिल्लीतील प्रजासत्ताक दिनावर हल्ला करण्यासाठी घुसलेल्या चार-पाच सशस्त्र अतिरेक्यांना अटक केली. पंतप्रधान मोदी यांच्यावरही हल्ला करण्याचा त्यांचा कट होता. तो उधळला गेला, अशा बातम्यांचे नवल आता कुणाला राहिलेले नाही. त्या येतच असतात. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनाचे सोहळे आले की, अतिरेकी बॉम्ब-बंदुका घेऊन बिळातून बाहेर पडतात. कॅलेंडर घेऊनच ते बिळात पडलेले असतात व राष्ट्रीय सोहळय़ांच्या तारखा पाहून बाहेर पडतात. मग ते बाहेर पडले की, त्यांचे कट कसे उधळून लावले अशा बातम्या प्रसिद्ध होतात. हे गेली कित्येक वर्षे सुरू आहे. आताची ताजा खबर म्हणजे, प्रजासत्ताक दिनी श्रीनगरमध्ये आत्मघाती हल्ला करण्याचा किंवा आयईडीचा स्फोट घडवण्याचा जैश-ए-मोहम्मदचा कट होता व त्यासंदर्भात पाच दहशतवाद्यांना अटक झाली आहे. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. हे सर्व ‘कट’कारस्थान उधळल्याबद्दल सुरक्षा दलांचे अभिनंदन, पण कश्मीर खोऱयात सर्वकाही ठीक नाही व अतिरेकी कारवाया सुरूच आहेत. मागच्याच आठवड्यात दिल्ली पोलिसांनी ‘इसिस’च्या तीन अतिरेक्यांना जेरबंद केले.

दिल्लीमध्ये मोठा घातपात घडवण्याचा या अतिरेक्यांचा इरादा होता. राजधानीत मोठा हल्ला चढवणे आणि उत्तर हिंदुस्थानात ‘इसिस’ला सक्रिय करणे यासाठी हे अतिरेकी जमले होते. यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून गुजरातमध्ये आणखी एका अतिरेक्यास अटक करण्यात आली. अतिरेक्यांना अटक करण्याच्या या दोन्ही घटना याच महिन्यातल्या आहेत. त्यामुळे आता तरी दिल्ली आणि कश्मीरातील प्रजासत्ताक दिन सुरळीत व्हावा ही किमान अपेक्षा आहे. एक तर कश्मीरचे विभाजन झाले आहे. जम्मू-कश्मीर हा आता केंद्रशासित प्रदेश झाला असून तेथे केंद्राची हुकूमत म्हणजे राष्ट्रपती राजवट चालली आहे. 370 कलम हटवणे हा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे जम्मू-कश्मीरसंदर्भात ज्या दंतकथा होत्या त्या दूर झाल्या. वेगळे निशाण, वेगळे संविधान हे देशद्रोही प्रकार 370 फेकून दिल्याने दूर झाले. तेथील जनतेला आनंद झाला, पण तो आनंद लष्करी बंदुकांच्या जोरजबरदस्तीवर टिकून आहे हे चित्र बदलायला हवे.

370 कलम हटवल्याचा आनंद

उद्याच्या प्रजासत्ताक दिन सोहळय़ात दिसावा व कश्मीरातील घराघरांवर तिरंगा फडकलेला दिसावा इतकीच किमान अपेक्षा आहे. राजभवनात सुरक्षेच्या कडक बंदोबस्तात तिरंगा फडकवला हे नेहमीचे चित्र या वेळी बदलेल, अशी आशा बाळगायला हरकत नाही. कश्मीरात सीमेपलीकडून घुसखोरी होत आहे, पण कश्मीरातील दहशतवाद्यांना सुखरूप सीमेपलीकडे नेण्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर होत आहे व त्याकामी राष्ट्रपती पदक विजेते पोलीस उपअधीक्षकच आता पकडले गेले आहेत. पोलिसांचा वापर करून कश्मीरात सरकार काही वेगळे उद्योग करीत होते. त्यामुळे ‘पुलवामा’ हल्ल्याबाबत कोणी संशय व्यक्त केला तर देशाचे गृहमंत्रालय काय उत्तर देणार? कश्मीरात मोठा फौजफाटा आहे म्हणून परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. शांततेचे धुके पसरले असले तरी भूगर्भात एक वेगळी खदखद जाणवत आहे. हे सर्व काळजीपूर्वक पाहणे गरजेचे आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांना जेरबंद करणे ही प्रत्येक वर्षी होणारी कारवाई आहे. आताही ते पुन्हा पकडले गेले आहेत आणि कश्मीर तसेच राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याचा कट उधळला गेला आहे. दिल्लीचाच नव्हे तर कश्मीर खोऱयात फडकणारा प्रत्येक तिरंगा सुरक्षित राहिला पाहिजे!

आपली प्रतिक्रिया द्या