सामना अग्रलेख – पाकिस्तानी विषाणू!

4685

संपूर्ण जगावर चालून आलेल्या कोरोनाच्या संकटापासून मानव जातीचे रक्षण कसे करायचे या एकाच विषयाची चिंता अवघे जग वाहत असताना पाकिस्तानला मात्र याची कुठलीच फिकीर पडलेली दिसत नाही. कोरोनाच्या वैश्विक संकटातही युद्धबंदी मोडून दहशतवाद आणि घुसखोरीचे हत्यार उपसणाऱ्या पाकिस्तानच्या विकृत मानसिकतेला हिंदुस्थानी जवानांनी चांगला धडा शिकवला. 24 तासात 9 दहशतवाद्यांचा खात्मा हा स्कोअर उत्तम असला तरी मानवतेचा शत्रू असलेल्या पाकिस्तानी विषाणूलाही कोरोनाप्रमाणेच संपवावे लागेल!

कोरोनाच्या विनाशकारी संकटाचा मुकाबला कसा करायचा यावरून सारे जग चिंताक्रांत झाले असताना पाकिस्तानचा विषाणु मात्र अजूनही दहशतवादाच्या डबक्यातच उड्या मारत आहे. पाकव्याप्त कश्मीरात प्रशिक्षित करून ठेवलेले अतिरेकी सीमेवरून हिंदुस्थानात कसे घुसवायचे आणि जम्मू-कश्मीरसह हिंदुस्थानात कुठे व कसे दहशतवादी हल्ले घडवायचे हा जिहादी धंदा कोरोनाच्या संकटातही सोडायला पाकिस्तान तयार नाही. अर्थात मानवतेचाच शत्रू असलेल्या पाकिस्तानचे शेपूट कदापी सरळ होणार नाही, हे सीमेवर पहारा देणाऱ्या आपल्या बहाद्दर जवानांनाही पक्के ठाऊक आहे. त्यामुळेच कोरोनाचे संकट घोंघावत असतानाही डोळ्यात तेल घालून सरहद्दीचे रक्षण करणारे जवान पाकिस्तानकडून होणारे घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडत आहेत. शनिवारी रात्री उत्तर कश्मीरातील केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने अतिरेकी घुसवण्याचा प्रयत्न केला. अतिरेक्यांना हिंदुस्थानी हद्दीत प्रवेश करता यावा यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. हिंदुस्थानी जवानांनीदेखील तडाखेबंद प्रत्युतर देत पाकिस्तानचा डाव हाणून पाडला. रात्रभर झालेल्या तुंबळ धुमश्चक्रीत पाच

घुसखोर अतिरेक्यांना

आपल्या जवानांनी गोळ्या घालून ठार केले. कित्येक तास चाललेल्या या चकमकीत हिंदुस्थानचा एक जवान शहीद झाला. अन्य दोन जवानही गंभीररीत्या जखमी झाले आहेत. सीमेवर पाकड्यांचे मनसूबे उधळवून लावतानाच कश्मीर खोऱ्यातही अतिरेक्यांचा खात्मा करण्याची मोहीम सुरक्षा दलांनी सुरूच ठेवली आहे. कुलगाम जिल्ह्यात गेले दोन आठवडे नागरिकांवर निर्दयी हल्ले चढवून धुमाकूळ घालणाऱ्या हिजबुल मुजाहिदीनच्या चार अतिरेक्यांचे सुरक्षा दलांनी एनकाऊंटर केले. जवानांनी पाळत ठेवून या अतिरेक्यांना घेरले आणि धडाकेबाज ऑपरेशन राबवून चारही अतिरेक्यांना कंठस्नान घातले. गेल्या 24 तासांत कश्मीरात 9 अतिरेक्यांना ठार मारून सुरक्षा दलांनी मोठीच कामगिरी बजावली आहे. कोरोनामुळे जगभरातील व्यापार, उद्योगधंदे सारेकाही ठप्प झाले असताना पाकिस्तान मात्र दहशतवादाचा व्यापार थांबवायला तयार नाही. खुद्द पाकिस्तानवर कोरोनाचा विषाणु यमदूत बनून घिरट्या घालत आहे. पाकिस्तानातील सिंध, पंजाब, खैबर पख्तूनख्वा, बलूचिस्तान, गिलगिट-बाल्टिस्तान, पाकव्याप्त कश्मीरपासून राजधानी इस्लामाबादपर्यंत सगळीकडेच कोरोनाने थैमान घातले आहे. 3 हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण

पाकिस्तानच्या विविध रुग्णालयात

उपचार घेत आहेत. 50 जणांचे बळी गेले आहेत. कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. असे असतानाही हिंदुस्थानलगतच्या सीमेवर मात्र दररोज युद्धबंदीचे उल्लंघन करून पाकिस्तानी सैन्य हिंदुस्थानी हद्दीतील गावांवर हल्ले चढवत आहे. गोळीबार करून अतिरेक्यांना घुसवण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेणाऱ्या कोरोनाच्या विषाणुचा नायनाट कसा करायचा यासाठी अमेरिकादी महासत्तेसह तमाम विकसित देश आकाशपाताळ एक करत आहेत. सीमांशी संबंधित वाद, झगडा, मतभेद, रस्सीखेच, शस्त्रस्पर्धा सगळे विषय आज बाजूला पडले आहेत. संपूर्ण जगावर चालून आलेल्या कोरोनाच्या संकटापासून मानव जातीचे रक्षण कसे करायचे या एकाच विषयाची चिंता अवघे जग वाहत असताना पाकिस्तानला मात्र याची कुठलीच फिकीर पडलेली दिसत नाही. कोरोनाच्या वैश्विक संकटातही युद्धबंदी मोडून दहशतवाद आणि घुसखोरीचे हत्यार उपसणाऱ्या पाकिस्तानच्या विकृत मानसिकतेला हिंदुस्थानी जवानांनी चांगला धडा शिकवला. 24 तासात 9 दहशतवाद्यांचा खात्मा हा स्कोअर उत्तम असला तरी मानवतेचा शत्रू असलेल्या पाकिस्तानी विषाणुलाही कोरोनाप्रमाणेच संपवावे लागेल!

आपली प्रतिक्रिया द्या