
रमेश देव यांच्या निधनाने मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक पुराणपुरुष लुप्त झाला आहे. असा राजबिंडा, दिलखुलास, उमदा, ऊर्जावान आणि जिंदादिल चैतन्यमूर्ती अभिनेता होणे नाही. पृथ्वीवरचा हा ‘देव’माणूस आता देवलोकी स्थिरावला आहे. मात्र, तिथेही ‘सूर तेच छेडिता’च्या गाण्यावर स्वतः थिरकत देवादिकांनाही ठेका धरायला लावल्याशिवाय तो स्वस्थ बसणार नाही!
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनाने चित्रपट व नाटय़सृष्टीतील एका पर्वाचा अस्त झाला आहे. थोडीथोडकी नव्हे, तब्बल सहा दशके रमेश देव यांनी असंख्य मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये मनसोक्त मुशाफिरी केली. रमेश देव यांच्या निधनाची बातमी ऐकल्याबरोबर जुन्या पिढीतील रसिकांच्या डोळय़ासमोर कृष्णधवल चित्रपटांच्या जमान्यातील रमेश देव यांचे राजबिंडे आणि देखणे रूप नक्कीच तरळले असणार. गौरवर्णीय चेहरा, झुबकेदार केसांचा भांग, दुमडलेल्या बाह्यांचा सदरा आणि कायम खुललेल्या कळीचा हा विलक्षण हसरा चेहरा मराठी चित्रपटसृष्टीने नायक म्हणून स्वीकारला नसता तरच नवल! त्या काळातील तरुणींच्या स्वप्नातील राजकुमार असलेले रमेश देव हे एका अर्थाने मराठी चित्रपटसृष्टीचे देवानंदच होते. आधी बालकलाकार, मग सहकलाकार, सहाय्यक अभिनेता आणि खलनायक व नंतर नायक म्हणून अनेक वर्षे चित्रपटसृष्टीत अधिराज्य गाजवल्यानंतर पुढे चरित्र अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, चित्रपट वितरक हा त्यांचा सगळाच प्रवास विस्मयकारक आहे. शिवाय आपल्या दमदार अभिनयाने मराठी नाटय़सृष्टीवरही त्यांनी स्वतंत्र अशी छाप सोडली होती. चित्रपट आणि कलेच्या क्षेत्रात इतका यशस्वी प्रवास करणारा आणि प्रदीर्घ अनुभव असलेला दुसरा अभिनेता शोधूनही सापडणार नाही. वयाची शंभरी पूर्ण करणार, असे ठणकावून सांगणाऱया रमेश देव यांची
इच्छाशक्ती दुर्दम्य
होती. मात्र, विधात्याला ते मंजूर नसावे. खोकल्याचे निमित्त होऊन रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या रमेश देव यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल असे वाटत होते. मात्र, अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि आयुष्यभर खळाळून जगणाऱया या अभिनेत्याने शांतपणे जगाचा निरोप घेतला. तीनच दिवसांपूर्वी रमेश देव यांनी 93 वा वाढदिवस साजरा केला. चाहत्यांच्या शुभेच्छांचा फोनवर स्वीकारही केला. मात्र, या ऊर्जावान अभिनेत्याचा हा अखेरचा वाढदिवस असेल, असे कुटुंबीयांसह कोणलाही वाटले नसणार. वयाची नव्वदी पूर्ण केल्यानंतरही त्यांनी आपले आरोग्य उत्तम राखले होते. शरीर जरूर थकले होते, पण त्यांचे मन सदैव तरुण राहिले. रमेश देव कायम प्रफुल्लित आणि टवटवीत दिसत राहिले ते मनाच्या या तरुणपणामुळेच. पाणी साचून राहिले तर त्याचे डबके होते आणि वाहते राहिले तरच तो झरा निर्मळ दिसतो, या सिद्धांतावर रमेश देव यांचा गाढ विश्वास होता. त्यामुळेच तब्बल साठ वर्षे त्यांनी स्वतःला वाहते ठेवले, क्रियाशील ठेवले. न थकता, न कुरकुरता, वार्धक्याच्या तक्रारींचा बागुलबुवा न करता हा प्रतिभासंपन्न नट सतत काही ना काही काम करत राहिला, कलेची सेवा करत राहिला. स्वतःला व्यस्त आणि प्रवाही ठेवण्याच्या या कलेमुळेच रमेश देव नावाचा हा जिवंत झरा अखेरपर्यंत निर्मळपणे झुळझुळत राहिला. 1951 मध्ये ‘पाटलाची पोर’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. पण त्यांच्या
करीअरची खऱ्या अर्थाने
सुरुवात झाली ती राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या चित्रपटाच्या माध्यमातून. 1962 मध्ये राजश्री प्रॉडक्शनच्या ‘आरती’ या चित्रपटात जबरदस्त खलनायक रंगवून रमेश देव यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘आनंद’ चित्रपटातील राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांनी साकारलेली डॉक्टरची भूमिका प्रचंड गाजली. 30 मराठी नाटके, 190 हून अधिक मराठी चित्रपट, 285 हून अधिक हिंदी चित्रपटांत काम करताना रमेश देव यांनी नायक-खलनायक, चरित्र अभिनेता म्हणून फिल्म इंडस्ट्रीवर आपला अमीट असा ठसा उमटवला. ‘अपराध’ चित्रपटातील ‘सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला’ हे रमेश व सीमा देव यांच्यावर चित्रित झालेले गाणे अफाट लोकप्रिय झाले आणि हा देखणा नायक रसिकांच्या मनावर आरूढ झाला तो कायमचाच. अभिनयाच्या माध्यमातून एकत्र आलेली नलिनी सराफ ऊर्फ सीमा आणि रमेश देव यांची जोडी पडद्यावर आणि प्रत्यक्ष जीवनातही सुपरहिट ठरली. चित्रपटसृष्टीतील एक आदर्श जोडपे म्हणून रमेश देव आणि सीमा देव या दांपत्याकडे पाहिले जायचे. या सुंदर जोडीतील एक धागा आज निखळला. रमेश देव यांच्या निधनाने मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक पुराणपुरुष लुप्त झाला आहे. असा राजबिंडा, दिलखुलास, उमदा, ऊर्जावान आणि जिंदादिल चैतन्यमूर्ती अभिनेता होणे नाही. पृथ्वीवरचा हा ‘देव’माणूस आता देवलोकी स्थिरावला आहे. मात्र, तिथेही ‘सूर तेच छेडिता’च्या गाण्यावर स्वतः थिरकत देवादिकांनाही ठेका धरायला लावल्याशिवाय तो स्वस्थ बसणार नाही!





























































