सामना अग्रलेख – मनोहर यात्रेची सांगता…

मनोहर जोशींच्या खांद्यावर शेवटपर्यंत भगवा होता. तोच भगवा खांद्यावर घेऊन ते गेले. जे मिळाले ते शिवसेनेमुळे आणि तेदेखील भरपूर, याबद्दल त्यांनी जाहीर कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी शिवसेनेच्या भगव्याशी शेवटपर्यंत निष्ठा राखली. सध्याच्या काळात अशा निष्ठा दुर्मीळ झाल्या आहेत. मनोहर जोशी यांनी शिवसेनेशी असलेले ईमान शेवटपर्यंत कायम राखले. त्यांच्या निधनाने एका कृतार्थ जीवनाची, मनोहर यात्रेची सांगता झाली. एक कडवट शिवसैनिक, रसिक नेता आपल्यातून गेला. मनोहर जोशींचा उल्लेख शिवसेनाप्रमुख ‘पंत’ असा करीत. त्यांनी त्या पंतपणाचा नेहमीच आब राखला. मनोहरपंतांचे स्मरण महाराष्ट्राला सदैव राहील.

मनोहर जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक म्हणून ओळखले जात. हाच कडवटपणा त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत ठेवला. ते लोकसभेचे अध्यक्ष होते. केंद्रात मंत्री होते. महाराष्ट्र राज्यात बाळासाहेब ठाकरे यांनी आणलेल्या ‘शिवशाही’ राज्याचे मुख्यमंत्री होते. ते विधानसभेतील विरोधी पक्षनेतेही होते. ते मुंबईचे महापौर होते. संसदीय प्रणालीतील प्रत्येक पदावर त्यांनी काम केले, पण त्यांची खरी ओळख राहिली ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे सहकारी व कडवट शिवसैनिक म्हणून. संकटकाळात ते शिवसेनेचे संकटमोचक होते. मनोहर जोशींच्या निधनाने शिवसेनेच्या वटवृक्षाची प्रमुख फांदी कोसळली आहे. एका धगधगत्या कालखंडाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला. दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक, मनोहर जोशी, दत्ताजी नलावडे, शरद आचार्य, सुधीर जोशी, मधुकर सरपोतदार हे शिवसेनेच्या स्थापनेपासूनचे बाळासाहेबांचे शिलेदार. शिवसेनेच्या जडणघडणीत या सगळय़ांचा मोलाचा वाटा राहिला. त्या सर्व अष्टप्रधान मंडळातील मनोहर जोशी यांचे स्थान अनन्यसाधारण होते. त्यांचे जोरदार व्यक्तिमत्त्व त्यास कारणीभूत होते. पटावरील प्यादी कधी व कशी हलवावीत याचे भान त्यांना असे व त्याच पद्धतीचे राजकारण त्यांनी केले. मनोहर जोशी यांनी राजकारणाबरोबर उद्योग, क्रिकेट, सामाजिक कार्यातही मोठे काम केले, पण देशाच्या लक्षात राहील ते लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे योगदान. शिवसेना-भाजपचे युती सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले होते तेव्हा ‘‘ही शिवशाही आहे, महाराष्ट्रात शिवशाही आली आहे,’’ असे उद्गार तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या श्री. मनोहर जोशी यांनी मंत्रालयाच्या अधिकाऱयांसमोर काढले होते. कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ‘शिवशाही’ हे स्वप्न होते व त्या स्वप्नास आकार देण्याचे काम मुख्यमंत्री म्हणून जोशी यांना करायचे होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एका ब्राह्मण व्यक्तीला बसविण्याचे धाडस तेव्हा बाळासाहेबांनी दाखवले व जोशी यांनी त्यांची निवड सार्थ ठरवली. मनोहर जोशी हे मुख्यमंत्री असले तरी त्यांचा रिमोट कंट्रोल हा ‘मातोश्री’वर म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आहे, असे टीकाकार बोलत; पण

