सामना अग्रलेख – सूर्यप्रताप : महापुरुषाला साष्टांग दंडवत!

3498
balasaheb-thackeray

शिवतीर्थावर लाखोंच्या गर्दीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली, त्याच शिवतीर्थावर पन्नास लाखांच्या गर्दीने ‘‘बाळासाहेब परत या’’च्या गर्जना करीत त्यांना मानवंदना दिली. त्या दिवशीही सूर्य मावळला नव्हता. कारण जमिनीवरील सूर्य स्वर्गस्थ झाला. बाळासाहेबांचे तेजोवलय अंधार भेदणारे, मरगळ झटकणारे, लढण्याची ऊर्जा देणारे, मावळत्यांना प्रकाशमान करणारे, थांबलेल्यांना गती देणारे, अर्जुनाच्या बाणास धार देणारे व लढणाऱ्यांना ‘‘पुढे व्हा, मी आहे सोबतीला’’ असे बळ देणारे आहे. आज महाराष्ट्राच्या मंत्रालयावर भगवा फडकला व तेजाच्या छटांनी आसमंत उजळला तो बाळासाहेब ठाकरे याच एका सूर्यप्रतापामुळे. या महापुरुषाला साष्टांग दंडवत!

महाराष्ट्राच्या मंत्रालयावर भगवा फडकत असताना आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस साजरा होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलली आहे, हवा बदलली आहे. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी ज्यांनी हात वर उचलले होते, त्यांचे खांदे निखळले आहेत. महाराष्ट्रात समाधान, आनंदाचे वातावरण आहे. कारण महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री लाभला आहे. ‘‘महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून एका शिवसैनिकास बसवेन’’ हा शब्द श्री. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांना दिला होता. हा शब्द त्यांनी पूर्ण करून दाखवला. बाळासाहेबांच्या आजच्या जन्मदिनी मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण महाराष्ट्र त्यांना मानाचा मुजरा करीत आहे. उगवत्या सूर्याला नमस्कार करण्यासाठी जग पुढे असते, पण बाळासाहेब म्हणजे कधीही न मावळणारे ‘सूर्यप्रताप’ होते. त्यांच्या महानिर्वाणानंतरही त्यांचे तेज तळपत आहे. इतिहास घडविणाऱ्या माणसांचे हेच वैशिष्ट्य असते. बाळासाहेबांनी इतिहास घडवला म्हणजे काय केले? त्यांनी कोणतेही सत्तेचे पद हयातभर घेतले नाही, पण कोणत्याही पदाशिवाय ते जगज्जेत्या अलेक्झांडरप्रमाणे जगले व दिग्विजयी योद्धय़ाप्रमाणे महानिर्वाण केले. बाळासाहेबांना आधी शिवसेनेला राजकारणात व निवडणुकीच्या आखाड्यात उतरवायचे नव्हते, पण नंतर त्यांनी विचार बदलला. ‘‘आमच्या पोरांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या काय? आयुष्यभर फक्त वडापावच विकायचा काय? हातात सत्ता आल्याशिवाय विकास शक्य नाही.’’ हे

ध्येय

त्यांनी ठरवले. मुंबईच्या महानगरपालिकेपासून ते महाराष्ट्राची विधानसभा आणि संसदेपर्यंत शिवसेनेने घोडदौड केली. शेतकरी आणि कामगार, गरीब आणि मध्यमवर्गीयांचे कल्याण करण्यासाठी त्यांनी सत्ता आणली व राबवून घेतली. बाळासाहेब कसे होते? डॉ. बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी सांगतात की, ‘‘आगीच्या ठिणग्या पाडण्यासाठी घासाव्या लागणाऱ्या गारगोट्यास व्यक्तीची शक्ती लागतेच.’’ या ठिणग्या पाडणारी महाराष्ट्रातील शक्ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे. मराठी माणसाच्या हितासाठी सुरू झालेली त्यांची चळवळ हिंदुत्वाचा बुलंद आवाज बनली. प्रादेशिक अस्मिता म्हणजे देशविरोध नाही, हा धडा कृतीतून घालून देणारे एकमेव नेते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. ‘आधी देश, मग राज्य’, आधी ‘जय हिंद’ मग ‘जय महाराष्ट्र’ या त्यांच्या कृतीने सर्व क्लेश व जळमटे दूर झाली. बाळासाहेब महाराष्ट्रात जन्माला आलेले हिमालय होते व हा हिमालय बर्फाचा नव्हता, तर पोलादी दिलाचा होता. तो कधी विरघळला नाही. देशाच्या दुष्मनांना हा हिमालय खुले आव्हान देत असे, ‘‘हिंमत असेल तर या अंगावर!’’ आणि महाराष्ट्रद्वेष्ट्यांना बजावत असे, ‘‘महाराष्ट्रास डिवचू नका. महाराष्ट्र हाच देशाचा आधार आहे!’’ बाळासाहेब ठाकरे हिंदुत्ववादी होते, पण धर्मांध नव्हते. ते मराठी अस्मितेचे जनक होते, पण संकुचित नव्हते. त्यांच्या प्रत्येक कृतीत माणुसकी होती म्हणून ते महापुरुष होते. महापुरुष हा महापुरुष ठरतो; कारण त्याच्या ठिकाणी असे काही गुण असतात की, ज्यामुळे तो आपल्या काळातील मोठ्या सामाजिक गरजा पुरविण्यास

समर्थ

ठरतो. मात्र त्या गरजा सर्वसाधारण आणि विशेष कारणातून निर्माण झालेल्या असतात. महापुरुष हा नवीन कार्याचा आरंभ करतो. कारण तो इतरांपेक्षा जास्त पुढे म्हणजे भविष्यात पाहू शकतो व त्याची कळकळ इतरांपेक्षा अधिक तीक्र असते. इतिहास घडविणारा महापुरुष हा त्याच्या कालखंडातील सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाचा परिणाम असतो. तो आपल्या कालखंडात आपल्या विचारास धरून परिस्थितीप्रमाणे परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करतो. त्याचे विचार हे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे घटक असतात. शिवसेनाप्रमुखांच्या बाबतीत तरी वेगळे काय घडले? बाळासाहेब सत्तेच्या खुर्चीत बसले नाहीत, पण सदैव लोकांत राहिले. माणसे आणि गर्दी हेच त्यांचे ‘टॉनिक’ बनले. ते गर्दीत वावरले व जागतिक विक्रमी गर्दीने त्यांना अखेरची मानवंदना दिली. शिवतीर्थावर लाखोंच्या गर्दीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली, त्याच शिवतीर्थावर पन्नास लाखांच्या गर्दीने ‘‘बाळासाहेब परत या’’च्या गर्जना करीत त्यांना मानवंदना दिली. त्या दिवशीही सूर्य मावळला नव्हता. कारण जमिनीवरील सूर्य स्वर्गस्थ झाला. बाळासाहेबांचे तेजोवलय अंधार भेदणारे, मरगळ झटकणारे, लढण्याची ऊर्जा देणारे, मावळत्यांना प्रकाशमान करणारे, थांबलेल्यांना गती देणारे, अर्जुनाच्या बाणास धार देणारे व लढणाऱ्यांना ‘‘पुढे व्हा, मी आहे सोबतीला’’ असे बळ देणारे आहे. आज महाराष्ट्राच्या मंत्रालयावर भगवा फडकला व तेजाच्या छटांनी आसमंत उजळला तो बाळासाहेब ठाकरे याच एका सूर्यप्रतापामुळे. या महापुरुषाला साष्टांग दंडवत!

आपली प्रतिक्रिया द्या