संयम ढळू न देता

मुख्यमंत्री जोशी त्यावर बोलत की, ‘‘बाळासाहेबांचा रिमोट कंट्रोल हा माझ्यासाठी आशीर्वाद आहे.’’ मनोहर जोशी हे हजरजबाबी होते, उत्तम प्रशासक होते व परिस्थितीशी संघर्ष करणारे होते. कोकणातील नांदवी येथून एक मुलगा मुंबईत आला. वार लावून जेवू लागला. शिकला, त्याने संघर्ष केला. शिवसेनेच्या मार्गावरून पुढे गेला आणि शेवटी महाराष्ट्र व देशाच्या सर्वोच्च पदी पोहोचला. माधुकरी मागून जगलेला हा मुलगा पुढे राजकारणाबरोबरच हॉटेल व्यवसायात स्थिरावला व रोज हजारो लोकांना जेवू-खाऊ घालू लागला याचे शिवसेनाप्रमुखांना कौतुक होते. एक रुपयात झुणका-भाकर ही गरिबांसाठीची योजना मनोहर जोशींच्याच मुख्यमंत्रीपदाच्या काळात सुरू झाली. ती प्रचंड यशस्वीही झाली आणि नंतर त्याचे अनुकरण इतर राज्यांनी केले. मनोहर जोशींनी बाळासाहेबांच्या अनेक राजकीय मोहिमा फत्ते केल्या. बाळासाहेबांचा शब्द त्यांनी कधीच खाली पडू दिला नाही. त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा बाळासाहेबांनी एक पत्र देऊन घेतला होता. मनोहर जोशींनीही बाळासाहेबांचा शब्द प्रमाण मानून ताबडतोब राजीनामा दिला होता. ‘का?’ असेदेखील त्यांनी बाळासाहेबांना विचारले नाही. कारण बाळासाहेबांचा शब्द म्हणजेच आदेश आणि तो पाळायचा, हेच त्यांचे सूत्र होते. मराठी माणसांवरील अन्यायाविरोधातील प्रत्येक लढय़ात मनोहर जोशी शिवसेनाप्रमुखांसोबत रस्त्यावर होते. त्यांनी पोलिसांच्या लाठय़ा खाल्ल्या. सीमाप्रश्नी मुंबईत मोरारजी देसाईंची गाडी अडविण्याचा प्रयत्न झाला तेव्हा माहीम येथे शिवसेनाप्रमुखांबरोबर मनोहर जोशी होते. पुढे शिवसेनाप्रमुखांना सीमाप्रश्नी अटक झाली तेव्हा येरवडा तुरुंगात मनोहर जोशी तीन महिने बाळासाहेबांचे सोबती होते. ही सोबत त्यांनी शेवटपर्यंत ठेवली. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. मराठी उद्योजकांसाठी त्यांनी जागतिक व्यासपीठ निर्माण केले व मराठी तरुणांनी उद्योजक म्हणून जगाला गवसणी घालावी यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. त्यांची भाषणे अभ्यासपूर्ण असत. व्यवस्थित टिपण काढून ते बोलत व आपला मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न करीत. सुरुवातीला त्यांनी शिक्षक म्हणून केलेली नोकरी आणि नंतर एका छोटय़ा क्लासपासून ते आताच्या कोहिनूर टेक्निकल इन्स्टिटय़ूट, कोहिनूर हॉटेल्स, कोहिनूर बांधकाम अशा व्यवसायांत ते शिखरावर पोहोचले. त्यांच्या

राजकारणाचा व समाजकारणाचा

पाया पक्का होता. त्यांच्या शिवसेनेवरील निष्ठा अविचल होत्या. नांदवी या छोटय़ा गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास ‘वर्षा’ आणि लोकसभा स्पीकरपर्यंत गेला, पण त्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यात ‘मातोश्री’ हा त्यांचा थांबा होता. ब्राह्मण हा महाराष्ट्रातील अल्पसंख्याक वर्ग. तरीही शिवसेनेमुळे त्या समाजाचे मनोहर जोशी मुख्यमंत्री होऊ शकले. कारण शिवसेनाप्रमुखांनी नेहमी जातीपेक्षा कर्तृत्व मोठे मानले. मुख्यमंत्रीपदी ब्राह्मण आला, पण शिवसेना ही बहुजन समाजाची आहे याचे भान मनोहर जोशींनी ठेवले व महाराष्ट्रात सामाजिक ऐक्य राहील यासाठी काम केले. शिवसेना हा मनोहर जोशी यांचा श्वास होता. अनेक पडझडीत, वादळातही ते घट्ट मुळांप्रमाणे ठाम राहिले. लोकांना भेटण्यासाठी ते दादरच्या शिवसेना शाखेत सदैव बसत. वयानुसार त्यांचे हे आवडीचे काम बंद झाले. त्यांच्या पत्नी अनघाताईंनी अचानक जगाचा निरोप घेतला. त्यानंतर ते तसे एकाकीच पडले. शिवसेनेचा जुनाजाणता नेता, सुसंस्कृत राजकारणी, महाराष्ट्राच्या प्रगतीवर ठसा उमटविणारे (माजी) मुख्यमंत्री मनोहर जोशी आपल्यातून निघून गेले. माणसाला केव्हा तरी जायचेच असते, पण त्याने केलेल्या कार्यकर्तृत्वाचा ठसाच शेवटी मागे राहतो. मनोहर जोशी आज आपल्यात नसले तरी त्यांनी केलेले कार्य, निष्ठावान शिवसैनिक ही त्यांची ओळख कायम लक्षात राहील. मनोहर जोशींच्या खांद्यावर शेवटपर्यंत भगवा होता. तोच भगवा खांद्यावर घेऊन ते गेले. जे मिळाले ते शिवसेनेमुळे आणि तेदेखील भरपूर, याबद्दल त्यांनी जाहीर कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी शिवसेनेच्या भगव्याशी शेवटपर्यंत निष्ठा राखली. सध्याच्या काळात अशा निष्ठा दुर्मीळ झाल्या आहेत. सत्तेसाठी शिवसेनेशी, भगव्याशी गद्दारी करणारे, दिल्लीश्वरांसमोर मिंधे आणि लाचार होणारे सध्या निपजले आहेत. मनोहर जोशी यांनी शिवसेनेशी असलेले ईमान शेवटपर्यंत कायम राखले. त्यांच्या निधनाने एका कृतार्थ जीवनाची, मनोहर यात्रेची सांगता झाली. एक कडवट शिवसैनिक, रसिक नेता आपल्यातून गेला. मनोहर जोशींचा उल्लेख शिवसेनाप्रमुख ‘पंत’ असा करीत. त्यांनी त्या पंतपणाचा नेहमीच आब राखला. मनोहरपंतांचे स्मरण महाराष्ट्राला सदैव राहील.